रथसप्तमी

सावित्रीने आपले काम आटोपले. मालकीण मात्र आपल्या खोलीत साड्या, दागिने निवडत होती. सावित्री विचार करू लागली, 'रूपाने सुंदर असून काय उपयोग? मन तर आतून कुरूपच आहे. त्याचे काय?'.

Story: कथा |
09th February, 05:29 am
रथसप्तमी

नकळत आज उशीर झाला. मालकीण ओरडणार म्हणून लवकर लवकर सावित्री निघाली. मालकीण खूप दिवस कामात व्यस्त असल्यामुळे तिचा हळदीकुंकू करायचा राहिला. आज शेवटचा दिवस रथसप्तमीचा म्हणून आज त्यांचा हळदीकुंकू. घरी बायका येणार म्हणून लवकर बोलवले होते पण तरीही उशीरच झाला. सावित्रीच्या पावलांच्या गतीबरोबरच तिची काळजी आणि भीतीही वाढू लागली.

हळूहळू सूर्य डोक्यावर चढत होता. घरात गेल्यावर काय होईल आणि काय नाही याचा सावित्री विचार करतच होती. तिने आपले मन घट्ट केले होते. आता वाट्टेल ते ऐकून घ्यावे लागणार हे तिला कळून चुकले. विचारात मग्न असलेली सावित्री अपार्टमेंटच्या गेटकडे कधी पोहोचली ते तिचे तिला कळले नाही. बिल्डींगखाली पोहोचते तेवढ्यात तिने पायाखाली पडलेली एक निमंत्रण पत्रिका उचलली. तिने नाव वाचले, ‘हळदी कुंकू समारंभ वेळ पाच ते साडेसात.’ सावित्रीला आश्चर्यच वाटले. लोक आता निमंत्रण पत्रिकाही वाटू लागले! अचानक तिला आठवलं आता वेळ घालवून उपयोग नाही. मालकिण ओरडणार म्हणून लिफ्टमधून झपाझप वर गेली. 

किल्ली तिच्याकडे असल्यामुळे हळूच दार उघडले. मालकिण घरी नव्हती हे तिच्या लक्षात आले. हायसे वाटून ती म्हणाली, “बरं झालं!” लवकर तिने कामं आटपायला सुरुवात केली. हळदी कुंकवाचं वाण आणण्यासाठी मालकिण बाहेर गेली असावी, तिच्या लक्षात आले. तिने आवरायला घेतले. किचनमध्ये भांडी तशीच पडलेली होती. ‘खरकटे सुद्धा बाजूला काढून ठेवायचे कळत नाही या माणसांना’ सावित्रीने मनातल्या मनात विचार केला. अचानक बेल वाजली. सावित्रीने दार उघडले. पाहते तर मालकीण वाण घेऊन आली होती. तिच्या मालकीणीचा स्वभाव तिला माहीत होता. तिचे ते काटेरी शब्द कानी नको पडायला म्हणून तिने स्वत:च पिशव्या घेतल्या. मालकीण म्हणाली, “आज सात वाजता घरी जा.” सावित्रीला आधीच कल्पना होती, की आज लवकर जायला मिळणार नाही. पोट भरण्यासाठी काम सोडू शकत नव्हती म्हणून तिचाही नाईलाज होता. 

सावित्रीने आपले काम आटोपले. मालकीण मात्र आपल्या खोलीत साड्या, दागिने निवडत होती. सावित्री विचार करू लागली, ‘रूपाने सुंदर असून काय उपयोग? मन तर आतून कुरूपच आहे. त्याचे काय?’ अचानक मालकिणीने हाक मारली, “संध्याकाळच्या खाण्यापिण्याकडे लक्ष दे. बायकांना काही कमी पडायला नको. नाहीतर तुला चांगलं माहीत आहे की मी काय करणार.” सावित्री गप्पच राहिली. तसेही असे काही सावित्रीला सांगायची गरज नव्हती. आपले काम सावित्री नेहमीच चोख पार पडत असे. सावित्री आता हॉल सजवायच्या कामाला लागली. 

संध्याकाळची वेळ झाली. दुपारभर खपून सावित्रीने सगळे घर चकचकीत केले. महागातल्या गालिचाने हॉल सजला. ठिकठिकाणी कृत्रिम फुलांनी कोपरे सजले. ठेवणीतली महागडी भांडी बाहेर येऊन त्यात चणे, तिळगुळ, मिठाया, सामोसे, काजू, बदाम, पिस्ता विराजमान झाले. वाण नित लावून ठेवले. एवढ्यात मालकीणबाई असलेले नसलेले दागिने घालून भरजरी साडीत बाहेर आल्या. अत्तराचा सुवास सुद्धा भपकारा वाटला सावित्रीला. पदर हातावर सोडून त्या सुवासिनींची वाट बघत आरामात सोफ्यावर बसल्या. काहीतरी वाटले म्हणून सावित्रीकडून आरसा आणून त्यांनी पुन्हा आपले रुपडे आरश्यात न्याहाळले. त्यांच्या ओठांची रेष जराशी हलली. ‘मनमोकळेपणे हसता पण येत नाही यांना?’ सावित्रीने मनोमन म्हटले. 

सुहासिनी यायला लागल्या, हळदीकुंकू होता म्हणून आज जरा सावित्रीला शब्द कमीच टोचत होते. पण तशीही तिला सवय झालीच होती. मालकीणबाई मात्र आलेल्या बायकांशी अगदी गोड गोड बोलत होत्या. दागदागिने दाखवून स्वतःचे कौतुक करून घेत होत्या. वाण सुद्धा तेवढेच महाग होते. खोट्या खोट्या कौतुकात मालकीणबाई अगदी सुखावून जात होत्या, पण त्यांची पाठ वळली की आलेल्या बायका एकमेकांना डोळे मोडत होत्या. निमंत्रणाची वेळ संपत आली. मालकिणीचा मूळ स्वभाव परत आला. चेहऱ्यावरचे हसू पुसून तिथे आता मग्रुरी आली. भिवया आपोआप उंचावल्या. तिने सावित्रीला सांगितले, “दार लावून घे. हळदीकुंकवाची वेळ संपली.” पण सावित्रीला माहीत होते, अजून एक महत्त्वाची व्यक्ती यायची राहिली होती. तिचे हात अवघडले. पण तिचा नाईलाज होता. तिने दार बंद केले. सावित्रीने पटापटा आवरले व घरी जायला निघाली. 

अचानक बेल वाजली. मालकीण आतून म्हणाली, “कोणी आले असेल तर जायला सांग, समारंभाची वेळ संपली फुकट वाटण्यासाठी वाण उरले नाहीत.” सावित्रीने दार आधीच उघडले होते, समोर मालकीणीची आईच होती. मालकिणीच्या अपशब्दाने दोघेही मौन झाले. आईच्या डोळ्यातून आसवे बाहेर पडता पडता त्यांनी ती टिपून घेतली. सावित्री नि:शब्दच राहिली.... बर्फासारखी थिजून राहिली. सावित्री मनात म्हणाली, ‘वेळेची किंमत तर संपलीच पण रथसप्तमीबरोबर माणुसकीही संपली. जर मी विवाहित असते तर मला तरी दिले असते का वाण?’


महादेव गावस