१० वर्षांत पावणेपाच लाख अर्ज मंजूर : २०२३ मध्ये सर्वाधिक विक्रमी नोंद

पणजी : गेल्या १० वर्षांत (२०१५ ते २०२४) राज्यात तब्बल ४ लाख ७५ हजार ४०७ पासपोर्ट जारी करण्यात आले आहेत. एका आकडेवारीनुसार, गोव्यात वर्षाला सरासरी ४७ हजार, तर दिवसाला सरासरी ११८ जण नव्याने पासपोर्ट काढत असल्याचे समोर आले आहे. राज्यात पासपोर्ट घेणाऱ्यांच्या संख्येत वर्षागणिक वाढ होत आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या अहवालानुसार, गोव्यात २०१५ ते २०२४ या कालावधीत मोठ्या प्रमाणात पासपोर्ट जारी करण्यात आले. २०२३ मध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक पासपोर्ट जारी झाले, तर २०२० मध्ये कोविडमुळे ही संख्या नीचांकी होती. सविस्तर आकडेवारी खालीलप्रमाणे:
| वर्ष | जारी केलेले पासपोर्ट |
|---|---|
| २०१५ | ४५,३१६ |
| २०१६ | ४८,३०१ |
| २०१७ | ५२,०६४ |
| २०१८ | ५५,७४३ |
| २०१९ | ५१,३३३ |
| २०२० (कोविड) | २,८०८ (नीचांकी) |
| २०२१ | ३४,२५५ |
| २०२२ | ५१,०२६ |
| २०२३ | ५६,९१० (उच्चांक) |
| २०२४ | ५३,९८९ |
| २०२५ (जाने. ते नोव्हें.) | ४५,६५१ |
आकडेवारीनुसार, २०१९ पर्यंत पासपोर्टची संख्या स्थिर होती. मात्र, २०२० मध्ये आलेल्या कोविड महामारीमुळे परदेशवारी थंडावली आणि पासपोर्ट घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली. २०२० मध्ये केवळ २,८०८ जणांनीच पासपोर्ट घेतला. त्यानंतर २०२१ मध्ये परिस्थिती सुधारली आणि ३४ हजार २५५ जणांनी पासपोर्टसाठी अर्ज केले.
कोविडचा प्रभाव ओसरल्यानंतर २०२२ आणि २०२३ मध्ये पुन्हा पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या वाढली. गोव्यातून उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे. तसेच बोटीवर (क्रूझ) काम करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. याशिवाय, कौटुंबिक परदेश सहलींचे प्रमाण वाढल्याने पासपोर्ट काढण्याकडे कल वाढला आहे.
जानेवारी २०१४ ते नोव्हेंबर २०२५ या काळात संपूर्ण देशात १३ कोटी ८० लाख ४८ हजार ०२२ पासपोर्ट जारी करण्यात आले आहेत. यातील १.३० कोटी पासपोर्ट हे केवळ जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या काळात दिले गेले. विशेष म्हणजे, पूर्वी पासपोर्ट मिळण्यासाठी लागणारा वेळ आता खूप कमी झाला आहे. २०१५ मध्ये पासपोर्ट मिळण्यासाठी सरासरी २१ दिवस लागायचे, तेच प्रमाण २०२५ मध्ये सरासरी ६ दिवसांवर आले आहे.