बार्देश : नैराश्याच्या गर्तेत जात तेलगू चित्रपट निर्माता के.पी. चौधरीने केली आत्महत्या

के. पी. चौधरीने कबाली या प्रसिद्ध चित्रपटाची निर्मिती केली होती. तेव्हा पासून तो कर्जबाजारी झाला होता.

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd February, 04:56 pm
बार्देश : नैराश्याच्या गर्तेत जात तेलगू चित्रपट निर्माता के.पी. चौधरीने केली आत्महत्या

म्हापसा  : ओशेल शिवोली येथे राहत्या फ्लॅटमध्ये शंकरा कृष्णा प्रसाद चौधरी उर्फ के.पी. चौधरी (४४) या तेलगू चित्रपट निर्मात्याने गळफास लावून आत्महत्या केली. ड्रग्स तस्करी प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी जून २०२३ मध्ये के. पीला अटक केली होती. टॉलिवूडमध्ये कबाली या चित्रपटाची चौधरी यांनी निर्मिती केली होती.

 ही आत्महत्येची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास उघडकीस आली. के.पी चौधरी हे सकाळी फ्लॅटमधून बाहेर आले नसल्याने त्यांच्या शेजारील फ्लॅटमध्ये व्यक्तीने दरवाजा ठोठावला. मात्र फ्लॅटमधून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सदर व्यक्तीने फ्लॅटच्या मालकाला पाचारण केले. मालक घटनास्थळी आल्यावर त्यांनी फ्लॅटचा दरवाजा उघडला तेव्हा मयत बॅडरूममध्ये गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला.  त्याने नायलॉन दोरी व बॅडशीट फॅनला बांधून ही आत्महत्या केली.

 घटनेची माहिती मिळताच हणजूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक संदेश चोडणकर व निरीक्षक सूरज गावस यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस उपनिरीक्षक साहील वारंग यांनी पंचनामा केला व व मृतदेह शवविच्छेदनासाठी गोमेकॉत पाठवून दिला. प्राप्त महितीनुसार, गेल्या ७  महिन्यांपासून चौधरी हा शिवोलीमध्ये वास्तव्यास होता. कर्ज बाजारी होऊन आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे मानसिक तणावातून त्याने ही आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 दरम्यान, मयत के.पी. चौधरी यास १३ जून २०२३ मध्ये किस्मतपूर हैदराबाद येथे तेलंगणा पोलिसांच्या सायबराबाद पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाने ड्रग्स तस्करी प्रकरणी अटक केली होती. त्याच्याजवळ ८२.७५ ग्रॅम कोकेन सापडले होते. या प्रकरणात जामीनावर सुटका झाल्यावर त्याने गोव्यात शिवोली येथे आसरा घेतला होता.

 दरम्यान, कबाली या चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर के.पी. चौधरी कर्ज बाजारी झाला होता. त्यामुळे तो ड्रग्स खरेदी विक्री व्यवहारात उतरला होता. गोव्यात वागातोर येथे त्याने एक पब रेस्टॉरन्ट सुरू केले होते. येथून के.पी. सिलेब्रीटींना ड्रग्स पुरवत असावाअसा संशय तेलंगणा पोलिसांनी त्यावेळी व्यक्त केला होता.


हेही वाचा