३,९५० नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३.५९ कोटींच्या भरपाईचे वितरण

रवींद्र भवन साखळीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित कार्यक्रम


03rd January, 11:53 pm
३,९५० नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३.५९ कोटींच्या भरपाईचे वितरण

नुकसान भरपाई वितरित करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत इतर.
वार्ताहर। गोवन वार्ता
साखळी : पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी रवींद्र भवन साखळी येथे विशेष कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शेतकऱ्यांना भरपाईचे वितरण करण्यात आले. राज्यभरातील ३,९५० शेतकऱ्यांना ३.५९ कोटी रुपयांची मंजुरीपत्रे वितरित करण्यात आली. व्यासपीठावर आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट, कृषी संचालक संदीप पळदेसाई, जिल्हा पंचायत सदस्य सुंदर नाईक, महेश सावंत, पद्माकर मळीक, कुंदा मांद्रेकर व इतर उपस्थित होते.
कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीतून बाहेर पडताना इतर पिकांच्या लागवडीवर भर द्यावा. सामुदायिक शेती केल्यास त्याचा शंभर टक्के लाभ शेतकऱ्यांना मिळतो. सामुदायिक शेतीचा ताबा जिल्हा पंचायतींकडे सोपविण्याचा निर्णय झाला असून सामायिक शेतीची योजना १५ दिवसांत अंमलात येणार आहे. सरकार शेतकऱ्यांची पूर्ण काळजी घेत आहे. शेतीबरोबरच फलोत्पादन, मत्स्यव्यवसाय, फूल लागवड, फळ लागवड अशा विषयांमध्येही शेतकऱ्यांनी लक्ष घालावे.
शेती व शेतकरी यांची काळजी सरकारला आहे. पाऊस किती व कधी पडणार याची शाश्वती नाही. शेतकऱ्यांनी राज्य सरकार व मुख्यमंत्री पाठीशी असताना ‘भिवपाची गरज ना’.
_ डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार, डिचोली
पावसाळ्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सरकारने शेतकऱ्यांना सर्व ती मदत व आर्थिक सहाय्य पुरविले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या संवेदनशील नेतृत्वामुळे हे शक्य झाले. यापुढेही शेतकऱ्यांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
_ प्रेमेंद्र शेट, आमदार, मये