दिल्लीत चेंगराचेंगरी; १८ जणांचा मृत्यू

नामसाधर्म्यामुळे गोंधळ : महाकुंभसाठी विशेष रेल्वेच्या घोषणेनंतर धावपळ


17th February, 12:24 am
दिल्लीत चेंगराचेंगरी; १८ जणांचा मृत्यू

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
नवी दिल्ली : येथील रेल्वे स्थानकात शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन रेल्वे एकसारख्या नावाच्या असल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला. यामुळे चेंगराचेंगरी झाली. ‘प्रयागराज’ नावाने दोन ट्रेन होते. एक ‘प्रयागराज एक्सप्रेस’ आणि दुसरी ‘प्रयागराज स्पेशल’.
प्रयागराजला जाणाऱ्या चार ट्रेन होत्या. त्यापैकी तीन ट्रेन उशिरा धावत होत्या. यामुळेच रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर ‘प्रयागराज एक्सप्रेस’ उभी होती. १२ वर मगध एक्सप्रेस उशिराने येणार होती. आणखी एक ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक १३ वर येणार होती. ‘प्रयागराज स्पेशल’ प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वर पोहोचत असल्याच्या घोषणेमुळे संभ्रम निर्माण झाला. जे लोक प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर ट्रेनसाठी पोहोचले नाहीत, त्यांना वाटले की ट्रेन १६ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर येत आहे. दोन वेगवेगळ्या ट्रेन असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. लोक आपापल्या गाड्यांमध्ये चढण्यासाठी धावत असताना चेंगराचेंगरी झाली. एस्केलेटरवरील धक्क्यामुळे काही प्रवासी, बहुतेक महिला आणि मुले चिरडले गेले. चेंगराचेंगरीमुळे गुदमरून १८ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ९ महिला, ५ मुले आणि ४ पुरुषांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना आणि काळजीवाहू मुख्यमंत्री आतिशी जखमींची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. भारतीय रेल्वेने मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये, गंभीर जखमींना २५ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपयांची मदत जाहीर केली. ...
पॉइंटर बॉक्स
चेंगराचेंगरी का झाली ?
प्रयागराज विशेष ट्रेन, भुवनेश्वर राजधानी आणि स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस या तिन्ही ट्रेन प्रयागराजला जाणार होत्या. भुवनेश्वर राजधानी आणि स्वतंत्र सेनानी या गाड्या उशिराने धावत होत्या. प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर या तिन्ही गाड्यांसाठी गर्दी होती. प्रयागराज विशेष पोहोचली तेव्हा घोषणा करण्यात आली की, भुवनेश्वर राजधानी प्लॅटफॉर्म क्र. १६ वर आहे. हे ऐकताच प्लॅटफॉर्म १४ वरील लोक १६ कडे धावले.
तिकीट काउंटरवर बरेच लोक होते. यापैकी ९० टक्के प्रयागराजला जात होते. अचानक ट्रेन आल्याची घोषणा झाल्याने लोक तिकिटे न घेताच प्लॅटफॉर्मकडे धावले.
महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या लोकांची मोठी गर्दी होती, परंतु स्टेशन प्रशासनाने नियंत्रण कक्ष स्थापन केला नाही. शनिवारीही सायं. ७ पासून गर्दी वाढू लागली, पण कोणीही लक्ष दिले नाही.
दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती स्‍थापन
दिल्‍ली रेल्‍वे स्‍थानकावर झालेल्‍या चेंगराचेंगरीच्‍या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रवाशांना विशेष ट्रेनने पाठवण्यात आले आहे. रेल्वे स्थानकावरील वाहतूक आता सामान्य आहे, असे रेल्वे बोर्डाचे माहिती आणि प्रसिद्धी कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी म्‍हटले आहे.
..
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल ऐकून खूप दुःख झाले. मी शोकाकुल कुटुंबियांना मनापासून संवेदना व्यक्त करते आणि जखमी लोक लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करते.

- द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती
..
स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे मला वाईट वाटले. प्रियजन गमावलेल्या व्यक्तींबद्दल माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. चेंगराचेंगरीमुळे बाधित झालेल्यांना अधिकारी मदत करत आहेत.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
...
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. या घटनेमुळे पुन्हा रेल्वेचे अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता अधोरेखित होते. प्रशासनाने गैरव्यवस्थापन आणि निष्काळजीपणामुळे कोणालाही जीव गमवावा लागू नये, याची काळजी घ्यावी.
राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा