मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : ओसिकॉन २०२५ परिषदेचे उद्घाटन
ओसिकॉन २०२५ परिषदेचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. बाजूला इतर मान्यवर.
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारत २०४७ तसेच विकसित गोव्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सागरी अर्थव्यवस्थेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. सागरी जैवविविधता, सागरी पर्यटन व मच्छीमारी यात नवीन संशोधन व नवनिर्मिती होण्याची गरज आहे. सागरी संशोधन व तंत्रज्ञान गोव्याच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
एनआयओ - सीएसआयआर आयोजित ओसिकॉन २०२५ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एनआयओचे संचालक डॉ. सुनीलकुमार सिंग, डॉ. जया कुमारी सिलम, परिषदेचे अध्यक्ष कुरियन एनपी व इतर मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेची (एनआयओ) स्थापना १९६६ साली झाली. राज्याच्या व देशाच्या सागरी संशोधनात एनआयओचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. या परिषदेत देशभरातील विविध संस्थांचे वैज्ञानिक सहभागी होत आहेत. गोव्याला विस्तीर्ण किनारपट्टी लाभलेली आहे. सागरी अर्थव्यवस्थेसाठी सागरी संशोधन, हवामान संतूलीत ठेवण्यासाठी उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. मच्छीमारी आणि पर्यटन हे गोव्याचे प्रमुख व्यवसाय आहेत. सागरी पर्यटन तसेच नदी परिवहनात वाढ करण्यास राज्याला बराच वाव आहे.
परिषद चालणार ३ दिवस
एनआयओने आतापर्यंत गोवा सरकारला सागरी संशोधन व सागरी उपक्रमात बरेच सहकार्य केलेले आहे. भविष्यात या सहकार्यात आणखी वाढ होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली. ओसिकॉन २०२५ ही परिषद ३ दिवस चालणार आहे.