गोव्याच्या प्रतीक्षा, सूरज, उदेश, सुनीलला कांस्यपदक

३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : स्पर्धेत गोव्याच्या खात्यात एकूण ९ पदके

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th February, 10:02 pm
गोव्याच्या प्रतीक्षा, सूरज, उदेश, सुनीलला कांस्यपदक

पणजी : उत्तराखंड येथे सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पेंटाथलॉन प्रकारात गोव्याचे चमकदार प्रदर्शन सुरूच आहे. मॉडर्न पेंटाथलॉनमध्ये ट्रायथल मिश्र रिले प्रकारात गोव्याच्या प्रतीक्षा वेळीप - सूरज वेळीप जोडीने, तर ट्रायथल पुरुषांच्या सांघिक प्रकारात उदेश माजिक व सुनील गावकर यांनी कांस्य मिळवले.

गोवा पदकतक्त्यात २५व्या क्रमांकावर

या पदकांबरोबरच गोव्याच्या पदकांची एकूण संख्या आता ९ झाली असून गोवा पदकतक्त्यात २५व्या क्रमांकावर पोहोचला आहे. आजच्या पदकांव्यतिरिक्त गोव्याने स्क्वॉश प्रकारात १ सुवर्ण, योगासनमध्ये १ सुवर्ण, वॉलिबॉलमध्ये एक कांस्य व मॉडर्न पेंटाथलॉनमध्ये ३ रौप्य व ३ कांस्यपदके पटकावली असून आता पदकांची संख्या ९ झाली आहे.

ट्रायथल मिश्र रिलेमध्ये महाराष्ट्रच्या शरवानी निलवर्ना व मयंक चाफेकर या जोडीने १८.२०.४५ सेकंदाचा वेळ नोंदवत सुवर्ण व अनिष्का आणि बसंत तोमर या हरियाणाच्या जोडीने १८.४९.१७ सेकंदाचा वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले. गोव्याच्या जोडीने १८.५३.१३ सेकंदाचा वेळ नोंदवला.

ट्रायथल पुरुषांच्या सांघिक प्रकारात हरियाणाच्या बसंत तोमर-शुभमन जोडीने ५१.२४.९५ सेकंदाचा वेळ नोंदवत सुवर्ण, उत्तराखंडच्या करन नेगी-रिषभ नेगी जोडीने ५१.२७.४३ सेकंदाचा वेळ नोंदवत रौप्य पटकावले. या प्रकारात गोव्याच्या उदेश व सुनील या जोडीने ५४.२०.५१ सेकंदाचा वेळ नोंदवत कांस्य आपल्या नावावर केले.

या स्पर्धेत गोव्याच्या एकूण ९ पदकांपैकी ६ पदके ही केवळ पेंटाथलॉनमधून मिळालेली आहेत. यावरून गोव्याच्या संघाचे पेंटाथलॉन प्रकारात वर्चस्व दिसून येत आहे. गतवर्षी गोव्यात झालेल्या पेंटाथलॉनमध्येही गोव्याच्या संघाने चमकदार कामगिरी करताना ८ पदके पटकावली होती. या स्पर्धेतील लेझर रनमध्ये गोव्यातर्फे शनिवारी मिश्र रिलेमध्ये नेहा गावकर, बाबू गावकर यांना रौप्य, पुरुष वैयक्तिकमध्ये बाबू गावकरला रौप्य व महिला सांघिकमध्ये नेहा गावकर, अंकिता वेळीप व वैष्णवी वडार यांना कांस्य पदक मिळाले होते.