प्राण्यांच्या विष्ठेतून बनतात महागड्या कॉफी

जगातील सर्वांत महागडी कॉफी कशी तयार केली जाते हे तुम्हाला माहीत आहे का? ही कोणती कॉफी आहे? ती इतकी महाग का असते? ती कोणत्या कारणामुळे इतकी प्रसिद्ध आहे? ती कशी तयार केली जाते ते जाणून घेऊया.

Story: साद निसर्गाची |
02nd March, 04:49 am
प्राण्यांच्या  विष्ठेतून बनतात  महागड्या कॉफी

अनेकजण कॉफीचे शौकीन असतात. बहुतांश मंडळी तर एक कप कॉफी पिऊनच आपल्या दिवसाची सुरुवात करणे पसंत करतात. कॉफी हा चहावरही एक उत्तम पर्याय मानला जातो. कॉफी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. जगात कॉफीप्रेमींची कमतरता नाही. विशेषतः परदेशातील लोकांना नवीन आणि वेगवेगळ्या प्रकारची, वेगळ्या चवीची कॉफी प्यायला आवडते. कित्येकजणांना तर कॉफीच्या सुगंधानेच तरतरी येते. पण जगातील सर्वांत महागडी कॉफी कशी तयार केली जाते हे तुम्हाला माहीत आहे का? ही कोणती कॉफी आहे? ती इतकी महाग का असते? ती कोणत्या कारणामुळे इतकी प्रसिद्ध आहे? ती कशी तयार केली जाते ते जाणून घेऊया.  

'कोपी लुवाक' ही जगातील सर्वात महाग कॉफी आहे. एक कप कॉफीसाठी तब्बल सहा ते आठ हजार रुपये मोजावे लागतील. आता ही कॉफी बनवण्यासाठी प्राण्याची गरज भासते असं म्हटलं तर? ऐकण्यास विचित्र वाटतं ना? त्यापेक्षाही विचित्र, ही कॉफी आशियाई पाम सिव्हेट मांजर किंवा कांडेचोर नावाच्या एका प्राण्याच्या विष्ठेपासून तयार केली जाते, हे ऐकल्यावर वाटेल. 

हो. हे खरं आहे. जगातील सर्वांत महागडी कॉफी ही मांजरासारख्या दिसणाऱ्या कांडेचोर नावाच्या एका प्राण्याच्या विष्ठेपासून तयार केली जाते. सिव्हेटपासून तयार होत असलेल्या या कॉफीला 'सिव्हेट कॉफी' असंही म्हणतात. या कॉफीचं उत्पादन अनेक आशियाई देशांसह दक्षिण भारतातही घेतलं जातं. या कॉफीला श्रीमंतांची कॉफी असेही म्हटले जाते. 'कोपी' हा कॉफीसाठीचा इंडोनेशियन शब्द आहे. 'लुवाक' हे ज्या प्राण्यामुळे ही कॉफी अस्तित्वात येते त्या प्राण्याचे नाव. 

सिव्हेट मांजराला कॉफी आवडत असल्यामुळे ते कॉफीची फळं अर्धी कच्ची असतानाच खाऊन टाकतात. या फळांना 'कॉफी चेरी' असे म्हणतात. कॉफी चेरीतील गर सिव्हेटला पचतो; पण संपूर्ण फळ पचवणं त्याला शक्य होत नाही. न पचलेली कॉफीची फळं या मांजराच्या विष्ठेतून बाहेर येतात. 

कॉफी बनवण्यासाठी सगळ्यात आधी सिव्हेट मांजराच्या विष्ठेतून कॉफीच्या बिया वेगळ्या करतात. या बिया नंतर स्वच्छ करुन अनेक प्रक्रियांकरवी त्यांना जंतूमुक्त केले जाते. त्यानंतर त्या व्यवस्थित वाळवल्या जातात. कॉफीच्या बिया सुकल्यानंतर त्या भाजून त्यांची पावडर तयार केली जाते व नंतर पुढची प्रक्रिया करुन या बियांची सिव्हेट कॉफी बनवली जाते. 

या कॉफीतील काही एन्झाईम्स माणसाच्या शरीरासाठी अतिशय पोषक मानले जातात. त्यामुळे या कॉफीची किंमत एवढी जास्त असल्याचे सांगितले जाते. सिव्हेटच्या आतड्यांतून गेल्यानंतर कॉफीच्या बियांमधील आम्लता निघून जाते. मांजरीच्या आतड्यांना स्पर्शून आल्याने या बियांच्या संरचनेत बदल होतो व त्यामुळे उत्तम चवीचं पेयं तयार होतं असं संशोधन सांगतं. 

प्राण्याच्या विष्ठेतून बनवण्यात येणाऱ्या अशाच आणखी दोन महागड्या कॉफी म्हणजे जॅकू बर्ड कॉफी व ब्लॅक आयव्हरी कॉफी. ब्लॅक आयव्हरी कॉफी ही हत्तीच्या विष्ठेतून गोळा केलेल्या बियांपासून बनवली जाणारी कॉफी आहे. ही कॉफी सुद्धा महागच असते. ही कॉफी तुम्ही थायलंडमधून विकत घेऊ शकता. जॅकू बर्ड कॉफी ही जॅकू नामक पक्षाच्या विष्ठेतून बनवण्यात येणारी कॉफी आहे. ही कॉफी सुद्धा खूप महाग असते. जॅकू बर्ड कॉफीची किंमत सुमारे १००० डॉलर प्रतिकिलो एवढी असते, म्हणजेच एक किलो कॉफीसाठी तुम्हाला सुमारे ८१००० रुपये खर्च करावे लागतील. ही कॉफी ब्राझीलमध्ये तयार केली जाते व येथूनचं याची जगभरात निर्यात होते.


स्त्रिग्धरा नाईक

(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या  प्राध्यापिका आहेत.)