कर्करोग झालेल्या व्यक्तीला आजारा दरम्यान शारीरिक स्थिती सुधारण्यासाठी व वैद्यकीय उपचारांच्या कठोरतेचा चांगल्या प्रकारे सामना करण्यासाठी उत्कृष्ट पोषक आहार आवश्यक आहे. यासोबत निरोगी वजन राखणे व शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणेही आवश्यक आहे.
भारतामध्ये कॅन्सरचे प्रमाण वेगाने वाढत चालले आहे. वाढता आकडा चिंताजनक असून पुरुष आणि महिलांमध्ये समान प्रमाणात आहेत. गेल्या काही वर्षांत महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग तर पुरुषांमध्ये फुफ्फुस आणि तोंडाचे कर्करोग सर्वाधिक आढळून आले आहेत. जागरूकतेचा अभाव आणि उशिरा निदान झाल्यामुळे याचे प्रमाण अजून वाढत आहे. कर्करोगाची ही संख्या जर झपाट्याने अशीच वाढत राहिली तर २०४० पर्यंत भारतात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या दोन ते तीन पटींनी वाढण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही.
अलीकडच्या काळात माणसाची जीवनशैली आरोग्याच्या बाबतीत खूप खालावत चालली आहे. कमी शारीरिक श्रम, व्यायामाचा अभाव, बदलते वातावरण, अनुवंशिकता यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. तंबाखू, मद्यसेवन यांसारख्या व्यसनांच्या अधीन झाल्यामुळे होत असलेल्या तोंडाच्या, पोटाच्या कर्करोगांच्या प्रमाणात वाढ होत आहे. यासोबत विशेषतः जीवनशैली व खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे कर्करोग होण्याचा धोका वाढताना दिसत आहे. आपण जो आहार घेतो त्याचा वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगांच्या जोखीमींवर परिणाम होत असतो. आहार नीट ठेवल्याने शरीराला विविध पोषक तत्वे मिळतात व त्याचसोबत कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.
फळे आणि भाज्या खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात हे आपल्याला ज्ञात आहेच. यातून कमी किलोज्यूल उर्जा मिळत असल्याने याच्या सेवनाने वजन निरोगी राहण्यात मदत होते व कर्करोग रोखण्यात अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात जे तोंड आणि पोटासारख्या पचनसंस्थेच्या विशिष्ट भागात कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात. भरपूर फळे आणि भाज्या असलेला निरोगी आहार घेतल्याने फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.
दररोज विविध प्रकारचे धान्य, डाळी, शेंगा, कंद मुळे खाल्ल्याने कर्करोगापासून संरक्षणात्मक फायदे मिळू शकतात. जास्त प्रमाणात फायबर असलेले, कमीत कमी प्रक्रिया केलेले तसेच संपूर्ण धान्य असलेले पदार्थ खाण्याचा प्रयत्न करावा. ओट्स, ब्राउन तांदूळ, कॉर्न, राई, राजमा आणि मसूर हे आहारात ठेवावे. मैदा, रिफाईंड स्टार्च आणि रिफाईंड साखर असलेले पदार्थ आहारात असल्यास पोटाचा आणि आतड्यांचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो. प्रक्रिया केलेले व लाल मांस खाल्ल्याने आतड्यांचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. यामध्ये डुकराचे मांस किंवा गोमांस असते. जागतिक कर्करोग संशोधन निधी हे क्युरिंग, सॉल्टिंग किंवा स्मोकिंग किंवा कोणतीही प्रक्रिया केलेले मांस खाणे टाळण्याची शिफारस करतो. यामध्ये हॉट डॉग, हॅम, बेकन आणि काही सॉसेज आणि बर्गर यांचा समावेश आहे. त्याऐवजी आपण पोल्ट्री, मासे, कमी चरबीयुक्त मांस, अंडी, टोफू, काजू -बिया, शेंगा आणि बीन्स या प्रकारचे पदार्थ आहारात ठेऊ शकतो.
ऑलिव्ह ऑइल, कॅनोला ऑइल, एवोकॅडो, काजू आणि बिया यांसारखे मोनो-सॅच्युरेटेढ फॅटी पदार्थ आणि भाज्यांचे प्रमाण जास्त असलेला आहार स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करू शकतात. टोमॅटो, टरबूज आणि स्ट्रॉबेरीमधील लायकोपीन हे अँटिऑक्सिडेंट प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. जास्त चरबीयुक्त आहारामुळे लठ्ठपणा येऊ शकतो, जो कोलोन, स्तन, मूत्रपिंड, अन्ननलिका, पित्ताशय आणि एंडोमेट्रियमच्या कर्करोगांसह अनेक कर्करोगांसाठी जोखीम घटक आहे.
कोणताही पोषणयुक्त आहार सामान्यपणे पुढील पाच गटांत मोडला जाऊ शकतो.
फळे,
भाज्या आणि शेंगा/बीन्स
कमी चरबीयुक्त मांस, मासे, अंडी, टोफू, बिया
जास्त फायबर असलेले धान्य व इतर धान्य प्रकार
कमी चरबीयुक्त दुध, दही, चीज
हे पदार्थ समान प्रमाणात आहारात ठेवल्याने कॅल्शियम, प्रथिने व इतर प्रमुख पोषक तत्वे मिळू शकतात.
जास्त ऊर्जा व कमी फायबर प्रमाण असलेल्या आहारामुळे एखाद्या व्यक्तीचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो. त्यासोबत पुढील काही पदार्थही कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात -
कृत्रिम गोड पदार्थ - जसे की एस्पार्टम, सॅकरिन आणि सायक्लामेट आहारात टाळावे.
लोणचे किंवा खारट पदार्थ - लोणचे व खारट पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ल्यास कर्करोग आणि विशेषतः आतड्यांचा कर्करोग होण्याची भिती असते.
तेलकट पदार्थ - तळलेले किंवा परत परत गरम केलेले अन्न खाल्ल्यास पॉलिसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स नावाचे कार्सिनोजेनिक पदार्थ तयार होऊ शकतात. स्वयंपाक करताना, शक्य असेल तेथे वाफवणे, उकळणे, बेकिंग, मायक्रोवेव्हिंग, रोस्टिंग यासारख्या कमी तापमानाच्या पद्धती वापराव्या आणि ग्रील्ड मांस आणि इतर अन्नपदार्थांचे सेवन मर्यादित करण्याचा प्रयत्न करावा.
मद्यपान - दारूचे सेवन केल्याने तोंड, घसा, स्वरयंत्र, अन्ननलिका, स्तन, आतडे आणि यकृत या कर्करोगांचा धोका वाढतो. धूम्रपान करणाऱ्यांमधे हा धोका अजून असतो.
डॉ. श्वेता राऊत मुळगावकर