फोंडा येथील संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठराव मंजूर
फोंडा : उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेने (एचआयएसटीएजी) राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० च्या अनुषंगाने १ एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला आहे. १६ फेब्रुवारी रोजी फोंडा येथे झालेल्या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. अध्यक्ष बाबाजी सावंत यांच्या प्रस्तावानंतर हा ठराव मंजूर करण्यात आला.
दरवर्षी गोव्यात जूनच्या सुरुवातीला शैक्षणिक वर्ष सुरू होते, परंतु एप्रिलमध्ये शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणे हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण प्रणालींशी सुसंगत आहे. हे संमक्रमण राष्ट्रीय शैक्षणिक सुधारणांसह चांगले समन्वय आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणच्या शिफारशींची अंमलबजावणी सुलभ करू शकते, असा विश्वास या सभेत उपस्थितांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० चा मुख्य उद्देश तणावमुक्त आणि विद्यार्थी, अनुकूल शिक्षण प्रणालीला प्रोत्साहन देणे हा आहे. गेल्या काही वर्षांपासून, अनेक उच्च माध्यमिक शाळा एप्रिलमध्ये अनौपचारिकपणे वर्ग सुरू करत आहेत. शैक्षणिक दिनदर्शिकेचा भाग म्हणून याला औपचारिक केल्याने सर्व संस्थांमध्ये सुसंगतता आणि एकरूपता सुनिश्चित होईल.
शैक्षणिक, सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी एक मेगा शैक्षणिक आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन २९ एप्रिल रोजी करण्याबाबतही या सभेत चर्चा झाली. शैक्षणिक सहकार्याला प्रोत्साहन देणे, सांस्कृतिक अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणे, शिक्षकांमध्ये व्यावसायिक नेटवर्किंग सुलभ करणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे असल्याचे सांगण्यात आले आहे.