प्रतिदिन फक्त ४०५ रुपये पगार १३० जणांचा जगण्यासाठी संघर्ष
वाळपई : अनेक प्रकारच्या संघर्षांना तोंड देऊन १३ वर्षे केलेले प्रामाणिक कार्य, रानामध्ये लागलेली आग विझविण्यासाठी जीवाची पर्वा न करणे, एका बाजूने जंगली श्वापदांची भीती तर दुसऱ्या बाजूने सुविधांचा अभाव अशा कठीण काळामध्ये म्हादई अभयारण्याच्या परिक्षेत्रात कार्यरत असलेल्या ट्रेकर्सना या तीन महिन्यापासून पगार मिळालेला नाही. अनेकवेळा पगार अनियमित असतो. सरकारने अजूनपर्यंत ट्रेक्टर्सची सेवा नियमित केलेली नाही. आता वयोमर्यादा संपलेली आहे. अशावेळी पुढील आयुष्य कसे जगावे अशा प्रकारची भीती ट्रेकर्सनी व्यक्त केलेली आहे.
नानोडा बांबर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत १३० ट्रेकर्सनी नियमित करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे नियमित पगार करावा. पगारांमध्ये वाढ करावी अशा प्रकारच्या मागण्या केलेल्या
आहेत. अभयारण्याची जैवविविधता जपण्यासाठी गेल्या १३ वर्षापासून प्रामाणिकपणे काम करीत आहेत. पगार फक्त ४०५ रुपये प्रतिदिन मिळत आहे. एका बाजूने महागाई वाढलेली आहे. सध्या देण्यात येणारा पगार परवडण्यासारखा नाही. पगारामध्ये वाढ करावी, अशा प्रकारची मागणी अनेकवेळा करण्यात आली. मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही, असे नंदा गावस या ट्रेकर्सने सांगितले. या संंदर्भात मुख्यमंत्री प्रमोद सावंत व वनमंत्री विश्वजीत राणे यांना निवेदनही देण्यात आले होते.
अनेक वेळा मंत्र्यांची भेट घेतली, अनेक निवेदने दिली. त्यावेळी अनेकांनी आश्वासने दिली. मात्र या आश्वासनांची अजून पर्यंत पुर्तता झालेली नाही. सर्व ट्रेकर्स सत्तरी तालुक्यातील आहे. यामुळे लोकप्रतिनिधींनी ही बाब आत्मीयतेने घ्यावी.
— तुळशीदास नाईक, ट्रेकर्स
आगीचा केला होता समर्थपणे सामना
दोन वर्षांपूर्वी सत्तरी तालुक्यात व गोव्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जंगलांना आग लागण्याचे प्रकार घडले. डोंगर उध्वस्त झाले. जंगली श्वापदांचा मोठ्या प्रमाणात होरपळून मृत्यू झाला. अशावेळी वन खात्याने आग आटोक्यात आणण्यासाठी ट्रेकर्सना दुप्पट पगार देण्याची हमी दिली होती. यावेळी या ट्रेकर्सने रात्र दिवस काम केले होते. मात्र अजूनपर्यंत मानधन मिळालेले नाही.