शरीराच्या निर्मितीचा स्रोत आपल्या आत आहे. आता आपला एकमेव प्रयत्न हा आहे की, त्या स्रोतापर्यंत पोहोचायचे. एकदा तुम्हाला तुमच्या आत असलेल्या निर्मितीच्या स्रोतामध्ये प्रवेश मिळाला की, आरोग्य आणि कल्याण स्वाभाविकपणे साध्य होईल.
आंतरिक कल्याणावर लक्ष केंद्रित करणे
सद्गुरू : मानवी कल्याणाच्या शोधात, या पृथ्वीवर बरेच काही केले गेले आहे; विशेषतः गेल्या शंभर वर्षांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापराने, मानवी कल्याणासाठी आपण खूप काही केले आहे. यामुळे निश्चितच खूप आराम आणि सुविधा आपल्याकडे चालून आल्या आहेत. पण त्याचवेळी, आपण असा दावा करू शकत नाही की, आपण या पृथ्वीवरील सर्वात आनंदी, सर्वात शांत, सर्वात प्रेमळ पिढी आहोत. या पूर्वीची कोणतीही पिढी अशा प्रकारच्या सोयी आणि सुविधांचे स्वप्न देखील पाहू शकली नसती; पण मानवता खरोखर चांगली झाली आहे काय?
आपण बाह्य गोष्टी बऱ्याच प्रमाणात व्यवस्थित केल्या आहेत, पण मानव व्यवस्थित नाही, कारण जरी आपण बाह्य गोष्टींची काळजी घेतली, पण ‘आतील’ काळजी घेण्याचा कधी विचार केला नाही. पाश्चात्य समाजांकडे पाहिल्यास, उदाहरणार्थ, आज अमेरिकेत, जी अतिशय यशस्वी अर्थव्यवस्था म्हणून सर्वोच्च स्थानी आहे, जवळपास ४० टक्के लोक स्वतःला संतुलित ठेवण्यासाठी कोणत्या ना कोणत्या मानसिक औषधांवर अवलंबून आहेत.
कोणतेही औषध घेणे म्हणजे तुमच्या रासायनिक पातळीवर एक हस्तक्षेप आहे. जेव्हा शरीरात एखादे रसायन टाकले जाते, शारीरिक आणि मानसिक पातळीवर, चलबिचल कमी होते आणि थोडी शांती मिळते. मानवी शरीर हे एक अत्यंत जटिल रासायनिक कारखाना आहे. म्हणून आपण स्वतःमध्ये काही रसायने टाकून सुखाच्या प्राप्तीचा प्रयत्न करत आहोत.
मूलभूतपणे, आरोग्य म्हणजे आनंदाची एक पातळी. जर तुमचे शरीर आनंदी झाले, तर आपण त्याला आरोग्य म्हणतो. जर ते अधिक आनंदी झाले, तर त्याला सुख म्हणतो. जर तुमचे मन आनंदी झाले, तर आपण त्याला शांती म्हणतो. जर ते अधिक आनंदी झाले, तर त्याला हर्ष म्हणतो. जर तुमच्या भावना आनंदी झाल्या, तर आपण त्याला प्रेम म्हणतो. जर त्या अधिक आनंदी झाल्या, तर त्याला करुणा म्हणतो. जर तुमच्या ऊर्जा आनंदी झाल्या, तर आपण त्याला परमानंद म्हणतो. जर त्या अधिक सुखी झाल्या, तर त्याला ब्रह्मानंद म्हणतो. कोणतेही अनुभव असोत, त्यासाठी एक समर्थक रासायनिक प्रक्रिया असते. कोणतीही रासायनिक प्रक्रिया असो, त्याचा एक परिणामी अनुभव असतो.
तुम्ही कोण आहात याचे मूलभूत रसायन बदलण्याचे आणि परमानंदाचे रसायन निर्माण करण्याचे पद्धतशीर वैज्ञानिक टप्पे आहेत. एकदा तुम्ही परमानंदाचे रसायन निर्माण केले, की तुम्ही स्वतःहून परमानंदी व्हाल, इतर कोणत्याही गोष्टीमुळे नाही. तुमच्या आंतरिक गोष्टींना इंजीनियर करण्याचा मार्ग आहे. जसे तुम्ही बाह्य गोष्टींचे इंजीनियरिंग करू शकता, तसेच तुम्ही तुमच्या आंतरिक गोष्टींचेही इंजीनियरिंग करू शकता. बाह्य सुख-सोयी निर्माण करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान असते, तसेच आंतरिक कल्याणासाठीही एक संपूर्ण विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे.
निर्मिती ते निर्माता
समजा तुम्ही एक केळ खाल्ले. काही तासांनंतर ते केळ मानव बनते. जर एखाद्या महिलेने केळ खाल्ले, तर ते केळ महिला बनते. जर एखाद्या पुरुषाने केळ खाल्ले, तर ते पुरुष बनते. जर एखाद्या बकरीने केळ खाल्ले तर ते बकरी बनते. केळे काही इतके हुशार नाही की, ते स्वतःला मनुष्य, महिला किंवा प्राणी यामध्ये बदलू शकेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये स्मृती आणि बुद्धिमत्ता आहे, जी तांदूळ, केळी किंवा भाकरीला मानवी शरीरात रूपांतरित करू शकते. फक्त एका भाकरीने तुम्ही या पृथ्वीवरील सर्वात जटिल यंत्रणा तयार करता!
शरीराची निर्मिती करणारा किंवा निर्मितीचा स्रोत आपल्या आत आहे. आता आपला एकमेव प्रयत्न हा आहे की, त्या स्रोतापर्यंत पोहोचायचे. एकदा तुम्हाला तुमच्या आत असलेल्या निर्मितीच्या स्रोतामध्ये प्रवेश मिळाला की, आरोग्य आणि कल्याण स्वाभाविकपणे साध्य होईल. या बुद्धिमत्तेचा एक जरी थेंब तुमच्या दैनंदिन जीवनात आला, तर तुम्ही जादुई जीवन जगाल, दुःखी नाही.
तुम्ही येथे निर्मितीचा एक भाग म्हणून जगत आहात किंवा निर्माता म्हणून अस्तित्वात आहात. योगामुळे तुम्हाला तुमच्या आत धडधडणाऱ्या निर्मितीच्या स्रोतामध्ये प्रवेश मिळतो. आम्ही अशा एका शक्यतेबद्दल बोलत आहोत, जिथे निर्मितीचा एक भाग स्वतःला निर्मात्यामध्ये रूपांतरित करू शकतो.
व्यक्तीपासून विश्वाकडे
"योग" शब्दाचा अर्थ "एकत्व" असा आहे. जेव्हा तुम्ही योगात असता, तुमच्या अनुभवात सर्वकाही एक झालेले असते. जर तुमचा जीवनानुभव निर्मितीच्या एका भागापुरता मर्यादित असेल, तर तुम्ही कधीही सर्वस्वासोबत एक होऊ शकणार नाही, कारण हे वेगळे आहे आणि ते वेगळे आहे. तुम्ही कितीही म्हटले की, आपण सगळे भाऊ-बहिणी आहोत, तरीही वेगळेपण आहे. फक्त तुमचा अनुभव जेव्हा निर्मितीच्या स्रोताकडे वळतो, तेव्हाच तुम्ही खरोखर या एकत्वाचा अनुभव घेऊ शकता. निर्मितीपासून निर्मात्यापर्यंत जाणे हेच योगाचे संपूर्ण तंत्रज्ञान आहे - त्या स्रोताशी संपर्क साधण्यासाठी विविध पद्धती शोधणे.
तुमच्या सध्याच्या अनुभवात, तुम्ही आहात आणि ब्रह्मांड आहे. मानवाला भेडसावणारा प्रत्येक प्रश्न - भय, असुरक्षा - तयार होतो, कारण जगणे "मी विरुद्ध ब्रह्मांड" असे आहे. योग म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक तुमच्या वैयक्तिक सीमा नष्ट करता, विचार आणि भावनेने नाही, तर प्रत्यक्ष अनुभवात. तुम्ही वैयक्तिक आणि विश्व एक केले आहे.
योग जसा साधारणपणे आज समजला जातो तसा व्यायाम प्रकार नाही. हा काही सकाळ-संध्याकाळचा एक सराव नाही. त्यात सराव आहे, पण तो एकमेव पैलू नाही. तुमच्या जीवनाचा प्रत्येक पैलू, तुमचे चालणे, श्वास घेणे, संवाद साधणे - सर्वकाही या एकत्वाकडे जाणारी एक प्रक्रिया बनू शकते. यातून काहीही वगळले जात नाही. ही एक कृती नाही, तर एक गुणधर्म आहे. जर तुम्ही तुमचे शरीर, मन, भावना आणि ऊर्जा एका निश्चित परिपक्वतेच्या पातळीवर विकसित केले, तर तुमच्या आत एक निश्चित गुणधर्म तयार होतो. तोच योग आहे.
- सद् गुरू
ईशा फाऊंडेशन