नोकरी प्रशिक्षणासाठी व्यावसायिक शाखांना एप्रिलमध्ये वर्ग घेण्यास अडचण

प्राचार्य मंचच्या शिष्टमंडळाची शिक्षण संचालकांशी चर्चा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11 hours ago
नोकरी प्रशिक्षणासाठी व्यावसायिक शाखांना एप्रिलमध्ये वर्ग घेण्यास अडचण

पणजी : अभ्यासक्रमात नोकरी प्रशिक्षणाचा समावेश केल्यामुळे एप्रिलमध्ये व्यावसायिक वर्ग सुरू होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. सदर वर्ग एप्रिलमध्ये सुरू झाले तर नोकरी प्रशिक्षण कधी पूर्ण करणार, असा प्रश्न निर्मार झाला आहे. उच्च माध्यमिक प्राचार्य मंचाच्या शिष्टमंडळाने शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली.
यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे प्राचार्य मंचाचे अध्यक्ष उमेश नाईक म्हणाले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या कार्यवाहीसाठी यंदा शैक्षणिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहावी ते दहावी आणि बारावीचे वर्ग १ एप्रिलमध्ये सुरू होतील. दरम्यान, मे महिन्यात सुट्टी असेल आणि त्यानंतर जूनमध्ये पुन्हा वर्ग सुरू होतील. नववीचा निकाल जाहीर झाला नसला तरी दहावीचे वर्ग १ एप्रिलपासून सुरू होतील. एप्रिलमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची तयारी सुरू आहे.
उच्च माध्यमिक स्तरावर व्यावसायिक वर्गासाठी नोकरी प्रशिक्षण आवश्यक आहे. याचा अभ्यासक्रमात समावेश आहे. व्यावसायिक शाखेच्या विद्यार्थ्याला ४५ दिवसांचे नोकरीचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. परीक्षांनंतर विद्यार्थी एप्रिलमध्ये प्रशिक्षण घेतात. एप्रिलमध्ये सुट्टी असल्यामुळे सदर प्रशिक्षण पूर्ण करणे सहज शक्य होत असे. मात्र, यंदा बारावीचे वर्ग १ एप्रिलमध्ये सुरू होतील. संपूर्ण मे महिना धरला तरी ४५ दिवस पूर्ण होऊ शकत नाहीत. या समस्येवर मंचने शिक्षण संचालकांशी चर्चा केली. यावेळी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आणि उर्वरित दिवस मे महिन्यात प्रशिक्षण पूर्ण करण्यावर चर्चा झाली.


मे आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये नोकरीचे प्रशिक्षण घ्यायचे असेल तर विद्यार्थ्याला रजा मिळण्याचा अधिकार राहणार नाही. व्यावसायिक शिक्षक आणि मुख्याध्यापकांशी चर्चा करून यावर उपाय शोधावा लागेल. _शैलेश झिंगडे, शिक्षण संचालक  

हेही वाचा