दक्षिण पश्चिम रेल्वे विकासासाठी ४८२ कोटींची तरतूद
पणजी : ‘वंदे भारत’ ही रेल्वे आता केवळ गोव्याबाहेरच नाही तर गोव्यातही लवकरच सुरू होणार आहे. इतर राज्यांप्रमाणे गोवाही आंतर-शहर रेल्वे सेवा सुरू करणार असून पुढील २-३ वर्षांत वंदे भारतसारख्या एक्सप्रेस ट्रेन काणकोण ते पेडणे मार्गावर धावताना दिसतील. त्यानंतर हळूहळू ही सेवा राज्याच्या अन्य भागांतही विस्तारली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थसंकल्पांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मंत्रालयात पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई आणि कुठ्ठाळीचे आमदार अांतोन वाझ उपस्थित होते.
गोव्यात कोकण रेल्वे आणि दक्षिण पश्चिम रेल्वेच्या विकासासाठी अर्थसंकल्पात रु. ४८२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये रेल्वे स्टेशनचा विकास, नवीन मार्ग, ट्रॅकचे दुपदरीकरण आणि इतर बाबींचा समावेश आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वंदे भारतसारख्या गाड्या मुंबईला जातात. त्याच धरतीवर पेडणे ते काणकोणपर्यंत शहरांतर्गत वाहतुकीसाठी पहिली एक्सप्रेस ट्रेन गोव्यात सुरू करण्याचा प्रयत्न आहे. येथील पेडणे-कोणकोण मार्ग या वाहतुकीसाठी सोपा असल्याने प्रथम या ट्रॅकवरून ही ट्रेन धावेल. त्यानंतर फोंडा आणि पणजीसारखे क्षेत्र जोडले जातील. काणकोणहून पेडणेला येण्यासाठी रस्त्याचा वापर करण्याची गरज नाही. येत्या २-३ वर्षांत प्रवाशांना रेल्वेने प्रवास करणे शक्य होणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पेडणेहून मडगावला किंवा पेडणेहून करमाळीमार्गे पणजीला यायचे असेल तर करमळी स्टेशनवरून विशेष बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. रेल्वे मार्ग आणि बोगद्यांच्या विकासाचा प्रस्ताव कोकण रेल्वेने दिला आहे. मी गेल्या काही काळापासून रेल्वेमंत्र्यांकडे याचा पाठपुरावा करत आहे. रेल्वे मार्ग आणि बोगदे विकसित करण्यावर भर दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.
स्थानिकांसाठी लोकल ट्रेन सुरू करणार
स्थानिक प्रवाशांना फायदा व्हावा यासाठी सरकारचा लोकल ट्रेन सुरू करण्याचा मानस आहे. भविष्यात ही सेवा सिंधुदुर्ग आणि कारवारपर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे. गोव्यातून बरेच लोक सिंधुदुर्ग आणि कारवारला जातात. मोपा विमानतळावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही या ट्रेनचा फायदा होईल. तसेच कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातूनही प्रवासी याचा वापर करू शकतात, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.