भारतातील 'अजब' रोग आणि 'गजब' डॉक्टर! (भाग २)

भारतात रस्त्यावर काय दिसेल याचा अंदाज वर्तवणे कठीण आहे, पण रस्त्यावरील 'डॉक्टरांची' संख्या मात्र लोकसंख्येपेक्षाही वेगाने वाढतेय. अशक्य कोटीतील रोगांवर 'विना ऑपरेशन' इलाज करणाऱ्या जाहिराती पाहून असे वाटते की, हे डॉक्टर म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील 'सुपरमॅन'च आहेत.

Story: मिश्किली |
17th January, 11:11 pm
भारतातील 'अजब' रोग आणि 'गजब' डॉक्टर! (भाग २)

जिथे मोठे वैज्ञानिक आणि संशोधक अपयशी ठरतात, तिथे मेरठच्या एका गल्लीत बसलेली, रिक्षाच्या मागील जाहिरात मात्र वैद्यकीय 'क्रांती' करून जाते. जगभरातील कॅन्सर तज्ज्ञ, ऑन्कोलॉजिस्ट आणि करोडो डॉलर्सची यंत्रसामग्री एका बाजूला आणि मेरठच्या पल्लवपुरमचा हा 'संभव क्लिनिक' एका बाजूला! पोस्टरवर मोठ्या अक्षरात लिहिलेय, "कैंसर का इलाज, बिना कीमो, बिना रेडिएशन". बिचारे आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ कित्येक दशकं प्रयोगशाळेत उंदीर मारत बसले आणि कॅन्सरवर औषधे शोधली, पण मेरठच्या या क्लिनिकने एका झटक्यात सगळं निकालात काढलं! आता विना कीमो कॅन्सर ठीक करण्याचे हे 'गुप्त तंत्रज्ञान' जर सफल झाले तर अमेरिकेतील मोठ्या कॅन्सर रिसर्च सेंटरवाल्यांनी काय राजीनामा देऊन शेती करायची? क्लिनिकचं नाव काय तर म्हणे, 'संभव'. म्हणजे जे जगात कोणालाही जमलं नाही, ते मेरठच्या एका बोळात 'शक्य' आहे.

काही जाहिराती अशा असतात ज्या वाचल्यावर माणसाला चष्म्याची गरज आहे की मेंदूच्या उपचारांची, हेच समजत नाही. क्लिनिकचे नाव 'ज्योती आय क्लिनिक', पण उपचारांचा प्रकाश मात्र पार 'गुप्त' अंधाऱ्या गल्ल्यांपर्यंत पोहोचलेला असतो! जिथे डोळे उघडतात आणि लॉजिक कायमचे मिटते! मोठमोठी कॉर्पोरेट हॉस्पिटल्स लेझर ऑपरेशन आणि लेन्सच्या गप्पा मारतात, पण 'ज्योती क्लिनिक'चे लॉजिक वेगळंच आहे. जाहिरात वाचून असं वाटतं की, इथे डोळ्यांचा उपचार नाही तर एखाद्या जुन्या कॅमेऱ्याची सर्व्हिसिंग होतेय. "या आणि १० मिनिटांत दृष्टी मिळवा" - जणू मोतिबिंदू म्हणजे डोळ्यावर बसलेली साधी धूळ आहे, जी फुंकर मारली की उडून जाईल! "बिना ऑपरेशन, फक्त थेंबाने दृष्टी परत!" आता हे थेंब म्हणजे नेमकं काय? हिमालयातील दुर्मिळ जडीबुटी की सरळ नळाचे पाणी? जे जगभरातल्या डॉक्टरांना जमलं नाही, ते दिल्लीतील एका अरुंद गल्लीत बसून कसं काय शक्य होतं, हे कोडं सोडवायला तुमच्या स्वतःच्या लॉजिकचं 'ऑपरेशन' करावं लागेल.

हे डॉक्टरसाहेब फक्त डोळ्यांचेच नाही, तर नाक, कान आणि घसा तज्ज्ञही आहेत. तुम्ही तिथे डोकेदुखी आणि सायनसवर सुद्धा 'रिपेअरिंग' करून घेऊ शकता. शिवाय लहान मुलांचे चष्मे सुद्धा ते मंत्रासारखे उतरवू शकतात. असे वाटते की डॉक्टरसाहेबांनी मानवी शरीराच्या प्रत्येक नटाचा 'ठेका' घेतला आहे. डॉ. गोपाल वर्मा केवळ एक 'कंसल्टिंग आय सर्जन' नाहीत, तर ते मानवी शरीराचे 'ऑल-इन-वन मेकॅनिक' आहेत. पण या बोर्डाची खरी कलाकारी त्याच्या खालच्या भागात दडलेली आहे. डोळे तपासता तपासता तुम्ही अचानक 'गुप्त रोगांच्या' गूढ प्रदेशात कधी प्रवेश करता, हे कळतही नाही. स्वप्नदोष, नपुंसकता आणि शीघ्रपतन यांसारख्या रोगांचे उपचार त्याच बोर्डावर लिहिले आहेत, जिथे वरच्या बाजूला 'मोतिबिंदू'ची चर्चा सुरू आहे. म्हणजे शेवटी 'डोळा' हीच ती पहिली खिडकी आहे, जिथून माणूस 'गुप्त' विचारांकडे वळतो, हे डॉक्टरसाहेबांनी ताडलं असावं! डॉक्टरसाहेबांची पदवी आहे, B.I.M.S.! आता याचा अर्थ 'Bachelor of Integrated Medicine and Surgery' असा असू शकतो किंवा कदाचित 'भयंकर इंटेलिजंट मॅन ऑफ सर्जरी' असाही असू शकतो; पण कंसात लिहिलेले 'Delhi' हे सांगण्यासाठी पुरेसे आहे की, ज्ञानाची ही गंगा थेट राजधानीतून वाहत आली आहे.

शेवटी, चांदनी चौकच्या त्या अरुंद गल्ल्या, जिथे हवेतल्या पराठ्यांचा दरवळ आणि ई-रिक्षांच्या हॉर्नचा कर्कश आवाजांचा संगम होतो, तिथेच अचानक तुमची नजर एका अशा बोर्डावर पडते जो विज्ञान आणि भूगोलाच्या सर्व सीमा ओलांडून गेला आहे. सादर आहे 'सुरेंद्र ऑप्टिकल्स'चं 'जापानी कम्प्यूटर द्वारा आँख की जाँच'. हा बोर्ड पाहून पहिला प्रश्न हाच पडतो की, नक्की हा 'जपानी कॉम्प्युटर' आहे तरी काय? भारतात कोणत्याही गोष्टीच्या मागे 'जपानी' किंवा ‘जर्मन’ शब्द लावला की त्याची विश्वासार्हता रॉकेटच्या वेगाने वाढते. केस वाढवण्याचं तेल असो वा कॉम्प्युटर, जर ते विदेशी असेल, तर त्यात नक्कीच एखादी 'दैवी शक्ती' असेल जी तुमचं धुसर जग एकदम '4K' मध्ये बदलेल, असं आपण गृहीत धरतो. सुरेंद्रजींना हे पक्कं ठाऊक आहे की, जर त्यांनी 'चांदनी चौकच्या कॉम्प्युटरद्वारे तपासणी' असं लिहिलं असतं, तर कदाचित लोकांनी स्वतःच्या डोळ्यांऐवी त्या कॉम्प्युटरचीच तपासणी करायला सुरुवात केली असती. यात 'कॉम्प्युटर' या शब्दाला तितकंच वजन आहे जितकं लग्नाच्या बायोडाटामध्ये 'MBA'ला असतं. आत बसलेला माणूस भलेही तुम्हाला तोच जुना 'A, B, C' लिहिलेला कागद वाचायला लावेल, पण ग्राहकाच्या जिवाला शांतता तेव्हाच मिळते जेव्हा त्याला समजतं की त्याच्या डोळ्यांना कोणत्यातरी ‘विदेशी मशीनने’ स्कॅन केलं आहे. असं वाटतं की फतेहपुरीच्या या दुकानात जो कॉम्प्युटर ठेवला आहे, तो थेट टोकियोच्या एखाद्या लॅबमधून पॅराशूटने उडी मारून, सुरेंद्रजींच्या दुकानाचा छप्पर फाडून आत पडला आहे. क्लिनिकचे नाव 'सुरेंद्र ऑप्टिकल्स' पण डॉक्टरचे नाव 'दिनेश कुमार'. पुढे पदवी FDOA दिलेली आहे. 'DOA' कदाचित डिप्लोमा इन ऑपथॅल्मिक असिस्टंट असेल, पण 'FDOA' काय? 'Fellow of Delhi Optometry Association'? की हा डोळ्यांचा 'लायन्स क्लब' की ‘रोटरी क्लब’ आहे?

भारतात तुम्हाला मरण्याची भीती बाळगण्याची मुळीच गरज नाही, कारण इथे 'मरे हुए को जिंदा' करणारे मुन्नाभाई बसले आहेत; आणि जिवंत राहण्याचीही फारशी खात्री देता येत नाही, कारण इथे इलाज करणारे 'मसालेदार' डेंटिस्ट आणि 'जपानी' किमयागार बसले आहेत! हे सगळं पाहिल्यावर, 'तारक मेहता...' मधला जेठालाल जेव्हा रस्त्यावरच्या न्हाव्याकडे केस कापायला जातो, त्या प्रसंगाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. तिथे तो न्हावी मोठ्या तत्त्वज्ञानासारखं जेठालालला ठणकावून सांगतो, "बाबू, रास्ते वाला नाई क्या होता है? नाई तो नाई होता है!" अगदी तसंच, आपल्याकडेही 'रास्ते वाला डॉक्टर' काय असतो? डॉक्टर तो डॉक्टरच असतो! मग तो एम.बी.बी.एस. असो वा एखादा 'मसाला' भरणारा सुटकेसधारी जादूगार. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी, भारतातल्या या 'रस्तेछाप' गल्ल्यांमध्ये जे लॉजिक आणि अगाध श्रद्धा पाहायला मिळते, त्यापुढे साक्षात मृत्यूचा देव यमराजही आपला रेडा बाजूला उभा करून "भावा, एक जडीबुटी मला पण दे" असं म्हणत रांगेत उभा राहील. जोपर्यंत लोकांच्या मनात 'स्वस्त' उपचारांची ओढ आणि जादुई चमत्कारांची हाव जिवंत आहे, तोपर्यंत हे 'तिवारीजी' आणि 'सुरेंद्र ऑप्टिकल्स' यमराजाच्या कामात असाच व्यत्यय आणत राहतील. यमराजाच्या 'मॅनेजमेंट'ला माझा एकच सल्ला आहे, आता थेट 'मुन्नाभाई' आणि 'गोपाल वर्मां'शी सेटिंग लावा, कारण भारतात आता विज्ञानाचं नाही, तर 'जाहिरातींचं' राज्य आहे!


- आदित्य सिनाय भांगी,

पणजी