चीनमधील नेऋत्य युन्नान प्रांतात म्यानमारच्या सीमेलगत एक महाकाय लार्ज फेज्ड ॲरे रडार सिस्टिमची (एलपीएआर) उभारणी करण्यात आली आहे. ही यंत्रणा भारताचा क्षेपणास्त्र कार्यक्रम धोक्यात आणू शकते.
गेल्या काही वर्षांत भारताच्या संरक्षण सिद्धतेत आमूलाग्र बदल झाला आहे. सीमाभागात पायाभूत सुविधा विकसित करण्यावर मोदी सरकारचा भर राहिला असून यादृष्टीने सीमाभागात पोहचण्यासाठीचा कालावधी कमी केला जात आहे. अत्याधुनिक शस्त्रांची खरेदी, लढाऊ विमानांचा दाखल होणारा ताफा पाहता भारताचे लष्करी सामर्थ्य वाढताना दिसते. अर्थात ही काळाची गरज आहे. शेजारील देशांच्या कारवाया आणि कुरापती पाहता भारताने सीमेवर वाढविलेली दक्षता अपरिहार्य आहे. प्रामुख्याने भारत आणि चीन यांच्यातील वाढता तणाव पाहता सक्षम देखरेख प्रणाली असणे गरजेचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर चीनने तैनात केलेली अत्युच्च क्षमतेची रडार यंत्रणा भारतासाठी डोकेदुखी ठरणार आहे. याचे कारण भारताचे क्षेपणास्त्र कार्यक्रम चीनच्या नेत्यांना एका क्लिकवर कळणार आहेत.
चीनमधील नैऋत्य युन्नान प्रांतात म्यानमारच्या सीमेलगत एक महाकाय लार्ज फेज्ड अॅरे रडार सिस्टिमची (एलपीएआर) उभारणी करण्यात आली आहे. ही यंत्रणा भारताचा क्षेपणास्त्र कार्यक्रम धोक्यात आणू शकते. पाच हजार किलोमीटरपेक्षा अधिक पल्ल्याच्या परिसरातील हालचाली टिपण्यास सक्षम असणारी ही उच्च प्रतीची रडार सिस्टिम ही हिंद महासागर क्षेत्राचा (आयओआर) बहुतांश भाग व्यापून घेण्याबरोबरच भारताच्या अंतर्गत हालचालीवर देखील लक्ष ठेवण्यास चीनला मदत करणार आहे. भारतातील बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम शोधणे, यावर लक्ष ठेवण्याचे काम या प्रणालीच्या माध्यमातून चीन सहजपणे करू शकतो. या माध्यमातून चीन भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम बेटापर्यंत लक्ष ठेवेल. या बेटावर अग्नि पाच आणि के-४ सारख्या उच्च प्रतीचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात येते. सागरी दृष्ट्या महत्त्वाची असणार बंगालची खाडी आणि हिंद महासागर भागावरही या यंत्रणेचे लक्ष असेल. या भागात भारतीय नौदलाचे सक्षम तळही आहे.
चीनकडे उत्तर भारतासाठी कोरला आणि झिजियांगमध्ये एलपीएआर साईट असून त्याने आता दक्षिण भारतासाठी युन्नान साईट विकसित केली आहे. साहजिक या रडार यंत्रणेच्या मदतीने भारतीय क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण, ‘आयओआर’सह लष्कर आणि नौदलाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तो संपूर्ण भारतावर करडी नजर ठेवेल. या माध्यमातून चीन हा भारताशी सामरिक विरोध करण्याबरोबरच बचावात्मक योजना आखत थेट आव्हान देण्याचे काम करू शकतो.
एकप्रकारे भारतीय लढाऊ विमानांची चाचणी किंवा हवाई दलातील प्रलय, रुद्र क्षेपणास्त्र कार्यक्रम धोक्यात आलेले असताना युन्नानमधील रडार यंत्रणा ही गुजरातचे अंतरही कवेत घेत आहे. गुजरात ते युन्नान अंतर ३५०० किलोमीटर आहे. कराचीपासून युन्नान ३००० किलोमीटर आहे. पुढे ही व्याप्ती इराण अणि सौदी अरबपर्यंत वाढेल. नवीन रडार यंत्रणा भारतातील क्षेपणास्त्र कार्यक्रमाची वाटचाल, गती आणि पल्ला याचा प्रत्यक्ष वेळ जाणून घेत चीनची क्षमता वाढविणार आहे. या यंत्रणेच्या मदतीने तो भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा मुकाबला करू शकेल.
आजच्या काळात चीन अणि भारत यांच्यात भूराजकीय तणाव असल्याने सीमेवर आणि सीमेनजीकच्या भागात चीनची देखरेख प्रणाली ही भारताच्या सुरक्षेसाठी गंभीर मुद्दा ठरत आहे. यासाठी काउंटर सर्व्हिलन्स तंत्रज्ञान मिळवणे आणि चीनचे नापाक मनसुबे उधळून लावण्यासाठी पर्यायी क्षेपणास्त्र चाचणीचे स्थळ आणि मार्ग शोधणे गरजेचे आहे. युन्नानची रडार प्रणाली आता कार्यान्वित झाल्यामुळे भारत-चीन यांच्यातील भूराजकीय स्पर्धा आणखीच तणावपूर्ण झाली आहे. काही सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, युन्नान येथील उभारलेली टेहेळणी प्रणाली हे भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे. कारण आपल्या संस्थेला या यंत्रणेचा थांगपत्ता लागला नाही.
असे असले तरी भारताकडे यावर तोडगा आहे. युद्धाच्या काळात महाकाय रडार स्थळ हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे प्रमुख लक्ष्य राहू शकते. सागरी हद्दीतून किंवा जमिनीवरून जमिनीवर हल्ला करणाऱ्या ब्राह्मोस क्षेपणास्त्रांत एलपीएआरचे ठिकाण नष्ट करण्याची क्षमता असणे गरजेचे आहे. दुसरा पर्याय म्हणजे गुप्त मोहीम. अशा प्रकारची मोहीम राबविण्यासाठी भारताला सीआयए किंवा अन्य ईशान्येकडील देशांच्या मदतीने म्यानमार प्रशासनाशी चांगले संबंध प्रस्थापित करणे, याशिवाय संबंधित स्थळ नष्ट करण्याची गुप्त मोहीम फत्ते करण्यासाठी प्रत्यक्षपणे समोर न येता खांगलू आणि म्यानमार येथील बंडखोर गटांना प्रोत्साहन देणे किंवा संपर्क करणे हिताचे राहू शकते. कोणतीही मोठी जोखीम न उचलता आणि हानी न सहन करता चीनच्या रडार स्थानकाचा मुकाबला करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे त्याची यंत्रणा निष्प्रभ करण्यासाठी या स्थळाजवळ ‘इडब्लू’ ची (इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर) नियुक्ती करत वापर करणे. भारताने प्रत्यक्ष कोणतीही भूमिका न घेता अप्रत्यक्षरित्या बंडखोर संघटनेच्या मदतीने हे काम करता येईल. यासाठी भारताला म्यानमारध्ये जमीन घ्यावी लागेल.
भारताने चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर रडार यंत्रणा विकसित करण्याचा विचार करावा. लाँग अल वॉर्निंग सिस्टिम आणि व्हीएचएफ रडारसह सीमेपलिकडील भागांवर लक्ष ठेवण्यासाठी रडार नेटवर्क वाढवावे लागेल आणि यात सुधारणा करावी लागेल. संरक्षण विश्लेषकांच्या मते, लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये व्होरोनिश डीएम रडार सिस्टिमची नियुक्ती ही चीन आणि अंदमानच्या खोलवर भागापर्यंत देखरेख ठेवण्यासाठी गरजेची आहे. याप्रमाणे क्षेपणास्त्र चाचणी करताना चीनच्या रडार यंत्रणेला अडथळा आणण्यासाठी ‘इडब्लू’ उपकरणाचा वापर करता येईल.
कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)