जीपीएससी - ‘शुक्रवार’ लक्षात ठेवा

प्रत्येक उमेदवाराने ज्याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गोवा सरकारमध्ये ‘गॅझेटेड ऑफिसर’ व्हायचे आहे त्याने या ‘शुक्रवार’कडे गांभिर्याने लक्ष देणे आवश्यक ठरते.

Story: यशस्वी भव: |
09th March, 03:29 am
जीपीएससी -  ‘शुक्रवार’ लक्षात ठेवा

गोव्यामध्ये गोवा पब्लिक सर्विस कमिशनतर्फे अनेक ठिकाणी दर महिन्याला काही जागा भरल्या जातात. जशी जशी रिक्त पदे उपलब्ध होतात, त्या त्या प्रमाणे त्या जागा उपलब्ध होतात. याची जाहिरात गोव्यातील सर्व आघाडीच्या वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध केली जाते. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी जीपीएससीच्या जाहिराती पेपरात झळकतात व त्यानुसार त्या विशिष्ट पदासाठीचा सर्व तपशील त्यामध्ये असतो. परीक्षा पद्धती प्री स्क्रिनींग, स्क्रिनिंग परीक्षा, लेखी, दिर्घोतरी परीक्षा, परीक्षेच्या तारखा, पात्रता, अभ्यासक्रम या सर्व गोष्टींचा ऊहापोह यामध्ये असतो त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने ज्याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गोवा सरकारमध्ये ‘गॅझेटेड ऑफिसर’ व्हायचे आहे त्याने या ‘शुक्रवार’कडे गांभिर्याने लक्ष देणे आवश्यक ठरते. 

ज्युनिअर स्केल ऑफिसर मामलेदार, बीटीओ, सब रजिस्ट्रार, मेडिकल ऑफिसर, सरकारी शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षक प्राध्यापक, विजिलन्स ऑफिसर, थोडक्यात अनेक क्लास II अधिका-यांची नियुक्ती या जीपीएससीमधून केली जाते. मामलेदार आणि सब रजिस्ट्रार पदासाठी कायद्याचे पदवीधर होणे खूप अनिवार्य आहे. कारण जमीनजुमला कायदा, रेव्हेन्यू कायदा, हस्तांतरण कायदा, एविडन्स अॅक्ट यासारखे विषय त्यांना कामावर असताना हाताळावे लागतात. स्क्रीनिंग परीक्षा व तद्नंतर मुलाखत या पद्धतीने जीपीएससीतर्फे पोस्ट भरल्या जातात. जुनिअर स्केल ऑफिसर हे एक प्रकारे ‘डेप्युरी कलेक्टर’ ला समकक्ष पोस्ट आहे. जेवढी मोठी पोस्ट तेवढी जास्त परीक्षा (प्री-स्क्रिनिंग, स्क्रिनिंग लेखी परीक्षा व मुलाखत) असते. काही खालच्या पोस्टसाठी लेखी परीक्षा घेतली जात नाही. युपिएस‌सीची तयारी केलेल्या उमेदवाराला जीपीएससी 'क्रॅक' करणे मुळीच अवघड नाहीये. त्यामुळे सर्वांनी 'शुक्रवार'ची दैनिके नक्की वाचावीत.

जीपीएससी आणि गोव्याचा स्वातंत्र्यलढा

जीपीएससी परीक्षांमध्ये इतिहास या विषयावर जसा जगाचा आणि भारताचा इतिहास अभ्यासावा लागतो, तसाच गोव्याचा इतिहास सुध्दा अभ्यासावा लागतो. गोव्यावर पोर्तुगीजांनी अनेक शतके राज्य केले. सोळाव्या शतकामध्ये आलेले पोर्तुगीज भारत देशाच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा गोव्यावर राज्य करत होते. त्यानंतर एका देशव्यापी उठावानंतर पोर्तुगिजांना गोवा सोडावे लागले. कुंकळ्ळी उठाव, राणेंचा उठाव तसेच मडगाव येथील राम मनोहर लोहिया यांच्या पुढाकाराने झालेली चळवळ या सर्व गोष्टी गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यांशी सीमित आहेत. 

खुपदा विद्यार्थ्यांना या विषयाचा अभ्यास करण्यासाठी अधिकृत केलेले पुस्तक, नोट्स काहीच मिळत नाही. इतिहास हा सांगोपसांग, कादंबरीतून शिकला जात नाही. त्या इतिहा‌साला अधिकृत मान्यता देखील लागते. गोवा राज्य पाठयपुस्तक महामंडळ यांनी एनसीईआरटीला अनुसरून शालेय इतिहासाची इयत्ता ९ वी व इयत्ता १० वीची खास ‘गोव्याचा स्वातंत्र्यलढा’ विषयाचे छोटेखानी पाठ्यपुस्तक तयार केलेले आहे. जीपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी हे पाठ्यपुस्तक वाचणे व अभ्यासणे अति-आवश्यक आहे. 

एका टॅब्युलर फॉर्ममध्ये जर इतिहास लिहिला, तारखेनुसार, सनावळीनुसार, घटनेनुसार इतिहास लिहिला व रोज एका 'ग्लांस’ वर तो पडताळून पाहिला तर तो लक्षात तर रहातोच, परंतु एकच गोष्ट/चित्र रोज १० दिवस बघितल्याने सनावळी लक्षात रहातात. इतिहासाचे पुस्तक वाचताना मनपटलावर एक काल्पनिक चित्रपट तयार करावे व त्या पद्धतीने संपूर्ण इतिहासाचा थोडक्यात गोव्यातील स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास करावा. एखादी घटना जशी मनात कोरते तसा हा स्वातंत्र्यलढा मनावर कोरला जाईल व जीपीएससीच्या परीक्षेच्या वेळेस चांगले गुण मिळतील. त्यामुळे इयत्ता ९ वी व १० वी चे इतिहासाचे शालेय पाठ्यपुस्तक वाचावे.


अॅड. शैलेश कुलकर्णी,
कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि
करिअर समुपदेशक आहेत.)