प्रत्येक राज्यात उभारावे एकतरी 'वनतारा’

पिडित प्राण्यांना मदतीचा हात देण्यासाठी वनतारा ही संकल्पना राबविण्यात आली आहे. जगातील सर्वात मोठे हत्ती रुग्णालयही येथे उभारण्यात आले आहे.

Story: साद निसर्गाची |
09th March, 03:36 am
प्रत्येक राज्यात  उभारावे एकतरी 'वनतारा’

आजकाल रस्ता रुंदीकरण, रेल्वे मार्ग, मेगा प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, विमानतळे उभारण्यासाठी कित्येक एकर जमीन झाडांची कत्तल करुन सपाट केली जाते. विकास कामांमुळे नष्ट होणारा अधिवास, अधिवास नष्ट झाल्यामुळे गावात-शहरात भटकणारी रानटी श्वापदे, भटकणाऱ्या रानटी श्वापदांमुळे वन्यजीव व माणसांमध्ये होणारा संघर्ष, यासारखी अनेक कारणे रानटी जनावरांचा प्राण घेण्यास कारणीभूत ठरतात. त्यात रोडकील हा प्रकारही प्राण्यांचा बळी घेण्यास कारणीभूत ठरतो. भारतातील सगळ्यात लहान राज्यात म्हणजेच आपल्या गोव्यात देखील दिवसागणिक कितीतरी रोडकीलची नोंद होते. संशोधन आणि विकास, वन्यजीव बचाव केंद्र यासारख्या सोयींचा अभाव असल्याने कित्येक श्वापदांना आपला जीव गमवावा लागतो असे पर्यावरण अभ्यासक सांगतात. अशा परिस्थितीत प्रत्येक राज्यात वन्यजीव संरक्षण केंद्राची (वाईल्ड एनिमल रेस्क्यू सेंटर) गरज भासते. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच गुजरातच्या जामनगरमध्ये वन्यजीव संरक्षण केंद्र ‘वनतारा’चे उद्घाटन केले. जागतिक वन्यजीव दिनाच्या निमित्ताने या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. वन्यजीव संरक्षण व संवर्धनासाठी समर्पित या केंद्रात जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत. 

'वनतारा' ह्या खाजगी वाईल्ड एनिमल रेस्क्यू सेंटरमध्ये पिडित प्राण्यांचे जतन करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल सोबत येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज पशुवैद्यकीय रुग्णालयही आहे. या रुग्णालयात एमआरआय आणि सीटी स्कॅन मशीन, एंडोस्कोपिक रोबोटिक सर्जरी मशीन आणि ६ सर्जिकल सेंटर्स असल्याची माहिती वनताराचे संचालक अनंत अंबानी यांनी दिली आहे. "वनतारामध्ये आम्ही प्राण्यांच्या बचावकार्यासाठी लागणाऱ्या साऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पिडित प्राण्यांना मदतीचा हात देण्यासाठी वनतारा ही संकल्पना राबविण्यात आली आहे. जगातील सर्वात मोठे हत्ती रुग्णालयही येथे उभारण्यात आले आहे. हे प्राणीशास्त्र उद्यान लवकरच लोकांसाठी खुले केले जाईल", असे अनंत अंबानी म्हणाले. 

ते पुढे म्हणाले की, याठिकाणी जखमी व अन्य अवस्थेतील प्राण्यांच्या सुरक्षेची, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. ३,००० एकरमध्ये पसरलेला हा 'ड्रीम प्रोजेक्ट' २,००० हून अधिक प्रजातींचे घर आहे. 'वनतारा’ने आजपर्यंत १.५ लाखांहून अधिक संकटात सापडलेल्या प्राण्यांची सुटका केल्याची नोंद आहे. 

प्राण्यांसाठी खास तयार करण्यात आलेल्या वनताराची पाहणी करत पंतप्रधानांनी यावेळी आशियाई सिंहाचा बछडा, पांढऱ्या सिंहाचा बछडा आणि अत्यंत दुर्मिळ बिबट्याच्या पिल्लांना गोंजरले. "या उत्तम प्रयत्नासाठी मी वनताराच्या संपूर्ण गटाचे कौतुक करतो. वनताराचे प्रयत्न खरोखरच प्रशंसनीय आहे, या पृथ्वीतलावर आपल्यासोबत राहणाऱ्या प्राण्यांचेही आपण रक्षण करतो हे आपल्या युगानुयुगे आदर्शाचे जिवंत उदाहरण आहे".

जागतिक वन्यजीव दिनाच्या शुभेच्छा देत पंतप्रधान म्हणाले की, “जागतिक वन्यजीव दिनानिमित्त, आपल्या ग्रहाच्या अविश्वसनीय जैवविविधतेचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुनर्पुष्टी करूया. प्रत्येक प्रजाती महत्त्वाची भूमिका बजावत असते. येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यांचे भविष्य सुरक्षित करूया! वन्यजीवांचे रक्षण आणि संवर्धन करुया असे म्हणत पंतप्रधानांनी वन्यजीव संरक्षणासाठी प्रोत्साहन दिले. 

भारतात, माणसाच्या चुकीमुळे घेतल्या जाणाऱ्या प्राण्यांच्या बळीची नोंद ठेवण्यासाठी कोणताही व्यापक, केंद्रीकृत राष्ट्रीय डेटाबेस नसला तरी, नागरिक विज्ञान उपक्रम आणि संशोधन पत्रांच्या दस्तऐवजीकरणावरुन हा मृत्युदर दिवसागणिक वाढत असल्याचे लक्षात येते. मान्सूनपूर्व हंगाम व सकाळच्या प्रहरी रोडकील सारख्या घटना जास्त नोंदवल्या जातात, ज्यात विविध सस्तन प्राणी आणि पक्षांचा समावेश असतो असे संशोधनातून दिसून आले आहे.


स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)