समिधा हादरलीच, पण तिने सावरत सुमेधला फोन केला आणि सरिताताईंना घेऊन हॉस्पिटलला जायला निघाली. "काय झालं डॉक्टर माझ्या सानिकाला?" समिधा केविलवाण्या स्वरात डॉक्टरांना विचारत होती.

बयो, अभ्यास घेऊन बस. सुनबाई यायची वेळ झाली; तुला हे असं रंगात माखलेलं पाहिलं तर उगीच रागवेल." सरिताताई आपल्या नातीला, सानिकाला कधीच्या विनवत होत्या. पण सानिका चित्र रंगवण्यात दंग झाली होती. दहावीत असणाऱ्या सानिकाने कित्येक महिन्यांनी ब्रश हातात धरला होता, तेही आई घरात नव्हती म्हणून. नाहीतर नववी संपता संपता तिच्या आईने, म्हणजेच यशस्वी उद्योजिका समिधा सरदेशमुख यांनी अक्षरशः तिला पुस्तकांच्या धबडग्यात गुरफटून टाकले होते. समिधाने वर्षभरासाठी खास सानिकाच्या अभ्यासाकडे लक्ष देता यावे म्हणून 'वर्क फ्रॉम होम' घेतले होते; पण आजची क्लायंट मीटिंग अत्यंत गुंतागुंतीची असल्यामुळे तिला ती 'इन पर्सन' अटेंड करावी लागणार होती आणि म्हणूनच ती जेवून बाहेर पडली होती. आता किमान संध्याकाळी सहापर्यंत तरी ती परतणार नव्हती, म्हणूनच सानिकाने अभ्यासाचा पसारा बाजूला सारत कॅनव्हास स्टँडला लावला होता.
"चिल आज्जू... मम्मा सहाशिवाय परतायची नाही. कंटाळा आलाय गं ती मॅथ्सची सम्स सॉल्व्ह करून करून... वेडी होईन आता मी; बघ ऑलमोस्ट पूर्ण होत आलंय पोर्ट्रेट, एवढा पंखांमध्ये रंग भरला की झालं." सानिका लाडात येत म्हणाली. "मी समजू शकते गं छकुल्या, पण तुझ्या आईला कोण समजावणार? तिच्यासाठी अभ्यास आधी मग बाकी सगळं. आणि सहाला काय म्हणतेस, सव्वापाच वाजले सुद्धा! कधी सहा वाजतील कळणार सुद्धा नाही. आवरायला घे बघू, मग कधीतरी भर तो राहिलेला रंग... आता हत्ती गेला आणि शेपूट राहिलंय राजा, एकच महिना; मग परीक्षा झाली की रंगवत बस तू चित्र! आत्ता तेवढं आवर..." सरिताताई तिला समजावत होत्याच, तेवढ्यात दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि दोघींनी एकदम दाराकडे पाहिले. दारात समिधा रागाने थरथरत उभी होती. आता कुठल्याही क्षणी ती सानिकावर तुटून पडणार हे निश्चित होते. थोडेफार सावरावे म्हणून सरिताताई पुढे सरसावल्या नि काही बोलणार, तोच समिधाने हातानेच त्यांना थांबायची खूण केली आणि त्या समजून चुकल्या.
काही कळायच्या आत समिधा ताडताड चालत सानिका समोर आली आणि टिपॉयवर ठेवलेले कलर पॅलेट तिने कॅनव्हासवर फेकून मारले. त्यातले गढूळ पाणी चित्रभर पसरले, त्या परीचे पंख काळ्याकुट्ट रंगात बुडाले नि त्याचे शिंतोडे सानिकाच्या चेहऱ्यावर उडाले. "कार्टे, तुझ्या चांगल्या भविष्यासाठी मी आणि तुझा बाबा मरमर मेहनत घेतोय. कंबर, मान मोडून कामं करतोय; बस, ट्रेन, ट्रॅफिक सगळं रोज सहन करतोय आणि तुला अभ्यासाच्या वेळी ही रंगरंगोटी सुचतेय? अगं, परवा दिवशी गणिताच्या चाचणी परीक्षेत नापास झालीस, जरा तरी लाज-शर्म? मी गेले तेव्हा वाटलं लेक अभ्यास करेल माझी, म्हणून येताना आवडीचा खाऊ घेऊन येऊ, तर इथे येऊन बघते तर काय... अभ्यास ठेवलाय गुंडाळून आणि मॅडम बसल्यात कोऱ्या कागदावर रेघोट्या मारत! तू युजलेस आहेस सानिका; हे रंग पोट भरणार नाहीत तुझं, त्यासाठी पैसा लागतो आणि तो कमावण्यासाठी शिक्षण! ज्याचं तुला काही पडलेलंच नाहीये... हो ना? आमच्या तोंडाला काळं फासणार आहेस तू..." ती फाडफाड बोलत होती आणि सानिकाचे डोळे ओसंडून वाहत होते.
"सॉरी मम्मा, मी फक्त थोडा वेळ ब्रेक म्हणून... आता बसणारच होते मी अभ्यासाला... सो सॉरी मम्मा..." सानिका कळवळून माफी मागत होती, पण समिधा काही ऐकून घ्यायच्या स्थितीत नव्हती; ती तिथून पाय आपटत निघून गेली आणि सरिताताईंनी सानिकालाही तिच्या रूममध्ये पाठवले आणि तिचे विखुरलेले रंगकाम आवरायला घेतले. संध्याकाळी सानिकाचा बाबा सुमेध ऑफिसमधून घरी आल्यावर त्याला सारा प्रकार समजला, त्याने समिधाची समजूत काढली. झाल्या प्रकाराला आठवडा लोटला, त्या दिवसापासून सानिका दिवसरात्र फक्त अभ्यास करत होती. समिधा तिच्याशी बोलत नसली, तरी आपल्या रागाची मात्रा बरीच लागू पडलेली दिसतेय म्हणून ती खुश होती. त्या दिवशी सानिकाची शाळेतर्फे शेवटची चाचणी परीक्षा होती. शेवटचा पेपर गणिताचा होता; ती सकाळी जायला निघाली तेव्हा समिधाने तिला थांबवत 'ऑल द बेस्ट' केले, त्यावर ती नुसती क्षीण हसली आणि निघून गेली. दुपारी बारा वाजता समिधाच्या फोनची रिंग वाजली; तिने फोन उचलला. "हॅलो, मिसेस सरदेशमुख. मी सानिकाची क्लास टीचर नयना बोलतेय. आज तिचा पेपर झाल्यावर तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध झाली. आम्ही तिला सिटी हॉस्पिटलला नेतोय, तुम्ही प्लीज तिथेच या." एवढे सांगून त्यांनी फोन ठेवला.
समिधा हादरलीच, पण तिने सावरत सुमेधला फोन केला आणि सरिताताईंना घेऊन हॉस्पिटलला जायला निघाली. "काय झालं डॉक्टर माझ्या सानिकाला?" समिधा केविलवाण्या स्वरात डॉक्टरांना विचारत होती. "आमी तातडीने तिच्या सगळ्या टेस्ट्स केल्या, त्यावरून असे दिसून आले आहे की तिने कोणत्या तरी गोष्टीचा अतिप्रचंड ताण घेतला आहे; गेले कित्येक दिवस ती नीट झोपलेलीच नाहीये. परिणामी तिच्या मेंदूतल्या अतिशय नाजूक नसा फुटून अंतर्गत रक्तस्त्राव झाला आहे; आम्हाला लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागेल." डॉक्टरांच्या शब्दागणिक समिधा कोसळत होती. तेवढ्यात नर्स सानिका शुद्धीवर आल्याचे सांगत आली. डॉक्टरांनी विनंतीवरून फक्त समिधाला सोबत घेतले. समिधा सानिकाच्या उशाशी बसली आणि तिचे डोकं आपल्या मांडीवर घेतले. "सानू... बाळा... माफ कर गं मला... मी प्रेशराईज करायला नको होतं तुला... आता कधीच तुला अभ्यास कर म्हणणार नाही बाळा... तू लवकर बरी हो." समिधा रडत म्हणाली... "सॉरी मम्मा... मी हरले... मी तुझ्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकले... माझ्या पंखांमध्ये रंग नाही भरू शकले; आय ट्रायड मम्मा, आय ट्रायड हार्ड बट कुडण्ट सक्सीड... सॉरी मम्मा... आय क्विट!!" बोलता बोलता ती शांत झाली. परीचे कोवळे पंख काळ्याकुट्ट रंगाने माखले कायमचे!!

- अनू देसाई