जाणा औषधी वनस्पती

आयुर्वेदिक महत्त्व असलेल्या कित्येक वनस्पती माणसाने होऊ घातलेल्या विकास कामांमुळे नष्ट होत आहेत. काही वनस्पती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. औषधी वनस्पतींच्या गुणाचे फायदे घेण्यासाठी वनस्पतींचे विलुप्तीकरण थांबवणे आवश्यक आहे.

Story: साद निसर्गाची |
09th February, 04:25 am
जाणा औषधी वनस्पती

पश्चिम घाट हा येथे आढळून येणाऱ्या वनस्पती व पशु-पक्षांमुळे प्रचलित आहे. आपला गोवा आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम घाटाच्या रांगेत मोडतो. जैवविविधतेने समृद्ध या पश्चिम घाटात कित्येक विशिष्ट प्रकारच्या वनस्पती आढळतात. ह्या वनस्पतींचा आरोग्य जपण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो. भारत देशाचा तर वनस्पतींचा आरोग्य सांभाळण्यासाठी उपयोग करण्याचा दीर्घ इतिहास आहे.

आजकाल दर दुसरा माणूस आरोग्य निगडित समस्येने त्रस्त असल्याचे लक्षात येते. कॅन्सर, मधुमेह, ट्यूमर, रक्तदाब, मुळव्याध यासारखे रोग लहान वयोगटातील मुलांनाही सर्रास जडतात. सर्दी, खोकला, ताप तर अशा पद्धतीने जडतात जसा दिनचर्येचाच एक भाग. यामुळे ऍलोपथीक औषधे माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनत चालली आहेत.

भारतीय आयुर्वेदिक उपचार पद्धती कावीळ, मधुमेह, रक्तदाब यासारख्या रोगांवर अग्रगण्य उपचारपद्धती प्रदान करते. ऍलोपथीक औषधांचे अनेक दुष्परिणाम असल्याचे अभ्यासक सांगतात. ऍलोपथीक औषधांमुळे आरोग्यास दीर्घ काळाचा धोकाही संभावतो. इतके असुनही आयुर्वेदाचे पुनरुत्थान करण्याकडे हवा तितका कल दिसून येत नाही. 

आयुर्वेदिक महत्त्व असलेल्या कित्येक वनस्पती माणसाने होऊ घातलेल्या विकास कामांमुळे नष्ट होत आहेत. काही वनस्पती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. औषधी वनस्पतींच्या गुणाचे फायदे घेण्यासाठी वनस्पतींचे विलुप्तीकरण थांबवणे आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठी औषधी वनस्पतींचे संवर्धन करणे व या वनस्पतींविषयी जागरुकता निर्माण करणे महत्त्वाचे ठरते. यातील अनेक वनस्पती रोजच आपल्याला आजूबाजूस दृष्टीस पडतात. 

कोरफड

इंग्रजीमध्ये इंडियन ऍलोयव्हेरा या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती संपूर्ण भारतभर आढळते. गोव्यात देखील ही वनस्पती सहज आढळून येते. ही शीतल व कडू वनस्पती, त्वचारोग आणि केस गळतीवर प्रभावी आहे. चर्मरोग, भाजणे, कापणे तसेच गर्भाशयाच्या तक्रारीवर देखील ही वनस्पती उपयोगी असल्याचे आढळुन आलेले आहे. कोरफडीच्या पानांची साल मुळव्याधीवर वापरली जाते. आधुनिक सौंदर्य प्रसाधने आणि अँटीएजींग क्रीम्समध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.


सातवीण 

सातवीण हा सदाहरित वृक्ष देशभरातील आर्द्र प्रदेशात सापडतो. गोव्यात हा वृक्ष सर्वत्र आढळून येतो. ह्या वृक्षाच्या सालीचा काढा दमा, अतिसार, अल्सर, ट्युमर, ताप, मलेरिया, हृदयविकार यासारख्या रोगांवर उपयुक्त ठरतो. सातवीणीचे सुकवलेल्या पानांचे चूर्ण अल्सर आणि त्वचाविकारावर परिणामकारक आहे. 


पानफुटी

ही वनौषधी गोव्यात जवळ जवळ सर्वत्र आढळते. पानफुटीच्या पानांचा रस ताप, सर्दी इत्यादीवर खडी साखरे सोबत सेवन केल्यास आराम मिळतो. उच्च रक्तदाब आणि मधुमेहावर उपाय म्हणूनही याचा वापर केला जातो. पानफुटीची मुळे जखमा, चट्टे किंवा घाव भरुन काढण्यासाठी वापरतात तर याचा अर्क तापावरील उपचारात वापरतात. कानातील वेदनेवर, मुत्रपिंड आणि पित्ताशयातील खड्यासाठीही याचा वापर केला जातो. पानांचा ताजा रस पोटदुखी, आतड्यांचे विकार आणि कावीळ ठिक करण्यासाठी वापरला जातो. 


सदाफुली

सदाफुली हे सदाहरित झुडुप गोव्यात जवळ जवळ सर्वत्र आढळते. या झुडपाला पांढरी ते गडद गुलाबी रंगाची फुले फुलतात. फुलझाड म्हणुनही या झाडाची लागवड केली जाते. सदाफुलीच्या पानांचा काढा मधुमेह, मासिक अतिस्त्राव, अतिसार यावर उपयोगी ठरतो. 


भिरंड

हे झाड मुख्यता कोकण प्रदेशात सापडते. भिरंडीचे झाड गोव्यात सर्वत्र आढळून येते. भिरंडीच्या फळांचा उपयोग रक्तपितीविरोधक, वेदनाहारक म्हणुन केला जातो. भूक न लागणे, पोटदुखी, अपचन, हृदयविकार, मुळव्याध, त्वचारोग व पचन सुधारणे, दिर्घकालीन आमांश व अतिसार, कोलेस्टोरॉल नियंत्रण व स्थुलता कमी करण्यासाठी हे फळ उपयुक्त आहे. अन्नपदार्थात आंबटपणासाठी याचा वापर केला जातो. भिरंडीच्या बियांपासुन तेल काढले जाते. सौंदर्य प्रसाधनांमध्ये एक मुलभूत घटक म्हणुन देखील याचा वापर केला जातो.


कळलावी

वाघाची नखे म्हणून ओळखले जाणारे कळलावी हे बिनदेठाचे फुल शेंदुरी-तांबड्या-भडक पिवळ्या रंगाचे असते. ही वनस्पती गोव्याच्या विविध भागात सापडते. या वनस्पतीच्या खोडाचा काढा शरीरस्वास्थ, कुष्ठरोग व त्वचाविकार तसेच मुळव्याधीवरील उपचारात वापरतात. खोड उगाळुन त्वचेच्या रोगावर लावल्यास त्वचेसंबधीत व्याधी दुर होतात.


स्त्रिग्धरा नाईक, (लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)