सत्तरी : माकडानंतर आता सत्तरीतील बागायतदारांसमोर शेकरूचा यक्षप्रश्न

शेतकरी आणि बागायतदार हतबल.

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
3 hours ago
सत्तरी : माकडानंतर आता सत्तरीतील बागायतदारांसमोर शेकरूचा यक्षप्रश्न

वाळपई : सत्तरी तालुक्यातील शेतकरी आणि बागायतदार सध्या हवालदिल बनले आहेत. पावसाळ्यात मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने शेती-बागायतींनी चांगला जीव धरला होता. येथील सुपाऱ्या, नारळ आणि विविध फळांना पाहून येथील कष्टकरी लोक सुखावले होते. पण यानंतर  माकडे आणि शेकरूंनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. खारीपेक्षा ३ पट मोठा असणारा हा शेकरू हाताला मिळेल ते ओरबाडतो, जरासे खातो आणि उर्वरित तेथेच टाकून देतो असा आजपर्यंतचा अनुभव आहे. वन खात्याकडे येथील लोकांनी अनेकवेळा तक्रार दिली पण त्याच्याकडून कोणतेही पाऊल उचलले जात नाही असाही येथील लोकांचा अनुभव आहे. 




अडवई येथील युवराज देसाई यांचे नुकसान

अडवई येथील युवराज देसाई यांच्या बागायतीमध्ये नारळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते.  गेल्या काही महिन्यापासून शेकरू (खारीसारखा प्राणी)  सध्या उपद्रवी ठरवू लागलेला आहे. त्यांना हाकलून लावणे शक्य नाही. हा प्राणी खूपच खोडकर असून तो नारळाच्या झावळ्यांच्या कप्प्यामध्ये हा दडून बसतो. अनेक प्रकारच्या क्लूप्त्या लढवून देखील शेकरू नारळांची नासाडी करतोच असे देसाई यांनी हवालदिल होऊन सांगितले.



माकड परवडले पण शेकरू नको.. 

जवळपास गेल्या दीड दोन दशकांपासून तालुक्यामध्ये माकडांद्वारे मोठ्या प्रमाणात केळी, अनानास,काजू ,आंबा, चिकू सारख्या पिकांवर ताव मारला जात होता. आता त्यात सुपारी आणि नारळाचीही भर पडली आहे. सरकारने या रानटी जनावरांना उपद्रवी म्हणून घोषित करावे व त्यांचा बंदोबस्त करावा अशा प्रकारची मागणी सातत्याने करण्यात येते. मात्र त्याच्याकडे अजून पर्यंत लक्ष देण्यात आलेले नाही. यामुळे बागायतदारांना दरवर्षी आतोनात नुकसानीला सामोरे जावे लागते.  या संदर्भात त्यांनी वाळपई कृषी कार्यालयाकडे तक्रार केलेली आहे .मात्र सरकारकडून अजून पर्यंत उपाययोजना करण्याचे धोरण निश्चित केलेले नाही. यामुळे विभागीय कृषी अधिकारी सुद्धा हतबल झाल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. माकड परवडले पण शेकरू नको असे ते म्हणतात.



तटपुंज्या नुकसान भरपाईवर शेतकरी-बगायतदार नाराज

रानटी जनावरांकडून शेती बागायती  नुकसानी करण्यात आल्यानंतर सरकारकडून भरघोस नुकसान भरपाई देण्याची तरतूद नाही. बागायतदारांना तुटपुंजी नुकसानी भरपाई मिळत आहे. एकीकडे भरघोस पिक नाही, त्यात काही पिकले रूजले तर त्यावर जनावरांची नजर पडते. त्यातून जे काही बचावले तर ते बाजारात विकले जाते. बाजारात देखील या मालाला दिलासादायक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आबाळ होते. नुकसान भरपाई ही नाममात्रच मिळते. त्यातून खत आणि मशागतीचा खर्च देखील सूटत नाही. अशाने पुन्हा मेहनत घेऊन शेत-बागायत पिकवणे म्हणजे जिवावर येते असे देसाई म्हणाले.  


Goa and Kokan News in Marathi | Breaking Goa Batmya and Headlines | दैनिक  गोमन्तक


निवेदने केली, अर्ज दिले, पाहण्याही झाल्या आणि भरपाईही मिळाली मात्र दिलासा नाहीच 

रानटी जनावरांवर उपाययोजना करण्यात यावी. त्यांना उपद्रवी घोषित करावे. त्यांना मारण्याची परवानगी शेतकरी बांधवांना उपलब्ध करून द्यावी. बंदुकांसाठी परवाने द्यावे अशा प्रकारच्या अनेक मागण्या करीत  तालुक्यातील शेतकरी बांधवांनी सरकारपुढे वेळोवेळी हात पसरवले .मात्र त्याची दखल अजून पर्यंत सरकारने अजिबात घेतलेली नाही. यामुळे सध्यातरी सत्तरी तालुक्यातील बागायतदार पूर्णपणे त्रस्त झालेत.


Goan Varta: केरी-सत्तरीत गवारेड्यांचा उच्छाद ! दृष्टीस पडला ८ ते १०  गव्यांचा कळप


बागायतदारांनी अनेकवेळा विनंती केल्यानंतर पर्येच्या आमदार डॉ देविया राणे यांनी दोन वेळा रानटी जनावरांच्या उपद्रवांवर प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित केला. सरकारने या प्रश्नासंदर्भात गंभीर व्हावे. सत्तरी तालुका हा पूर्णपणे कृषिप्रधान आहे .रानटी जनावरांच्या उपद्रवामुळे सत्तरी तालुक्यातील शेतकरी बांधव त्रस्त झालेली आहेत. यामुळे सरकारने याबाबत गंभीर्याने विचार करावा व उपाययोजना कराव्या अशा प्रकारची विनंती आमदार राणे यांनी केली मात्र सरकारने अजून पर्यंत या संदर्भात कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही. 


गोव्याच्या कुळागरांचे वैभव निसर्गाची गोडी लावणारे विश्व ! | Dainik Gomantak


दरम्यान  राज्यभरात नारळाचे दर गेल्या काही महिन्यांत लक्षणीयरित्या वाढले आहे. सत्तरीतील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नारळाचे उत्पादन घेण्यात येते. पण विविध कारणांमुळे नारळाचे उत्पादन खुंटत चालले आहे. त्यात आता तयार पिकांवर अशा प्रकारे आरिष्ट्य ओढवल्यावर सामान्य लोकांच्या खिशाला अजूनच कात्री लागेल अशी चिंताही व्यक्त होत आहे. 


हेही वाचा