वागातोर येथे २४ लाखांचे ड्रग्ज जर्मन नागरिकाकडून जप्त

एएनसीची कारवाई : पेडलरच्या चौकशीतून सुगावा


12 hours ago
वागातोर येथे २४ लाखांचे ड्रग्ज जर्मन नागरिकाकडून जप्त

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) वागातोर येथे छापा टाकून सेबास्टियन हेस्लर (४५) या जर्मन नागरिकाला अटक केली. त्याच्याकडून एएनसीने २३.९५ लाख रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहेत.
गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एएनसीच्या पथकाने २१ जानेवारी रात्री वागातोर येथील अमानी रिसॉर्ट जवळील एका भाड्याच्या खोलीवर छापा टाकला होता. पथकाने अग्नीव सेनगुप्ता याला अटक केली होती. त्याच्याकडून ७.५ लाख रुपये किमतीचे १५.०४ ग्रॅम एमडीएमए आणि ५०.०३ ग्रॅम कोकेन, तसेच २.७४ लाख रुपये आणि विदेशी चलन जप्त केले होते. सेनगुप्ता याची चौकशी केली असता, त्याच्या संपर्कात एक विदेशी नागरिक असून ते दोघे मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी करत असल्याचे स्पष्ट झाले होते. अधीक्षक टिकम सिंग वर्मा आणि उपअधीक्षक नेर्लन आल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीत पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक दीनदयाळनाथ रेडकर व इतर सहभागी असलेल्या पथकाने सोमवारी रात्री वागातोर येथील एका ठिकाणी छापा टाकला. पथकाने सेबास्टियन हेस्लर (४५) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २३.९५ लाख रुपये किमतीचे १० ग्रॅम केटामाईन पावडर, ४०० ग्रॅम केटामाईन लिक्विड, ३० एलएसडी पेपर आणि २ किलो गांजा जप्त केला. उपनिरीक्षक दीनदयाळनाथ रेडकर यांनी संशयित हेस्लर याच्याविरोधात अमली पदार्थविरोधी कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.