रेल्वे स्थानकांना केवळ विरोधासाठी विरोध नको...

रेल्वेसुविधा या लोकांच्या दळणवळणाचा महत्त्वाचा दुवा असल्याने त्यासाठी नाहक विरोध होणार नाही, याची काळजी स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनही घेण्याची गरज आहे. वादापेक्षा संवादातून या रेल्वेस्थानकांच्या उभारणीचा प्रश्न सुटल्यास कामांचा वेग वाढून वेळही वाचणार आहे.

Story: कॉलिंग अटेंशन |
09th March, 03:47 am
रेल्वे स्थानकांना केवळ विरोधासाठी विरोध नको...

कोकण रेल्वे मार्गावर नव्या तीन स्थानकांची घोषणा करण्यात आल्यापासून राज्यातून या स्थानकांच्या उभारणीला विरोध दर्शवण्यात येत आहे. ग्रामसभांतून ठराव संमत करण्यात आलेले असून सरकारी पातळीवर निवेदनेही देण्यात येत आहेत. या स्थानकांची उभारणी केवळ प्रवासी वाहतुकीसाठी केली जाणार असून स्थानकांमधील अंतर कमी करण्यासाठी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी याचा वापर होणार असल्याचे राज्य सरकार व कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे केवळ विरोधासाठी विरोध केला जावू नये.

मडगाव येथे फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती व त्यादिवशी दक्षिण पश्चिम रेल्वे विभागासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ४८२ कोटींची तरतूद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याशिवाय गोव्यात रेल्वेची, रेल्वे रुळाची, रेल्वे दुपदरीकरण, स्थानकांची उभारणी व इतर अशी ५६९६ कोटींची कामे सुरु असल्याची माहितीही देण्यात आली. मात्र, कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे दुपरीकरणांची व विद्युतीकरणाची कामे ही कोकण रेल्वे महामंडळातर्फेच केली जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आलेले होते. याच कार्यक्रमावेळी कोकण रेल्वे मार्गावरील तीन स्थानकांच्या उभारणीबाबतची माहिती जाहीर करण्यात आली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी राज्य सरकारकडून माहिती देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही सारझोरा, नेवरा व मये याठिकाणी कोकण रेल्वे मार्गावर तीन रेल्वेस्थानकांची उभारणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच या रेल्वेस्थानकांची उभारणी ही केवळ प्रवाशांच्या वाहतुकीसाठी करण्यात येत असल्याचेही स्पष्ट केलेले होते. 

राज्यात तीन रेल्वेस्थानकांची उभारणी होणार असल्याचे जाहीर होताच त्या त्या भागातील नागरिकांकडून रेल्वेस्थानकांना विरोध असल्याचे जाहीर करण्यात आले. प्रस्तावित तीन रेल्वेस्थानकांच्या उभारणीबाबत लोकांच्या मनात काही शंका असून त्यांची चिंताही वाढलेली आहे. लोकांच्या मनातील रेल्वेस्थानकाच्याबाबतीतील शंका दूर करण्याच्या हेतूने कोकण रेल्वे अधिकार्‍यांकडूनही नेवरा, सारझोरा व मये याठिकाणी तीन रेल्वेस्थानकांची उभारणी  केवळ कोकण रेल्वेच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्याच्या हेतूने, दोन स्थानकांतील अंतर कमी करण्यासाठी नव्या स्थानकांची उभारणी होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, स्थानिक रहिवाशांकडून कोळशाची हाताळणी व वाहतूक वाढवण्यासाठीच हा सर्व प्रकार होत असल्याचे सांगितले. राज्य सरकारकडून लोकांना विश्वासात घेण्यात आलेले नाही व रेल्वेस्थानकांच्या उभारणीची घोषणा करण्यात येते हे चुकीचे आहे. ज्या भागात रेल्वेस्थानकांची उभारणी होणार आहे, त्याठिकाणच्या ग्रामपंचायतीला याची कल्पना देण्याची गरज आहे. त्याशिवाय गावातील लोकांची मतेही जाणून घेण्याची गरज होती मात्र, तसे काहीही न करता घोषणा करण्यात आली. यामुळे या रेल्वेस्थानकांच्या उभारणीच्या मागे काहीतरी छुपा अजेंडा असावा असा तर्क स्थानिकांकडून लढवला जात आहे. 

कोकण रेल्वे प्रशासनाकडूनही त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना नव्या स्थानकांचा कोणताही त्रास होणार नाही. या स्थानकांच्या उभारणीसाठी आणखी जमिनीचे संपादन केले जाणार नाही तर कोकण रेल्वेकडे उपलब्ध असलेल्या जागेतच रेल्वेस्थानकांची उभारणी केली जाणार असल्याचे सांगितले. स्थानिकांनी चिंता व्यक्त केलेली असली तरीही रेल्वेच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी काही गोष्टी गरजेच्या आहेत. रेल्वेची वाढलेली गाड्यांची संख्या व वर्दळ यामुळे रेल्वेस्थानकांवर फलाटांची कमी भासत आहे. ज्याठिकाणी रेल्वेस्थानके आहेत, त्याठिकाणी आणखी जागा उपलब्ध नाही त्यामुळे फलाटांची संख्या वाढवणेही शक्य होणार नाही. गाड्यांना होणारा विलंब कमी करण्यासाठी व प्रवाशांना वेळेत त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचता यावे यासाठी ज्या दोन स्थानकांतील अंतर जास्त आहे व गाड्यांना क्रॉसिंग घेताना जास्त वेळ एकाच ठिकाणी राहावे लागते, त्या दोन स्थानकांतील अंतर कमी करावयाचे असल्यास नव्या रेल्वेस्थानकांची आवश्यकता आहे. केवळ प्रवासी वाहतुकीसाठीच या सर्व सेवासुविधांची निर्मिती केली जात आहे. मालवाहतुकीसाठी रेल्वेस्थानक असल्यास त्याठिकाणी यार्ड, मोठी शेड व मोठ्या रस्त्यांची गरज असते. पण यातील एकही गोष्ट नव्या स्थानकांच्या परिसरात नाहीत. त्यामुळे यात मालवाहतुकीचा कोणताही विषय नाही, असेही वारंवार स्पष्ट केलेले आहे. 

यापूर्वीही सां जुझे दी अरीयाल याठिकाणी रेल्वे ओव्हरब्रीजच्या उभारणीच्या कामाला स्थानिकांनी अडथळा निर्माण केलेला होता. गावातील खासगी जागेचा वापर वाहतुकीसाठी केला जाऊ नये अशी मागणी केली. त्यानंतर कोकण रेल्वेकडून दवर्ली रेल्वेफाटकानजीकच्या रेल्वेच्याच जमिनीतून वाहनांची वाहतूक केली व काम पूर्णत्वास नेले. यातून कामासाठीचा वेळ व खर्च दोन्ही वाढलेले आहे. मात्र, ज्या कामाला स्थानिकांनी विरोध दर्शवला होता, ते काम रेल्वे प्रशासनाकडून काळाची गरज असल्याचे सांगत पूर्ण केलेे.

सध्या नेवरा, सां जुझे दी अरीयाल, सारझोरा व मये येथील स्थानिकांना ही नवी रेल्वेस्थानकांची उभारणी कोळसा वाहतुकीसाठी असल्याची शंका आहे, त्यातून हा विरोध वाढलेला आहे. सारझोरा, नेवरा, सां जुझे दी अरीयाल या ग्रामसभांतूनही रेल्वेस्थानकांना विरोध असल्याचा ठराव संमत करण्यात आलेला होता. राज्य सरकार व कोकण रेल्वे प्रशासनाकडून पुन्हा एकदा रेल्वेस्थानकांची जागा, त्यासाठी संपादित केलेली जागा व त्याठिकाणी असणार्‍या सोयीसुविधा याची योग्य माहिती त्या त्या गावातील नागरिकांना द्यावी. त्यामुळे लोकांच्या मनातील प्रश्न कमी होतील व रेल्वेस्थानकांची उभारणी सुकर होईल. याशिवाय रेल्वेसुविधा या लोकांच्या दळणवळणाचा महत्त्वाचा दुवा असल्याने त्यासाठी नाहक विरोध होणार नाही, याची काळजी स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनही घेण्याची गरज आहे. वादापेक्षा संवादातून या रेल्वेस्थानकांच्या उभारणीचा प्रश्न सुटल्यास कामांचा वेग वाढून वेळही वाचणार आहे.


अजय लाड
(लेखक गोवन वार्ताचे द​क्षिण गोवा ब्युरो चीफ आहेत.)