लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’ या नव्या हिंदी सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची देदीप्यमान कारकीर्द रूपेरी पडद्यावर आलीय. मराठी कादंबरीकार शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या बेस्टसेलर कादंबरीवर हा सिनेमा आधारित आहे. अभिनेता विकी कौशल यात शंभूराजे अर्थात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत असून, गेल्या दोन दिवसांत शिवशंभूप्रेमी सिनेरसिकांनी त्याच्यावर केलेला कौतुकाचा वर्षाव ही त्याच्या उत्तम अभिनयाची पोचपावतीच आहे.
स्वतःला आलम हिंदुस्थानचा बादशहा म्हणवून घेणारा औरंगजेब. आग्र्याच्या दरबारात मराठ्यांच्या राजाकडून अपमान झाल्यानंतर दुखावलेला औरंगजेब त्या राजाला आणि त्याच्या ९ वर्षांच्या मुलाला नजरकैदेत टाकतो. पण ती मगरमिठी चुकवून दोघेही बापलेक सुखरूप दख्खनेत येतात. तो बाप म्हणजे अवघ्या मराठी मुलखाचा स्वाभिमान अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांच्या हयातीत औरंगजेबाला दख्खन आपल्या ताब्यात घेणं जमलं नाही. भलंमोठं साम्राज्य गाठीशी असूनही केवळ दख्खनच्या छोट्याशा तुकड्यावर सत्ता मिळवण्याच्या उद्देशाने औरंगजेब तळमळत राहिला. पुढे शिवरायांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर दख्खनेतलं स्वराज्य आपल्या ताब्यात येईल म्हणून खूश झालेल्या औरंगजेबाला याची कल्पनाही नव्हती, की सिंह गेला असला तरी त्याचा छावा अजूनही जिवंत होता. हा परमप्रतापी छावा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज.
लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’ या नव्या हिंदी सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची देदीप्यमान कारकीर्द रूपेरी पडद्यावर आलीय. मराठी कादंबरीकार शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या बेस्टसेलर कादंबरीवर हा सिनेमा आधारित आहे. अभिनेता विकी कौशल यात शंभूराजे अर्थात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत असून, गेल्या दोन दिवसांत शिवशंभूप्रेमी सिनेरसिकांनी त्याच्यावर केलेला कौतुकाचा वर्षाव ही त्याच्या उत्तम अभिनयाची पोचपावतीच आहे. या सिनेमात अभिनेत्री रश्मीका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत असून, सरसेनापती हंबीररावांच्या भूमिकेत आशुतोष राणा आणि कवी कलश यांच्या भूमिकेत विनीत कुमार यांनी रंग भरला आहे. औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाची देहबोली वाखाणण्याजोगी आहे. त्याचबरोबर संतोष जुवेकर, आशिष पाथोडे, शिवराज वाळवेकर, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी, दिव्या दत्ता, डायना पेंटी, किरण करमकर, प्रदीप रावत, मनोज कोल्हटकर, शुभंकर एकबोटे, नीलकांती पाटेकर यांनीही सहायक भूमिका वठवताना मोलाची साथ दिली आहे.
सिनेमाची सुरुवात होते, ती दिल्लीदरबारी पोहोचलेल्या छत्रपती शिवरायांच्या निधनवार्तेने. शिवरायांच्या निधनानंतर आता स्वराज्यावर वर्चस्व मिळवू अशी स्वप्नं पाहणाऱ्या औरंगजेबाला पहिलाच दणका बसतो तो मराठ्यांच्या बुऱ्हाणपूर स्वारीने. स्वतः शंभूराजेंनी नेतृत्व केलेल्या या मोहिमेत औरंगजेबाची अतीव लाडकी नगरी असलेलं बुऱ्हाणपूर बेचिराख होऊन जातं. बुऱ्हाणपूरची दुर्दशा बघून दुखावलेला औरंगजेब आपला ‘ताज’ डोक्यावरून उतरवतो आणि शंभूराजेंना पुरतं नामोहरम केल्यावरच तो पुन्हा परिधान करण्याची शपथ घेतो. अवघ्या काही महिन्यात शंभूराजेंचा बंदोबस्त करू अशा कल्पनेने अवाढव्य सैन्य घेऊन दख्खनेत उतरलेल्या औरंगजेबाला पुढची तब्बल नऊ वर्षं ‘शंभू’ नावाचं वादळ बेदम झोडपत राहतं.
सूडाची भावना घेऊन स्वराज्यावर चालून आलेल्या औरंगजेबाला शंभूराजे युक्ती आणि शक्तीच्या बळावर कसं प्रत्युत्तर देतात, हे ‘छावा’मध्ये प्रभावीपणे दाखवलं गेलंय. गनिमी काव्याच्या बळावर अवाढव्य मुघल सैन्याला खिंडार पाडत मराठे औरंगजेबाला पदोपदी हताश करत राहतात. गृहकलहाचं काळं सावट एका हाताने दूर करत दुसऱ्या हाताने शंभूराजेंनी स्वराज्याचा कारभार सांभाळला होता. ‘छावा’ सिनेमात मात्र शंभूराजेंचं ‘रयतेचा राजा’ हे रूप दिसत नाही. संपूर्ण सिनेमात दिसतो तो एक आक्रमक योद्धा. क्वचित काही प्रसंगांमध्ये शंभूराजेंची हळवी बाजू दिसत असली, तरी त्याचं चित्रण फारसं प्रभावी झालेलं नाही. त्याउलट, अॅक्शन सीन्सवर घेतलेली अफाट मेहनत दिसून येते. त्या प्रसंगानुरूप वाजणारं ‘तूफान’ हे गीत वगळता सिनेमातली इतर गाणी आणि पार्श्वसंगीत मनात घर करण्यात अपयशी ठरते. ए. आर. रहमानसारखं दिग्गज नाव लाभलेलं असूनही छावा सांगीतिक आघाडीवर पुरता निराश करतो.
शंभूराजेंचा संपूर्ण जीवनपट तीन तासांत चितारणे प्रचंड आव्हानात्मक आहेच, पण महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडी टाळणे, हा यावर उपाय होऊ शकत नाही. छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर शंभूराजेंनी स्वराज्यरक्षण आणि स्वराज्यविस्तारासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सव्वाशेहून अधिक लढायांमध्ये अपराजित राहिलेल्या शंभूराजांचं युद्धकौशल्य उजेडात येत नाही. अॅक्शन सीन्समध्ये शंभूराजेंचं शस्त्रपारंगत असणं उठून दिसतं खरं, पण एक राजा म्हणून त्यांच्यात असलेलं सर्वांगीण युद्धकौशल्य न दाखवणं अधिकच खटकतं. शंभूराजेंची जंजिरा मोहीम, गोवा स्वारी, शाक्त पंथ आणि संबंध, साहित्यनिर्मिती अशा अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडी अप्रकाशित राहतात.
असं असूनही, छावा एक मासी फिल्म म्हणून यशस्वी ठरतो. याचं कारण, या सिनेमाचा क्लायमॅक्स. फितुरीने शंभूराजेंना संगमेश्वरात कैद केल्यानंतर त्यांना पुण्याशेजारच्या वढू मुक्कामी असलेल्या औरंगजेबाच्या तळावर आणलं गेलं. ज्यांची रणगर्जना सिंहाच्या डरकाळीसारखी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत घुमली, अशा शंभूराजेंच्या किंकाळ्या ऐकल्याशिवाय आपण ‘ताज’ परिधान करणार नाही, अशी शपथच औरंगजेबाने घेतली होती. त्यामुळेच शंभूराजेंचा दुर्दैवी मृत्यू होण्यापूर्वी जवळपास महिनाभर त्यांचा अनन्वित छळ केला गेला. या छळाचं परिणामकारक चित्रण सिनेमातल्या इतर चुकांवर पांघरूण घालण्यात यशस्वी ठरतं. हा छळ करताना अमानुषपणाचा कळस गाठूनही शंभूराजेंच्या तोंडून एकही किंकाळी ऐकू न आल्याने हताश झालेला क्रूरकर्मा औरंगजेब आणि एकेक जीवघेणा आघात सोसूनही सह्यगिरीसारखा ताठ उभा असलेला स्वाभिमानी संभाजीराजा हे चित्र मनातून जात नाही. ‘जगावं तर शिवबासारखं, मरावं तर शंभूसारखं’ असं कोण्या शिवशंभूप्रेमीनं प्रसवलेलं वाक्य पुन्हापुन्हा मनाशी आठवत आपण थिएटर सोडतो.
प्रथमेश हळंदे