गोव्यातील कचरा व्यवस्थापनावर आता एआयची नजर

हैदराबाद आयआयटीसोबत करार : कचरा व्यवस्थापनाची वाढणार क्षमता

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th February, 11:42 pm
गोव्यातील कचरा व्यवस्थापनावर आता एआयची नजर

पणजी : राज्यातील कचरा व्यवस्थापनावर आता एआयची नजर राहणार आहे. यासाठी गोवा घन कचरा व्यवस्थापन महामंडळाने नुकताच आयआयटी हैदराबाद आणि युनायटेड वे या एनजीओसोबत सामंजस्य करार केला आहे. यानुसार एआय कॅमेरे, संगणक व्हिजन तंत्रज्ञानाचा वापर करून कचरा व्यवस्थापनाची क्षमता वाढणार आहे. पहिल्या टप्प्यात हा प्रकल्प साळगाव आणि काकोडा कचरा व्यवस्थापन प्रकल्पात सुरू करण्यात येणार आहे. महामंडळाचे उपव्यवस्थापक शशांक देसाई यांनी ही माहिती दिली.
देसाई यांनी सांगितले की, कचरा प्रकल्पावर एआय कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. हे कॅमेरे येथे वर्गीकरण करण्यात येणाऱ्या पट्ट्याजवळ (कन्व्हेयर बेल्ट) बसवण्यात येणार आहे. यामुळे येथे कोणत्या प्रकारचा कचरा येतो, त्याचे ओले आणि सुके असे वर्गीकरण योग्य झाले आहे का? कचऱ्याच्या वर्गीकरणातून उपयुक्त कचरा वाया जात आहे का ? कामगारांची क्षमता वाढवणे अशा गोष्टींची माहिती मिळणार आहे. गोळा केलेल्या महितीवरून अन्य प्रकल्पांसाठी अधिक कार्यक्षम प्रणाली विकसित करता येणार आहे.
हा प्रकल्प भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने आरोग्यसेवा, शेती आणि शाश्वत शहरांसाठी घरगुती वापराच्या एआय तंत्रज्ञानाचा विकास आणि वापर सुलभ करण्यासाठी सुरू केलेल्या अनुदान कार्यक्रमाचा एक भाग आहे. ‘मेक एआय इन इंडिया एआय मेक एआय वर्क फॉर इंडिया’ चा भाग म्हणून तीन उत्कृष्टता केंद्रे (सेंटर फॉर एक्सलन्स) स्थापन केली आहेत. या प्रकल्पाला आयआयटी कानपूर येथील केंद्राद्वारे निधी दिला जात आहे.

शशांक देसाई म्हणाले...
- एआय आधारित उपाय विकसित करून कचरा व्यवस्थापन पद्धतींची कार्यक्षमता सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
- या सामंजस्य कराराने सुरू होणाऱ्या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुका कचरा वर्गीकरणाची कार्यक्षमता सुधारण्यात येईल.
- यामुळे महामंडळाला अधिक आर्थिक मूल्य असणारा कचरा वर्गीकरण प्रक्रियेत मिळणार आहे.
- पुढील टप्प्यात घरोघरी केल्या जाणाऱ्या कचरा उचल पद्धतीत एआय वापरण्याचा विचार सुरू असल्याचे देसाई यांनी सांगितले.

हेही वाचा