लेखक जे लिहितो ते जगणं महत्त्वाचे आहे. लिहिणं एक आणि जगणं दुसरं ही विसंगती त्याला खटकते. “writing is beautiful but living is wonderful” असे त्याचे मत आहे. त्यातूनच स्वतःची ओळख निर्माण होते असे तो मानतो.
तो जगतो स्वतःच्याच भावतंद्रीत. व्यावसायिक जगात त्याचा वावर आहे परंतु त्या विश्वात चालणाऱ्या छक्क्यापंज्यापासून तो दूर आहे. शब्दांची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही. सतत लिहिणे... वाचणे... भ्रमंती करणे... साहित्यिक उपक्रम आणि साहित्य सांस्कृतिक क्षेत्रात वावरणे ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख. तो आजकाल नाही तर अगदी कुमारवयीन वयापासून साहित्याशी, साहित्यिक चळवळीशी जोडल्या गेलेल्या व्यक्तिमत्त्वांशी त्याचे जवळचे नाते आहे. ज्ञान आत्मसात करणे... शब्दगंधात धुंद होऊन जगणे... आणि सहवासात येणाऱ्यांना साहित्य सहवासात फिरवून आणणे हे सातत्य त्यांनी आजही राखून ठेवलेले आहे. हा आहे गौरीश नाईक. माशेल, देऊळवाडा येथे राहणारा. खांद्याला शबनम पिशवी लटकवून जे ओळखीचे भेटतात त्याला हाय हॅलो करीत सन्मानाने हसून हाक मारणारा. राजधानीत आणि राजधानीच्या बाहेर होणाऱ्या साहित्यिक उपक्रमात न चुकता सहभागी होणारा एक उमदा तरुण. गेली कित्येक वर्षे तो हे रसिकत्व आपल्या अंतःकरणात रुजवून मार्गक्रमण करीत आहे. कल्पक, विचारशील असे त्याचे व्यक्तिमत्त्व. शब्दयुग, शब्दात्मा, रंगयोग आणि कल्पनाविष्कार अशी चार पुस्तके त्याची प्रकाशित झालेली आहे.
अर्थशास्त्र हा विषय घेऊन त्याने पदवी संपादन केलेली असून पदव्युत्तर शिक्षणासाठी मानसशास्त्र विषयाची निवड केली. “आयडियाज एज” या व्हाट्सएप गटाच्या माध्यमातून सृजनशील समाजरचना करण्याचा ध्यास मनीमानसी बाळगून त्यादृष्टीने कार्यरत राहिला. ज्या कालखंडात खूप मोठया प्रमाणात व्हाट्सएप गट तयार झाले नव्हते त्या काळात त्यांनी या गटाची निर्मिती करून गोव्यातील अनेक समविचारी साहित्यिक, रसिकांना जोडून घेतले. त्यांना टिकवून ठेवले. त्यासाठी त्यांनी वयोगट बघितला नाही. कोणत्याही वयाची व्यक्ती का असेना तिला साहित्य वाचन, लेखनात, ऐकण्यात रुची असायला हवी हाच निकष. त्याच्या या उपक्रमाविषयी अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले तसेच अनेकांना त्याविषयी साशंकता ही वाटली. आता या गटाला एक दशक पूर्ण झाले तरीही त्याचे सातत्य आजही अबाधित आहे. आपल्या सभोवताली विविध क्षेत्रातील संस्था कार्यरत असतात. असंख्य व्यासपिठीय कार्यक्रम त्याद्वारे होत असतात. अशावेळी गौरीश नाईक आपल्या आयडियाज एजच्या माध्यमातून विविध विषयांवर दिग्गजांच्या चर्चा घडवून आणतो. गौरीशकडे स्वतःची अशी वेगळी दृष्टी आहे. त्यात त्याला भोवतालची दुनिया रंगीबेरंगी दिसते. ते रंग, गंध त्याला खुणावतात. या दुनियेची सफर तो घडवतो. लहान मुलांच्या कृतिशील कौशल्यपूर्णतेला व्यासपीठ देतो. त्यांच्यातील प्रतिभेला हेरून त्यांचा सन्मान करतो. आजपर्यंत त्याने अनेक उभरत्या... लिहिणाऱ्या हातांना, संवेदनशील मनाच्या सुहृदांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिलेली आहे. त्यांना सन्मानित करून त्यांच्यातील ऊर्जा वाढविलेली आहे. तो लिहितो आणि मुख्य म्हणजे दुसऱ्यांनी लिहिलेले वाचतो.
परिसंवाद, चर्चासत्रे यात सहभागी होऊन त्याने विचार प्रकट केलेले आहेत. कलाकार, साहित्यिक, चित्रकार हे सुंदर आणि निकोप समाज निर्मितीसाठीचे शिलेदार आहेत असे त्याचे मत आहे. त्याच्या ठिकाणी असलेली कल्पकता त्याला कलात्मक धुंदी देते. ‘कल्पनाविष्कार’ या साप्ताहिक पुरविणीचा जन्म त्यातून होतो. साधी सृजनशील राहाणी त्याला आवडते. जगण्याचे भान बाळगून आयुष्याचा शोध घेत जगणे त्याला आवडते. आयुष्याचे विविध कंगोरे आपल्या परीने न्याहाळत त्याला नवा आयाम देण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी सकारात्मक रंगयोगी बनून सहवासात येणाऱ्यांचे आयुष्य रंगीत करायचा विचारही तो करत आहे. पुणे येथील विश्वशांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था भारत सरकार २०२४ सालच्या समाजगौरव पुरस्काराने तो सन्मानित आहे. इतर अनेक सन्मानही त्यांना लाभलेले आहेत. मी पुस्तके प्रकाशनाचा व्यवसाय करतो हे तो आवर्जून सांगतो. प्रकाशन संस्थे अंतर्गत अनेक पुस्तके त्याने प्रकाशित केलेली आहेत. आपल्या अवतीभोवती अशी माणसं असतात जी स्वतःसाठी जगताना सतत इतरांचा विचार करतात. हा असा विचार करताना त्यांच्या मनात मी अश्या तऱ्हेने वागलो तर हा काय म्हणणार? तो काय म्हणणार? याच शंका-कुशंकांनी मन कुरतडून जाते. प्रसंगी स्वतःला काय करायचे आहे त्याचाच विसर पडतो. गौरीशने मात्र स्वतःसाठी स्वतंत्र मार्ग निवडलेला आहे. तिथं त्याला आत्मिक समाधान लाभते. टीका करणारे... हसणारे पुष्कळ असतात.... आहेतही मात्र तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आपले ध्येय साध्य करण्यासाठी पुढे पुढे जात राहातो.... त्याच्या या प्रवासात त्याच्याशी अनेक माणसे जोडली गेली. काही मध्येच सोडून गेली, तरीही त्याची वाटचाल सुरू आहे.
खूप धडपड करावी लागते. स्वतःचे प्रामाणिक स्थान समाजामध्ये निर्माण करण्यासाठी चिवट जिद्द लागते. हा चिवट धागा गौरीशकडे आहे. येणारे येतील जाणारे जातील आपण आपलं काम करीत राहायचं असा विचार करीत तो मार्गक्रमण करीत असतो. त्याची कोणाशीही स्पर्धा नाही.... की कधी तो पुरस्कारासाठी धावाधाव करताना दिसत नाही. एक निरागस संवेदनशीलता, सर्जक कौशल्य त्याच्या जगण्याला वेढून आहे. सामाजिक भान त्याला आहे. लहानापासून ते थोरांपर्यंतच्या व्यक्तिमत्त्वातील प्रतिभा हेरून तो स्वतःच्या परीने त्यांचा सन्मान करतो. त्यांना प्रेरणा देतो. दिल्ली येथे पार पडलेल्या, ”सृजनशील परंपरा निर्मिती” या विषयावर त्याने विचार व्यक्त केले. त्यावेळी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभ्यासकांसमोर त्याचा सन्मान करण्यात आला. जगण्याची त्याची व्याख्या अगदी साधी, सोपी आणि सरळ आहे. मोठा भपका... कॉर्पोरेट विश्वात वावरण्याचे स्वप्न त्याचे नाही. त्याला शब्दगंधाची धुंदी अनुभवत जगायचं आहे. भावनारंगात समरस होऊन स्वतःबरोबरच सहवासात येणाऱ्यांच्या जीवनातही रंग भरण्याचा त्याचा मानस आहे. संघर्ष प्रचंड करावा लागला.... अजूनही करीत आहे तरीही चेहऱ्यावर तृप्ती आहे. त्याला वाटते की लेखक जे लिहितो ते जगणं महत्त्वाचे आहे. लिहिणं एक आणि जगणं दुसरं ही विसंगती त्याला खटकते. “writing is beautiful but living is wonderful” असे त्याचे मत आहे. त्यातूनच स्वतःची ओळख निर्माण होते असे तो मानतो. भावनिक, सामाजिक, कौटुंबिक अशा सर्वच स्तरावर संघर्ष करीत करीतच वाटचाल करणाऱ्या गौरीशचे मन संवेदनशील आहे. स्वतःबरोबरच इतरांना वाढवणे.... साधी संयत जीवनशैली जगणे, सकारात्मक रंगयोगी बनून इतरांना नवरंग देणे... स्वतः बहरत जाणे, इतरांना ही बहरविणे हीच इच्छा बाळगून तो कार्यरत आहे.
पौर्णिमा केरकर
(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक,
कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)