गालावर खळी डोळ्यात धुंदी!

हसताना किंवा बोलताना गोबर्‍या गालावर पडणारी खळी ही त्या व्यक्तीचे केवळ सौंदर्यच खुलवत नाही, तर हजारो व्यक्तींच्या गर्दीतही त्या व्यक्तीला खास बनवताना अधिक आकर्षक बनवून जाते.

Story: शब्दगीते |
15th February, 07:14 am
गालावर खळी डोळ्यात धुंदी!

गालावर पडणाऱ्या या खळीत अनेकांनी आपला जीव कुर्बान केला आहे. आणि जेव्हा स्वप्नील बांदोडकरने गायलेल्या ‘गालावर खळी डोळ्यात धुंदी’ हे गाणे आपल्या कानावर पडते, तेव्हा आपल्यासमोर गालावर गोड खळीचे सौंदर्य लेवून मोहक हास्याची ‘ती’ नजरेसमोर क्षणार्धात तरळून जाते.

‘गालावर खळी डोळ्यात धुंदी

ओठावर खुले लाली गुलाबाची

कधी कुठे कसा तुला सांग भेटू

वाट पाहतो मी एका इशार्‍याची

जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू

माझा रंग तू घे तुझा रंग मला दे’

डोळ्यांत धुंदी असताना आणि गालावराची गोड खळीत हसणारी ती पाहिली की तिच्या ओठांवरची लाली ही गुलाबासारखी लाल आहे हे त्याच्या चटकन लक्षात येते आणि त्याचा जीव कसा अगदी वेडापिसा होऊन जातो. जेव्हा ती त्याच्याकडे अशा मोहक हास्याने एक नजरेचा तिरपा कटाक्ष टाकते, तेव्हा तिला भेटण्याची त्याची इच्छाही तीव्र होते. तिचा दुरावा त्याला सहन होत नाही आणि तो तिला दूर नको जाऊस अशी विनवणी करताना मिलनाचे संकेत देतो.

गीतकार चंद्रशेखर यांच्या या गीतातील शब्दांना अजय अतुल या संगीत महारथीच्या जोडगोळीने सुंदर अशी धावती चाल देऊन या गाण्याची लज्जत अधिकच खुलवली आणि स्वप्नील बांदोडकरने आपल्या मोहक अदाकारीत हे गीत गाताना अनेकांच्या हृदयाची धडधड वाढवली...

‘कोणता हा मौसम मस्त रंगाचा

तुझ्या सवे माझ्या जिवनी आला

सुने सुने होते किती मन माझे

आज तेच वाटे धुंद मधुशाला’

जेव्हा गालावरच्या खळीत सामावलेले मोहक हास्य घेऊन ती त्याच्या त्याच्या जिवनी प्रवेशली, तेव्हा त्याच्या जीवनात प्रेमाचा मस्त मौसमच असा काही फुलला! आणि या प्रेमाच्या प्रेमरसात बेधुंद होताना त्याला जगण्याची मजा कशात आणि किती आहे ते कळून चुकले... आणि त्याला आता सांगावेसे वाटते की मी फक्त आणि फक्त तुझाच आहे राणी! तुझ्याशिवाय मी कोणाचाच नाही! आणि हे शब्दरूपात मांडताना या गाण्याचे गीतकार चंद्रशेखर सानेकर लिहितात...  

‘जगण्याची मज आता कळते मजा

नाही मी कोणाचा आहे तुझा

जगण्याची मज आता कळते मजा

नाही मी कोणाचा आहे तुझा!’

एखाद्या व्यकीच्या प्रेमाचे वेड लागते, तेव्हा बेचैनी, अस्वस्थता यांचा ताबा मनावर येतो आणि आपल्याला प्रेमाशिवाय दुसरे काहीच सुचत नाही. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी जीव वेडा होताना तिच्यासाठी जीव अक्षरश: झुरणीस लागतो. तिच्याच मागे पुढे घुटमळत राहतो... आणि मग ती कधी भेटेल आणि प्रेमाच्या रंगात न्हाऊ घालेल याची आस लागून राहते.

‘सांगतो मी खरे खरे, तुझ्यासाठी जीव झुरे, मन माझे थरारे, कधी तुझ्या पुढे मागे, करतो मी इशारे

तुझ्या पापण्यांच्या सावली खाली

मला जिंदगी घेऊन आली

तुझ्या चाहुलीची धुंदी आनंदी

अंतरास माझ्या छेडूनी गेली...’

रोजचे चाकोरीबद्ध जीवन जगताना जीवनात तोच तोच एकसूरीपणा आलेला असतो. जीवनातला आनंद हा कुठेतरी नाहीसा झालेला असतो. परंतु जेव्हा ती आपले सुंदरसे खळीदार हास्य घेऊन त्याच्या जीवनात आली, तेव्हा तिच्या येण्याने जीवनाला आता बहार आला! तिच्या प्रेमाच्या वर्षावात जगण्याची मजा आणि त्यासोबत येणारी प्रेमाची नशाही काहीतरी जादू करणारी आहे. आणि जादुगिरी अनुभवण्यासाठी तो आतुर झाला आहे... आणि त्याला तिच्याच भेटीची आत्यंतिक आस लागून राहिली आहे... या सर्व भावना गीतकाराने आपल्या शब्दांत मांडल्या आणि गायक स्वप्नील बांदोडकरने आपल्या सुरमयी आवाजात त्या प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचवल्या.

‘जगण्याची मज आता येई नशा

तू माझे जीवन तू माझी दिशा

आता तरी माझ्यावरी, कर तुझी जादूगिरी

हुरहूर का जीवाला, बोल आता काही तरी 

भेट आता कुठेतरी, कसला हा अबोला!’

तिच्याशिवाय तळमळणारा जीव आणि मनाला लागलेली हुरहूर, तिच्या भेटीची आत्यंतिक ओढ हे सर्व काही या गीतांच्या ओळींत स्पष्ट झाले आहे.


कविता आमोणकर