लवू मामलेदार यांच्यासारख्या सहृदय व्यक्ती यापुढे गमवायच्या नसतील तर अमानवी, असंवेदनशील वृत्ती रोखावी लागेल. नागरिकांमध्ये संयम, विवेक, सहनशीलता याची नितांत गरज असल्याचेच या घटनेने दाखवून दिले आहे.
बेळगाव शहरात गोव्याचे माजी आमदार आणि माजी पोलीस उपअधीक्षक लवू मामलेदार यांचे ज्या परिस्थितीत निधन झाले, ते ऐकून आणि पाहून गोमंतकीय नक्कीच हादरले असतील. या एका अनपेक्षितच नव्हे तर धक्कादायक घटनेने सर्वांनाच अस्वस्थ करून सोडले आहे. मामलेदार यांची रिक्षाचालकाशी बाचाबाची होते काय अन् त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते काय, सारेच अघटित आणि कल्पनेपलीकडचे. मारहाणीच्या घटनेनंतर सौम्य स्वभावाचे मामलेदार आपल्या खोलीकडे वळत असतानाच कोसळले आणि उपचारास नेले असता मृत झाले. हा प्रकार अतिशय वेदनादायक आहे. क्षुल्लक कारणासाठी वाद घालणारे आणि त्यापायी जीव घेणारे घटक समाजात अलीकडे वाढले आहेत. संयमाचा अभाव, सहनशीलतेची उणीव आणि ताणाचे निमित्त यामुळे अशा घटना जीवघेण्या ठरत आहेत. लवू मामलेदार हे केवळ फोंडा मतदारसंघाचे आमदार होते, म्हणून सुपरिचित होते असे नाही, तर त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने एका अष्टपैलू व्यक्तीप्रमाणे जनतेला भुरळ घालणारे होते. एक कार्यक्षम, ध्येयवादी आणि स्वच्छ प्रतिमेचे पोलीस अधिकारी अशी त्यांची प्रतिमा होती. सुस्वभावी आणि मनमोकळे असे मामलेदार यांनी जशी पोलीस उपअधीक्षक म्हणून चांगली कामगिरी बजावली, तशीच कर्तबगारी त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून सिद्ध केली होती. पोलीस खात्यातून बाहेर पडून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते म्हणून त्यांनी राजकारणात केलेला प्रवेश तसा गोमंतकीय जनतेला अनपेक्षितच होता, पण सभ्य आणि सक्षम व्यक्ती राजकारणात येत असल्याचे समाधानही जनतेला वाटत होते. कोणतेही डावपेच खेळायचे नाहीत, लॉबिंग करायचे नाही, हाजी हाजी करायची नाही अशा गुणविशेषांमुळे राजकारण्यांमध्ये त्यांचे स्थान वेगळे भासायचे. सामान्य मतदारांना आपला प्रतिनिधी तळमळीने आपल्यासाठी झटेल याची खात्री वाटायची. प्रारंभीचे काही महिने शिक्षक म्हणून काम केल्याने अनुभवाने आलेले शहाणपण त्यांच्याजवळ होते.
लवू मामलेदार केवळ पाच वर्षांसाठीच लोकप्रतिनिधी होते, हे खरे असले तरी त्यांची राजकीय कारकिर्द तशी चार दशकांची आहे. काही गैरसमजामुळे त्यांना मगो पक्ष सोडावा लागला आणि ते थेट तृणमूल काँग्रेस पक्षात गेले. लवू मामलेदार यांचा हा राजकीय टप्पा यशस्वी ठरला नाही. गोवा आणि गोमंतकीय यांची खरी ओळख तृणमूल काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना झालेली नाही, अशा स्पष्ट शब्दांत आपल्या भावना व्यक्त करून मामलेदार यांनी पक्षत्याग केला आणि काँग्रेसचा हात धरला. अर्थात काँग्रेसचे अच्छे दिन संपले होते, त्यामुळे देशाप्रमाणेच गोव्यातही या पक्षाची घसरण सुरू झाली होती. राजकारणात मामलेदार फारसे यशस्वी ठरले नसतील, त्यांची वाटचाल अडथळ्यांची ठरली असेल पण एक वेगळा राजकारणी ही त्यांची ओळख मात्र जनमानसात त्यावेळी रुजली, ती आतापर्यंत कायम आहे. याच कारणास्तव मामलेदार यांचे अकाली आणि आकस्मिक निधन प्रत्येक गोमंतकीला चटका लावून गेले, अस्वस्थ करून गेले. मगो पक्ष सोडल्यानंतरही मामलेदारांनी नेत्यांशी आपली मैत्री कायम टिकवली होती, हे त्यांच्या मनस्वी स्वभावाचे दर्शन घडविते. राजकारणात प्रतिस्पर्धी असतील, पण ते शत्रू नव्हेत असे मामलेदार यांना वाटायचे.
सेवाभावी मानसोपचारतज्ज्ञ आणि लेखक डॉ. रूपेश पाटकर यांनी या घटनेनंतर लगेच व्यक्त केलेली प्रतिक्रिया विचार करायला लावणारी आहे. ते म्हणतात, ‘किती भयानक परिस्थितीत आपण जगतो आहोत! किरकोळ कारणावरून माणसाचा संताप इतका क्रूर व्हावा की त्याने समोरच्याला जीवेच मारावे! पराकोटीचे ऱ्हास पर्व चालू आहे. समाज म्हणून भावनिकदृष्ट्या आम्ही कफल्लक बनत चाललो आहोत. कधी स्वतःच्याच चिमुरडीला मारणाऱ्या सूचना सेठच्या रुपात तर आज गिऱ्हाईकाला ठार करणाऱ्या रिक्षावाल्याच्या रुपात! एआय कंपनीच्या अब्जाधीश मालकिणीपासून हातावर पोट असलेल्या रिक्षावाल्यापर्यंत सारेच भयानक खुनी बनत चाललो आहोत.’ डॉक्टरांच्या या मतप्रदर्शनातून सामाजिक स्तरावर आज दिसणारी असंवेदनशीलता स्पष्ट झाली आहे. एखाद्याच्या जाण्याने त्या कुटुंबावर येणारे संकट आणि दुःख याची कल्पनाही करता येणार नाही. याचा विचार करण्याची गरज अविवेकी माणसांना वाटत नसल्याने गुन्हेगारी वृत्तीत वाढ झाली आहे. ही असहिष्णुता मानवजातीला घातक ठरणार आहे. मामलेदार यांच्यासारख्या सहृदय व्यक्ती गमवायचे नसतील तर अमानवी, असंवेदनशील वृत्ती रोखावी लागेल. संयम, विवेक, सहनशीलता याची नितांत गरज असल्याचेच या घटनेने दाखवून दिले आहे.