वंदना विटणकर यांच्या गीतांच्या या शब्दांना संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी अशा सुरेल सुरांत भिजवून काढले आहे की, परत एकदा आपल्या प्रिय व्यक्तीवर उगाचच लटका राग धरावा असे कोणालाही क्षणभर वाटल्यास त्यात काहीच नवल नाही!
प्रेमाचे रूसवे फुगवे असल्याशिवाय प्रेमाला मजा नाही. या प्रेमात बरेचदा राणी फुगून बसते आणि मग या राणीची समजूत काढताना तिच्या राजाची एकच तारांबळ उडते! प्रेमाच्या या रंगात भिजताना एकाने रागवावे तर दुसर्याने तिचा हा राग जावा म्हणून मनधरणी करावी, मिनतवारी करावी, अनेक आर्जवे करावी आणि मग मनात धरलेला हा लटका राग सोडून देताना प्रेमाला बहर यावा. यात किती मजा आहे, हे खरेखुरे प्रेम करणार्यांनाच माहीत असेल! प्रेमात अशा लटक्या रागाला महत्त्व आहे. कारण एकतर प्रेमात राग आला, तरी तो जास्त काळ टिकत नाही. आणि “ए, अगं!!” अशी गोड आवाजात साद देताना “हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा... सोड ना अबोला!!” असे मधाळ स्वरात आर्जव केल्यावर आलेला राग कुठल्या कुठे पळून जाईल!
प्रख्यात गायक महम्मद रफी यांच्या खडीसाखरेसारख्या गोड आवाजातील “हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा!” हे गाणे ऐकताना रफी साहेबांनी आपल्या मधाळ स्वरांत केलेले आर्जव आपण जेव्हा ऐकतो, तेव्हा आपणही रागात असताना असेच कोणीतरी मधाळ स्वरात आपल्याला आर्जव करावे असे क्षणभर वाटून जाते. महम्मद रफी हे मराठी भाषेतील गायक नाहीत. पण तरीही त्यांनी हे मराठी भाषेतील गाणे इतक्या स्पष्ट आणि मधाळ आवाजात गायले आहे की, हे गाणे कोणा अमराठी गायकाने गायले आहे, यावर क्षणभर विश्वास नाही बसत. महम्मद रफी यांचा चेहरा हा नेहमी हसरा. गाणे गातानाही त्यांच्या चेहर्यावर नेहमीच मंद हसू विलसत असे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक स्वरात भावना ओतप्रोत भरलेल्या असायच्या.
या गाण्याच्या सुरुवातीलाच ‘ए... अगं!’ असे मधाळ मिश्किल आवाजातील आर्जव हे त्या सखीला अगदी घायाळ करणारे आहे. महम्मद रफी यांनी सुरुवातीचे हे शब्द अगदी आपल्या खास स्टाईलने पेश करताना पुढील सर्व गाण्याच्या ओळी गाताना ऐकणार्याचे कान तृप्त केले. कवयित्री वंदना विटणकर यांनी लिहिलेल्या या भन्नाट गाण्याच्या ओळी असून त्याला राज ठाकरे यांचे वडील श्री. श्रीकांत ठाकरे यांनी स्वरबद्ध केले आहे.
‘हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा सोड ना अबोला!
झुरतो तुझ्याविना घडला काय गुन्हा
बनलो निशाणा, सोड ना अबोला!’
आपली प्रिय सखी जेव्हा आपल्यावर रुसून बसते, तेव्हा त्याचा जीव अक्षरश: झुरतो. तिने धरलेला लटका हा राग मग तो लटका का असेना, त्या रागात तिने धरलेला अबोला त्याला अस्वस्थ करून सोडतो. आपली चूक तरी काय आहे? हे त्याच्या लक्षात येत नाही आणि त्याच्या मनाची प्रचंड घालमेल होते. रोज जिच्याशी आपण मन मोकळं करत होतो, त्याच सखीने रुसून कट्टी घेताना अबोला धरला, तर मग रोजच्या संवादाला बसलेली खीळ ही काही मनाला सहन होत नाही. रोज अवखळ हसत सततच्या बोलण्याने मनात रुंजी घालणाऱ्या आपल्या सखीने जर अचानक अबोला धरुन आपल्यावर निशाणा साधला, तर मन थार्यावर कसे उरणार?
इश्काची दौलत उधळी तुझा हा नखरा मुखचंद्रा भवती कितीक फिरती नजरा!
फसवा राग तुझा, अलबेला नशीला करी मदहोश मला नुरले भान आता
जाहला जीव खुळा... सोड ना अबोला!
त्यालाही माहीत आहे की, आपल्या सखीने धरलेला राग हा राग लटका राग असून त्यात तिचे प्रेमच अधिक आहे. अशा या रागातील प्रेमाचे वेगळे रूप पाहताना तिच्या इष्काची दौलत ही किती अमर्याद आहे, याची जाणीव त्याला होते. हे माहीत असूनही अबोला धरल्याने या रागातील प्रेमानेही त्याला नशा चढते आणि त्याचा जीव खुळ्यागत होऊन जातो. वंदना विटणकर यांनी हे शब्दांत नेमके पकडले आहे.
तुझे फितूर डोळे गाती भलत्या गजला
मदनाने केले मुश्किल... जगणे मजला!
पाहुनी मस्त अदा... फुले अंगार असा
सावरू तोल कसा? नको छळवाद आता!
झालो कुर्बान तुला! पुरे हा बहाणा, सोड ना अबोला!
सखीने धरलेल्या अबोल्यामुळे मदनाचा बाण जेव्हा काळजात खोलवर रुतून बसतो, तेव्हा मनाची विव्हळणारी स्थिती ही जगणे मुश्किल करून सोडते. लटक्या रागातील तिचे खरे स्वरूप सांगणारे तिचे फितूर डोळे पाहून तो सैरभैर झालाय आणि यातच त्याला कशाचेही भान उरले नाही. अबोला धरून तिने चालवलेला हा छळवाद त्याला अगदी नकोसा झालाय! त्याच्या अंगात आता अंगार फुलला आहे आणि तिला घट्ट मिठीत घेऊन तिच्यापुढे सपशेल शरणागती पत्करावी असे त्याला वाटते. वंदना विटणकर यांच्या गीतांच्या या शब्दांना संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी अशा सुरेल सुरांत भिजवून काढले आहे की, परत एकदा आपल्या प्रिय व्यक्तीवर उगाचच लटका राग धरावा असे कोणालाही क्षणभर वाटल्यास त्यात काहीच नवल नाही!
कविता आमोणकर