पन्नाशी गाठलेल्या या वयात नवीन संधी मिळेल का? नवीन तंत्रज्ञान शिकता येईल का? कुठूनतरी काम मिळेल का? अनेक प्रश्न डोक्यात घोंगावत राहिले.
सुधीर जोशी एका गजबजलेल्या टपरीवर बसून चहा घेत होता. समोर रस्त्यावरची वर्दळ चालू होती. लोक घाईघाईने जात होते, कुणी ऑफिसला, कुणी व्यापाराच्या कामाला, आणि काही जण अगदी मोबाईलवर संवाद साधत वेगानं पावलं टाकत होते. तो मात्र या सगळ्या गर्दीपासून अलिप्त होता, विचारांच्या खोल गर्तेत हरवलेला.
कधी काळी हा माणूस एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर काम करत होता. केबिन, गाडी, मोठा पगार, सगळं होतं. झपाट्यानं पुढे जाणारं आयुष्य होतं. पण जसजसे तंत्रज्ञान बदलत गेलं, तसतसा तो मागे पडत गेला. कंपनीत नवे, तरुण कर्मचारी आले, नवीन कौशल्यं घेऊन. डिजिटल युग आलं, आणि सुधीर मात्र जुन्या पद्धतींवर ठाम राहिला.
शेवटी, एका दिवसाची सुरुवातच एका धक्क्यात झाली. “सॉरी सर, पण तुमचं काम कंपनीला आता उपयुक्त वाटत नाही. नवीन तंत्रज्ञानामुळे तुमचं पद संपुष्टात आलंय,” एचआरच्या अधिकाऱ्याने निर्विकार चेहऱ्यानं सांगितलं. सुधीरला क्षणभर कळेचना. पन्नाशी गाठलेल्या या वयात नवीन संधी मिळेल का? नवीन तंत्रज्ञान शिकता येईल का? कुठूनतरी काम मिळेल का? अनेक प्रश्न डोक्यात घोंगावत राहिले.
शेवटी कंपनी सोडावी लागली. सुरुवातीला त्यानं काही नव्या कंपन्यांत अर्ज केले, पण प्रत्येक ठिकाणी एकच उत्तर मिळालं, “तुमच्या कौशल्यांचा आता उपयोग नाही.” एका मोठ्या पदावर काम करणारा माणूस आज बेरोजगार होता. सुरुवातीचे काही दिवस घरात गेले, पण आर्थिक अडचणी वाढू लागल्या. घरातला आनंद ओसरला. बायको सुरुवातीला धीर देत होती, पण रोजच्या चिंता वाढू लागल्या. मुलगाही आता वडिलांशी कमी बोलू लागला.
एका दिवशी संध्याकाळी बायकोनं स्पष्ट विचारलं, “काय पुढं काय करायचं ठरवलं आहेस?” तो गप्प राहिला. काय उत्तर द्यावं, हेच समजेना. आणि मग तिनं एक दिवस सरळ सांगितलं, “मी माहेरी जाते काही दिवस. थोडा बदल होईल, पण तुझ्या नशिबात असेल तर काहीतरी होईल.” त्यादिवशी पहिल्यांदा त्याला खरंच वाटलं तो हरला आहे. तो काही दिवस भटकत राहिला. हळूहळू त्याला लक्षात आलं की जगणं म्हणजे शर्यत नव्हे. जिंकणं, हरणं ही मानवी कल्पना आहे, पण जगणं हे स्वतःच्या आयुष्यातील प्रवास
आहे.
एके संध्याकाळी तो पुन्हा त्याच चहाच्या टपरीवर बसला. समोर एक तरुण मुलगा लॅपटॉपवर टायपिंग करत होता. कुतूहलानं त्यानं विचारलं, “काय लिहितोस?” तरूण म्हणाला, “मी एक पुस्तक लिहितोय”. ते ऐकून सुधीरला स्वतःचीच आठवण झाली. कॉलेजमध्ये असताना त्याला लिहायची खूप आवड होती. पण करिअरच्या मागे लागून ती आवड कुठेतरी हरवली होती. त्या रात्री, घरी गेल्यावर त्यानं एक जुनी डायरी उघडली आणि लिहायला सुरुवात केली - “हरवलेलं स्वप्न.”
त्या दिवसापासून त्यानं रोज लिहायला सुरुवात केली. सुरुवातीला गोष्टी, नंतर ब्लॉग, आणि हळूहळू लोक त्याच्या लेखनाची दखल घेऊ लागले. एका प्रकाशकाने त्याचं लेखन पाहून त्याला पुस्तक लिहिण्याची संधी दिली. काही वर्षांनी, एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात सुधीर जोशी स्टेजवर उभा होता. समोर मोठी गर्दी होती, आणि लोक टाळ्या वाजवत होते. त्याने थोडा वेळ थांबून फलकाकडे पाहिलं...“हरवलेलं स्वप्न -लेखक सुधीर जोशी.”
आज तो पुन्हा मोठ्या पदावर नव्हता, पण स्वत:च्या आनंदासाठी काहीतरी निर्माण करत होता. आणि तो जाणून होता, खरं जिंकणं म्हणजे दुसऱ्यांशी स्पर्धा नव्हे, तर स्वतःचा शोध घेणं.
सिध्दी धारगळकर, पेडणे