‘मीठ तुम्हाला तारी, मीठ तुम्हाला मारी!’ असं म्हंटलं जातं. मिठाचे शरीराला योग्य त्या प्रमाणात सेवन न केल्याने असे परिणाम दिसून येतात. जेवणात मिठाचे महत्त्व किती हे सांगायची आवश्यकता नाही. आज आपल्याकडे मीठ मुबलक प्रमाणात असल्याने स्वस्त आहे म्हणून आपल्याला त्याची किंमत नाही पण पूर्वीच्या काळी मीठ दुर्मिळ होते.
विशेषत: युरोप मध्ये तसेच समुद्रापासून लांब असलेल्या भागात मीठ ही एक अतिशय मौल्यवान वस्तु होती. कारण बैलाच्या पाठीवर लादून जड मिठाच्या गोण्या कित्येक मैल प्रवास करत, चोर लुटारूंपासून बचाव करत आणाव्या लागत. थंडी असल्याने उत्तरेकडील समुद्रात पाण्याचे बाष्पीभवन होत नाही, त्यामुळे मीठ तयार होत नाही आणि त्यांना मांस टिकवून ठेवायला मीठ तर लागायचेच.
बऱ्याच ठिकाणी सगळे व्यवहार, देवाणघेवाण मिठाच्या बदल्यात केले जायचे. कारण ती एक जीवनावश्यक गोष्ट होती आणि आहे आणि असणार. अनेक शहरांचे महत्त्व आणि स्थान मिठाच्या व्यापारामुळे वाढले. आता आपण हॉटेलमध्ये खायला जातो तेव्हा तिथे टेबलवर मिठाची डबी ठेवलेली आढळते पण पूर्वी हा मान फक्त अति श्रीमंत लोकांनाच असायचा. मीठ ठेवायच्या डब्या पण खूप भारी हस्तिदंत, लाकडी कोरीव काम केलेल्या, सोन्या चांदीच्या महागड्या असायच्या. मीठ मिळवायचे सोर्स म्हणजे खाणीतून आणि समुद्रापासून आपल्या देशाला खूप मोठी किनारपट्टी आणि उष्ण हवामान लाभल्याने बाष्पीभवन होऊन मोठ्या प्रमाणात मिठाचे उत्पादन होते. पण डोंगराळ प्रदेशात थंड हवामानात मीठ मिळवणं जिकिरीचं काम असतं.
आमच्या एका पूर्व युरोपच्या टुरमध्ये मी पोलंडमध्ये मिठाची खाण पाहिली आणि आश्चर्यचकित झाले. आता त्या खाणीतून मीठ काढले जात नाही पण त्याला भेट देता येते. लाकडी अवघड, अरुंद जिन्याच्या मार्गाने हजार फुटापेक्षा खाली खोलवर जावे लागते. मीठ कसे काढले जात होते हे दर्शवणारे पुतळे बनवलेले आहेत. हे मीठ पांढरे नसून काळपट रंगाचे होते. पोलंडमध्ये मीठ हे फारच मौल्यवान मानले जायचे. एका राजाने हुंड्याचा भाग म्हणून मीठ मागितले होते. ही प्राचीन खाण एक पोलंडचे ऐतिहासिक स्थळ मानले जाते. ही गुहा तीन स्तरात आहे. एका लेव्हलवर मोठा प्रार्थना हॉल, चर्च कोरून काढून घडवले आहे. मोठे झुंबरही या मिठाचेच आहे. इथे जमीन, छत भिंती सारेच मिठाचे. कोरीव काम केलेले पुतळे आहेत. एका लेव्हलवर म्युझियम शॉप आहे.
आपल्या देशात काही ठिकाणी डोंगरातून गुलाबी रॉक सॉल्ट मिळते पाकिस्तानात असे बरेच डोंगर आहेत. काही ठिकाणी सैन्द्धव मीठ सापडते जे औषधी असते. जास्त करून समुद्राच्या पाण्यापासून मिळणारे मीठ आपण वापरतो. आम्ही पण पूर्वी रायबंदरहून विकत आणायचो. एक लात म्हणजे तेलाचा डबा भरून मीठ दहा बारा रुपयांना मिळायचे. ते थोडे काळपट असायचे. आताही नारळाच्या झाडांना आम्ही तेच मीठ घालतो. उन्हाळ्याच्या दिवसात अशी मिठागरे दिसतात.
एकदा सहज रुक्मिणीने कृष्णाला विचारले मी तुम्हाला किती आवडते यावर श्रीकृष्ण म्हणाले मिठाइतकी आवडतेस. याचा अर्थ न कळल्याने ती नाराज झाली, पण कोणत्याही पदार्थाला मीठाशिवाय चव नाही तसं तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला अर्थ नाही हे सांगितल्यावर तिचे समाधान झाले. सॅलरी हा शब्द सॉल्टपासून तयार झाला असं मानतात कारण मीठ विकत घेण्यासाठी पूर्वी रोमन लोकांना भत्ता दिला जायचा त्याला सॅलरियाम म्हणायचे. सलरी आणि सॉल्ट दोन्हीही खूपच महत्त्वाचे.
अगदी प्राचीन काळापासून पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी मिठाचा वापर केला जात असे. प्राणी मारून उरलेले मांस टिकवून ठेवण्यासाठी ते खारवले जायचे. इजिप्शियन लोक मृत शरीर टिकून राहण्यासाठी वापरत होते. आताही आपण पदार्थ टिकवण्यासाठी मीठ वापरतो लोणचे खारवलेले मासे मिरच्या भरपूर मिठात सुकवले की पावसाळ्याची बेगमी होते. मिठाचा उपयोग जंतूनाशक म्हणून पण केला जायचा. आताही घशाला सूज, सर्दी, खोकला यासाठी मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायला सांगतात. अंगावर सूज आली असेल, मिठाचा शेक द्यायला सांगतात. खाण्यासाठी वापरले जाते त्यापेक्षा किती तरी पटीने मीठ औषधासाठी वापरले जाते. मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे आरोग्यदायक मानतात म्हणून गोव्यातील बरेच लोक उन्हाळ्यात मुद्दाम समुद्र स्नानासाठी जातात. मीठाला संस्कृतीतही एक महत्त्वाचे स्थान आहे. आपण बाळाची किंवा कुणाची दृष्ट काढतो तेव्हा हातात मीठ मोहरी घेतो. फ्रांस जर्मनीमध्ये लग्नाला जाताना वधू-वराला मिठाची पुडी जवळ ठेवायला देतात. प्रजनन चांगले होण्यासाठी असे ते मानतात.
मैत्रीत किंवा विश्वासासाठी मीठ ज्याचे खाल्ले त्याच्याशी बेमानी करू नये असा प्रघात आहे. मिठाची शपथही प्रामाणिकतेचे प्रतीक असते. ज्या घराचे मीठ खाल्ले, त्याच्याशी प्रामाणिक राहिले पाहिजे ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. मीठ हातातून सांडणं हा अपशकुन मानला जातो. मांत्रिक तांत्रिक मिठाच्या वापराने भुताला पळवून लावतात. मार्गशीर्ष गुरुवारच्या कहाणीत राजकन्या शामबाला आपल्या माहेरी येते तेव्हा तिची आई ती परत सासरी जाताना तिला काहीच देत नाही. कारण ती रागावलेली असते. शामबाला तिथून एक मिठाने भरलेला हंडा बरोबर नेते. तिचा पती तिला विचारतो माहेराहून काय आणलं तेव्हा ती सांगते, थांबा आणि सगळे जेवण अळणी बनवते. राजाला ते आवडत नाही. मग त्यात मीठ घालते तेव्हा सगळे पदार्थ चविष्ट लागतात. ती म्हणते मी राज्याचे सार आणले. यावरून मिठाचे महत्त्व कळते.
आपल्या शरीराला मिठाची गरज असते, फक्त ते योग्य प्रमाणात घेतले पाहिजे. नाहीतर जास्त बीपी वाढू शकते कमी खाल्ले तरीही तुम्ही अशक्त होऊ शकता. म्हणूनच मीठ तारक ही आहे आणि मारक ही आहे असं म्हणतात. आपले रक्त, लाळ, शेंबूड, घाम, वीर्य सगळ्यात मिठाची खारट चव असते.
मीठ हे समरसतेचे एकरूप होण्याचे प्रतीक आहे. पाण्यात मीठ घातले तर ते पाण्याशी एकरूप होऊन जाते. पूर्णपणे पाण्यात विरघळून जाते दिसेनासे होते. साई लीलामृतमध्ये एक उदाहरण आहे. ‘सागरी रिघाली करू आंघोळी। परतेल काय सैन्द्धवाची पुतळी।।’ संत समागमाची ही क्रिया. भगवंताच्या चरणी लीन झालेला भक्त पूर्णपणे त्याच्या रूपात समरस होतो. जसे सैन्द्धव मिठाचा पुतळा समुद्रात आंघोळीसाठी बुडवला तर तो पूर्णपणे विरघळून जाईल. मिठाचा हा गुणधर्म विरघळून जाण्याचा समरस होण्याचा. अशी ही मिठाची किमया.
प्रतिभा कारंजकर, फोंडा