मृत दुचाकीस्वाराच्या कुटुंबीयांना ३३.६२ लाखांच्या भरपाईचा आदेश

मोटार अपघात दावा प्राधिकरणाचा निवाडा : आठ वर्षांपूर्वीची घटना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th February, 12:18 am
मृत दुचाकीस्वाराच्या कुटुंबीयांना ३३.६२ लाखांच्या भरपाईचा आदेश

मडगाव : फोंडा परिसरात २०१७ मध्ये कारच्या धडकेने सागर बाबल नाईक यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी फोंडा येथील मोटार लवादाने कार मालक व इन्शुरन्स कंपनीला ९ टक्के व्याजदराने ३३,६२,५३८ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. याबाबतचा आदेश फोंडा येथील मोटार अपघात दावे लवादाच्या सदस्य न्या. अपूर्वा नागवेकर यांनी दिला.
याप्रकरणी सागर यांच्या आईसह भाऊ आणि भावजय यांनी फोंडा येथील मोटार अपघात दावे लवादात नुकसान भरपाईसाठी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार, सागर बाबल नाईक हे आपल्या दुचाकीवरून १४ फेब्रुवारी २०१७ रोजी भाटी-शिरोडा येथून वाझे शिरोडाच्या दिशेने जात होते. फोंडा येथील सेंट अँथनी चर्चनजीक पोहचताच त्याच्या दुचाकीला पाठीमागून येणार्‍या टाटा सिएरा कारने धडक दिली. त्यात सागर यांना गंभीर दुखापत झाली व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी फोंडा पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर कारचालक व मालक राजेंद्र पांडुरंग नाईक यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला होता.
सागर याचा अपघाती मृत्यू हा कारचालकाच्या निष्काळजीपणे वाहन चालवण्यामुळे झाला. सागर हा घरातील एकुलता एक कमावता व्यक्ती होता. त्यामुळे त्याची आई भगवंती नाईक, भाऊ सत्यजित नाईक व भावजय अपर्णा सत्यजित नाईक यांनी कारचालक व मालक राजेंद्र नाईक तसेच बजाज अलाइंस जनरल इन्शुरन्स यांच्याकडून मोटार अपघात दावा लवादाकडे अर्ज केला. त्यात त्यांनी ३९,७६,०१५ एवढी नुकसान भरपाई मिळावी यासाठी मोटार कायद्यांतर्गत अर्ज सादर केला होता. इन्शुरन्स कंपनीकडून लवादाकडे लेखी म्हणणे मांडले होते, त्यात त्यांनी कारचालकाने बेदरकारपणे गाडी चालवण्याचा आरोप चुकीचा आहे. सदर दुचाकी अपघात हा हिट अँड रन प्रकरण असून अज्ञात ट्रकने धडक देत पोबारा केल्याचा दावा केला. तसेच पोलिसांनाही याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यास ४५ दिवसांचा अवधी घेतल्याचे दावा करून भरपाई देण्यास नकार दिला होता. फोंडा पोलिसांनी कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे तसेच कार भरधाव वेगाने ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याचे आरोपपत्रात नमूद केले होते.
३० दिवसांच्या आत नुकसान भरपाई द्या!
मोटार अपघात लवादाने दिलेल्या आदेशानुसार सागर नाईकवर त्याच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह सुरू होता असे निरीक्षण नोंदवून लवादाने इन्शुरन्स कंपनी व कार चालकाला ९ टक्के व्याजदराने ३३,६२,५३८ लाख रु. नुकसान भरपाईचा आदेश जारी केला. यातील ३२ लाख ६५ हजार ७३८ रुपये सागर याची आई भगवंती नाईकला द्यावेत, तर भाऊ सत्यजित व भावजय अपर्णा यांना प्रत्येकी ४८,४०० रुपये देण्याचा आदेश दिला आहे. सदर नुकसान भरपाई आदेश जारी झाल्यापासून ३० दिवसांच्या आत देण्यास सांगितले. मुदतीनंतर २ टक्के जादा व्याजदराने पैसे देण्याचाही आदेश जारी केला आहे.

हेही वाचा