सत्तरीः वाळपई नगरपालिका क्षेत्रात वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने हटवा! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

वाहने न हटवल्यास जप्तीची करण्याची कारवाई करणार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th February, 03:47 pm
सत्तरीः वाळपई नगरपालिका क्षेत्रात वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने हटवा! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

वाळपईः वाळपई नगरपालिका क्षेत्रातील गेल्या अनेक महिन्यापासून वापरात नसलेली वाहने हटविण्याचे आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. एकूण चार वाहने अनेक दिवसांपासून रस्त्याच्या बाजूला उभी करण्यात आली आहे. 

याचा इतर वाहतुकीवर परिणाम होत आहेत. त्यामुळे महिन्याच्या आत सदर वाहने हटवावीत अन्यथा ती जप्त करण्यात येतील असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला आहे. त्याची अंमलबजावणी ताबडतोब करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश वाळपई नगरपालिकेने दिले आहेत. 

याबाबतची माहिती अशी की वाळपई नगरपालिका क्षेत्रामध्ये सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे या भागात वाहतुकीचे नियोजन करण्यात यावे अशा प्रकारची मागणी अनेक वर्षापासून होत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्षितपणा करण्यात येत होता.

रस्त्याच्या बाजूला बेशिस्त वाहनांची पार्किंग करणे, पार्किंग करताना मनमानी करणे यावर कारवाई करण्यात येत नसल्यामुळे गेल्या दहा वर्षापासून या गोंधळामध्ये दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे. 

गेल्या सहा महिन्यापासून या भागात (जीए०१ एस ३२७५) मारुती व्हॅन (जीए०१ सी १०१०) टाटा जीप (जीए०१ यू२४२७) मिनी बस (जीए०८ ई १४६७) मारुती व्हॅन क्रमांकाची वाहने वाळपई फातिमा कॉन्व्हेंट, वाळपई ठाणे रस्ता, वाळपई पुलानजीक, नाणूस जंक्शन, पोलीस स्थानकावर जाणारा रस्ता या बाजूला पार्क करून ठेवण्यात आलेली आहेत. 

सदर वाहने वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करत असून या संदर्भाची माहिती स्थानिक नगरपालिकेने उपजिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांनी विशेष आदेश देऊन, 'सदर वाहने हटविण्यात यावीत, ज्या मालकांची सदर वाहने आहेत त्यांनी ती ताबडतोब काढावीत. अन्यथा येणाऱ्या काळात सदर वाहनांवर जप्तीची करण्याची कारवाई करण्यात येणार' असे आदेश दिले आहेत.

निर्देशाची कडकपणे अंमलबजावणी होणारः बाणावलीकर
या संदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी धीरेंद्र बाणावलीकर यांच्याशी संपर्क साधला आता त्यांनी सांगितले की, वाहने हटविण्याच्या निर्देशाची अंमलबजावणी कडकपणे करण्यात येणार आहे. 

यामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नसून नगरपालिका क्षेत्रामध्ये वाहतुकीत होणाऱ्या गोंधळाबाबत सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचाही बाणावलीकर म्हणाले. 

हेही वाचा