पहिली रेल्वे उद्या : तिकीट, प्रवासातील भोजन विनामूल्य
पणजी : ‘मुख्यमंत्री देवदर्शन’ योजनेखाली प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यासाठी गोव्यातून मोफत रेल्वेगाडीची सोय करण्यात आली आहे. मडगाव रेल्वेस्थानकातून ही गाडी ६, १३ आणि २१ फेब्रुवारी रोजी सुटणार आहे. जाण्या-येण्यासाठीच्या प्रवासाचे तिकीट आणि प्रवासातील भोजन यांची सोय सरकारतर्फे विनामूल्य करण्यात आली आहे. याव्यतिरिक्तचा खर्च भाविकांनी स्वतः करायचा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक भाविकांनी ०८३२-२२३२२५७ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले.
पत्रकार परिषदेत माहिती देताना समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई.
पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री फळदेसाई बोलत होते. मंत्री पुढे म्हणाले, १४४ वर्षांनंतर येणाऱ्या हिंदूंसाठी अत्यंत पवित्र असलेल्या महाकुंभमेळ्याचा लाभ घेण्याची इच्छा अनेक गोमंतकीय भाविकांची आहे. याचा विचार करूनच सरकारने ‘मुख्यमंत्री देवदर्शन’ योजनेत या यात्रेचा समावेश केला आहे. याअंतर्गत गोव्यातून थेट प्रयागराजसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. ही विशेष गाडी मडगाव स्थानकातून ६, १३ आणि २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा. सुटणार आहे. रेल्वे प्रवासाचे येता-जाताचे भाडे आणि रेल्वेतील भाेजनाचा खर्च सरकारकडून केला जाणार आहे. प्रयागराज रेल्वेस्थानकापासून महाकुंभमेळ्याचे क्षेत्र ४ किलोमीटर अंतरावर आहे. तेथे जाण्याचा प्रवासखर्च, तसेच तेथील निवास व भोजनाचा खर्च प्रत्येकाने वैयक्तिक करायचा आहे, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.
इच्छुकांनी ०८३२-२२३२२५७ या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर त्यांना फॉर्म दिला जाईल. तो फॉर्म आणि हमीपत्र भाविकांना भरून द्यावे लागेल. रेल्वे प्रवासात भाविकांची जबाबदारी सरकारवर असेल. प्रवासाशिवायची जबाबदारी प्रत्येकाची वैयक्तिक असेल. यासाठीच भाविकांकडून हमीपत्र घेतले जाणार आहे. प्रत्येक रेल्वे गाडीतून १००० प्रवासी प्रवास करू शकतात. प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार प्रवेश दिला जाईल. प्रयागराजमध्ये रेल्वे पोहाेचल्यानंतर २४ तासांनी तेथून परतीची गाडी सुटेल. २४ तासांत भाविक महाकुंभमेळा स्थळी जाऊन स्नान आणि धार्मिक विधी करून येऊ शकतात, असेही मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.
इच्छुक भाविकांनी ‘हे’ करणे आवश्यक...
१. ०८३२-२२३२२५७ क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करा.
२. फॉर्म आणि हमीपत्र भरून जमा करा.
३. प्रवासाच्या दिवशी सकाळी ७.३० पर्यंत मडगाव रेल्वेस्टेशनवर पोहोचा.
४. प्रयागराजमध्ये पोहोचल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी २४ तासांत प्रयागराज रेल्वेस्थानकावर पोहोचा.
सरकारकडून विनामूल्य मिळणाऱ्या सुविधा...
१. रेल्वेचे जाता-येताचे तिकीट
२. रेल्वे प्रवासातील भोजन