मैत्रीत विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. आपल्याला एखाद्या विषयाबद्दल काय वाटतं हे आपण घरातील माणसांना सहजपणे सांगत नाही पण आपल्या मैत्रिणीला सहजपणे सांगून जातो.
मैत्री हे एक असं नातं आहे ज्यात आपण स्वतः आपल्याला हवी त्याच्याशी मैत्री करू शकतो. यात कुठलाही नियम नाही. आपण लहानपणापासूनच मित्र/मैत्रिणी बनवतो. त्यांच्याशी खेळतो, गप्पागोष्टी मारतो एवढेच नव्हे तर भांडतो देखील. आपण निस्वार्थ होऊन वावरतो. आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण त्यांना सांगू शकतो. मैत्रीत स्त्री/पुरुष असा भेदभाव नसतो. मैत्री हे असं एक नातं आहे ज्यात आपण सुखाच्या वेळी तसेच दुःखाच्या वेळी देखील सोबत असतो. त्यांचे दुःख तेच आपले दुःख समजून आपण त्यांची मदत करतो, त्यांना सांभाळून घेतो.
मैत्रीत विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. आपल्याला एखाद्या विषयाबद्दल काय वाटतं हे आपण घरातील माणसांना सहजपणे सांगत नाही पण आपल्या मैत्रिणीला सहजपणे सांगून जातो. मैत्रीत वयाचे बंधन नसते. मैत्री टिकवता आली पाहिजे. बरेचदा आपण लगेच एखाद्या गोष्टीवरून, एखाद्या वाक्यावरून भांडतो व मैत्री तोडून टाकतो. असं वागतो जसं की आपण त्यांना ओळखत नाही. आजच्या काळात मैत्री टिकवणे महत्त्वाचे आहे कारण कुठलंही संकट आलं तरीही कुटुंब हे आपल्या सोबत असतं पण त्याचबरोबर मित्र-मैत्रिणी सुद्धा संकटाच्या वेळी धावून येतात.
अनेक वेळा मैत्रीच आपल्याला उपयोगी पडते. लहानपणी झालेली मैत्री खूप अनमोल असते कारण नकळतपणे आपण एखाद्या व्यक्तीसोबत खेळतो, गप्पागोष्टी मारतो, एकत्रित बसून अभ्यास करतो, शाळेत एकत्र जातो, घरी एकत्र येतो, एकत्र बसून जेवण करतो, आपण डब्यात आणलेला खाऊ आपल्या मैत्रिणीला देतो. नकळतपणे आपण त्यांच्याशी जोडले जातो. आपल्याला त्यांची सवय होते.
जेव्हा आपली मैत्रीण एखाद्या दिवशी शाळेत येत नाही, तर त्या दिवशी आपण वर्गात खूप गप्प गप्प असतो. आपल्याला एकटेपणा वाटतो. एकाच वेळी असं वाटायला लागतं की का आपण आज शाळेला आलो? आपण सुद्धा आज घरीच राहायला हवं होतं. आणि मग ती मैत्रीण दुसऱ्या दिवशी आली की सर्वात आधी आपण शाळेत काय काय घडलं ते सविस्तरपणे तिला सांगतो. तिला बघून आपल्याला खूप आनंद होतो. आपण कितीही मोठे झालो तरी आपली लहानपणी असलेली मैत्री तशीच राहते. मोठे झालो की आपल्याला जास्त वेळ भेटत नाही आपल्या मैत्रिणीला भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला, फिरायला त्यांच्यासोबत वेळ घालवायला पण तरी देखील त्यांच्यावर असलेलं प्रेम कमी होत नाही. मैत्री ही तशीच राहते.
सविता शेटकर
झिलाभाट वाडा-रेवोडा