विशाल चोच आणि वैशिष्ट्यपूर्ण आवाजाचा धनेश पक्षी निसर्गचक्रातील महत्त्वाचा दुवा आहे. 'जंगलाचा शेतकरी' मानल्या जाणाऱ्या या पक्ष्याची जीवनशैली आणि संवर्धनाची गरज उलगडणारा हा अभ्यासपूर्ण लेख.

तुम्ही कधी धनेश पक्षी पाहिला आहे का? मोठी, घट्ट चोच व लालभडक डोळ्यांचा, विचित्र आवाज काढणारा, कुतूहल वाटेल असा उंच झाडावर बसणारा पक्षी कधी पाहिला आहे का? याला 'हॉर्नबिल' म्हणूनही ओळखले जाते.
पश्चिम घाटात प्रामुख्याने तीन प्रकारचे धनेश पक्षी आढळतात - मलबार धनेश, मलबार ग्रेट धनेश व मलबार पायड धनेश. हा पक्षी आपल्या लांब, मोठ्या, वाकड्या चोचीसाठी व विचित्र आवाजासाठी ओळखला जातो. त्याची चोच पिवळ्या-काळ्या रंगाची असते व त्यावर उठावदार “कॅस्क” (शिंगासारखा भाग) असतो. धनेशाची मोठी चोच केवळ दिसायला नव्हे, तर फळे तोडणे, पिल्लांना अन्न देणे व संरक्षण करणे यासाठी अत्यंत उपयुक्त असते. हा पक्षी फळभक्षी आहे. तो वड, उंबर, पिंपळाची फळे खातो. त्याला सगळीच फळे प्रिय आहेत, मात्र अंजीर हे त्याच्या विशेष आवडीचे फळ. धनेश पक्षी कीटक, लहान सरपटणारे प्राणी, उंदीर इत्यादी खाऊन आपला उदरनिर्वाह करतो. कधी कधी तो किडे, सरडे व लहान पक्षीही खातो.
धनेश पक्ष्याची घरटी बांधण्याची पद्धत अतिशय वेगळी असते. नर आणि मादी आयुष्यभरासाठी जोडी जमवतात. अंडी घालण्यापूर्वी मादी झाडांच्या नैसर्गिक पोकळीत आपले घरटे तयार करते. चिखल, विष्ठा व फळांच्या गराच्या साहाय्याने ती स्वतःला घरट्यात बंद करून घेते. घरट्याचे फक्त एक लहान छिद्र उघडे ठेवले जाते. यामुळे पिल्लांना साप, माकडे व इतर भक्षकांपासून संरक्षण मिळते. स्वतःची पिसे गळवून मादी त्यांचा पिल्लांसाठी गालीचा म्हणून वापर करते. या काळात ती घरट्याच्या बाहेर पडत नाही. नर दिवसभर जंगलात फिरून फळे, किडे, लहान प्राणी गोळा करतो आणि मादी व पिल्लांना छोट्या फटीतून अन्न पुरवतो. या काळात नर काही कारणास्तव मरण पावल्यास, जखमी झाल्यास किंवा त्याने अन्न पुरवणे थांबवल्यास मादी उपासमारीने अशक्त होते आणि बऱ्याच वेळा तिचा मृत्यूही होऊ शकतो. अशा परिस्थितीत मादीसोबत घरट्यातील अंडी किंवा पिल्लेही दगावतात.
नर आणि मादीमधील फरक म्हणजे नर धनेश मादीपेक्षा थोडा मोठा व बलदंड असतो. बहुतेक जातींमध्ये नराचे डोळे लालभडक/केशरी रंगाचे असतात, तर मादीचे डोळे पांढरे/फिकट रंगाचे असतात. नराच्या मोठ्या व उठावदार चोचीच्या तुलनेने मादीची चोच व कॅस्क आकाराने लहान असते. नराच्या पिसांचा रंग मादीच्या तुलनेने किंचित अधिक तेजस्वी असतो.
नागालँडमध्ये नागा जमातीचे लोक धनेश पक्षाला शौर्य व समृद्धीचे प्रतीक मानतात. तिथे या पक्षाला खास सांस्कृतिक महत्त्व आहे. नागालँडमध्ये दरवर्षी 'हॉर्नबिल महोत्सव' साजरा केला जातो. असे म्हणतात की, पूर्वी येथील योद्धे व प्रतिष्ठित व्यक्ती आपल्या पारंपरिक शिरोभूषणांमध्ये धनेशाची पिसे वापरत असत.
जंगलाच्या आरोग्यासाठी धनेश पक्षी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. धनेश फळांच्या बिया दूरवर पसरवून जंगलातील जैवविविधता टिकवण्यास मदत करतो, म्हणून या पक्षाला 'जंगलाचा शेतकरी' असे म्हटले जाते. धनेश पक्षी प्रामुख्याने दाट, सदाहरित वनात आढळतात. भारतातील पश्चिम घाट, ईशान्य भारत, मध्य भारत तसेच अंदमान-निकोबार बेटांवर हा पक्षी आढळतो.
आज धनेशाला कित्येक संकटांना सामोरे जावे लागत आहे. जंगलतोडीमुळे मोठ्या व जुन्या झाडांचा नाश होत आहे, परिणामी त्यांचे प्रजनन थांबते. धनेशाच्या अस्तित्वासाठी हा प्रमुख धोका मानला जातो. फळझाडे कमी झाल्याने अन्नटंचाई निर्माण होते. जंगलात वाढती मानवी वस्ती व हस्तक्षेपामुळे धनेशाचा अधिवास नष्ट होत आहे. पर्यटनाचा अतिरेक, वाहनांची वर्दळ आणि हवामान बदल यामुळे धनेशांचे नैसर्गिक वर्तन बदलत चालले आहे. काही ठिकाणी अंधश्रद्धेमुळे धनेशाची शिकार केली जाते; त्याची पिसे व चोच यांचा वापर केला जातो. जुन्या झाडांचे संरक्षण, फळझाडांची लागवड आणि जनजागृती यांसारखे उपक्रम राबवून आपण या 'जंगलाच्या शेतकऱ्याचा' अधिवास राखून ठेवला पाहिजे.

- स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)