पोलिसांकडून आदेश जारी
डिचोली : येथील पोलीस स्थानकाची महिला पोलीस कॉन्स्टेबल पूजा गावस हिला वाहतूक चलनाच्या तब्बल १७.३० लाखांच्या रकमेची अफरातफर केल्या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे . गोवा पोलिसांकडून याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे.
महितीनुसार, डिसेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान हा प्रकार घडला. डिचोली पोलिसांनी याकाळात डिचोलीतील विविध ठिकाणी शेकडो लोकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावला. जारी करण्यात आलेल्या चलनांची माहिती ही संबंधित पोलिसांकडून आल्तिनोच्या वाहतूक पोलीस मुख्यालयात पोचवली जायची. यानंतर सर्व रक्कम पोलीस स्थानकात तैनात असलेल्या महिला कॉन्स्टेबलकडे सुपूर्द केली जायची. दरम्यान या महिला कॉन्स्टेबलने तिच्याकडे आलेल्या रकमेतील अर्धीच रक्कम बँकेत जमा केली. पोलीस मुख्यालयाने जेव्हा डिचोली पोलीस स्थानकाने जारी केलेले चलन आणि जमा झालेली रक्कम याचा हिशेब केला तेव्हा यात बरीच तफावत आढळून आली.
यांंनंतर सदर व्यवहारात कुणाचा हात होता याचा मागोवा काढण्यात आला. चौकशी केली गेली. चौकशी अंती सदर महिला कॉन्स्टेबलने आपला गुन्हा मान्य केला. तसेच सर्व रक्कम परत करू अशी हमी देखील दिली. दरम्यान सदर प्रकरणाला माध्यमांद्वारे वाचा फुटल्यानंतर खात्यात खळबळ माजली. आता खात्याने कारवाईचा बडगा उगारत संबंधित महिला पोलीस कॉन्स्टेबलचे निलंबन केले आहे.
बातमी अपडेट होत आहे.