पुढील दोन दिवस कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गेले काही दिवस राज्यात उष्णता वाढत आहे. फेब्रुवारीमध्ये मे महिन्याप्रमाणे तापमान वाढ झाली आहे. सोमवारी पणजीत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस होते. मुरगाव येथील कमाल तापमान ३५.७ अंश सेल्सिअस राहिले. हवामान खात्याने पुढील दोन दिवस कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
हवामान खात्याच्या स्वयंचलित केंद्राच्या नोंदीनुसार, साळगाव येथील कमाल तापमान ३६.२ अंश, म्हापसा येथील ३६.२ अंश, मोप येथील ३७.१ अंश, तर पेडण्यात ३७.२ अंश सेल्सिअस होते. सोमवारी पणजीत किमान २१.२ अंश, तर मुरगावमध्ये २१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. म्हापसा येथे १९.७ अंश, तर साळगाव येथे २०.६ अंश सेल्सिअस तापमान होते. खात्याने राज्यात १८ ते २० दरम्यान वातावरण कोरडे राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पहाटे थंडी आणि दुपारी कडक ऊन अशा वातावरणामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.