तिळारी घाटातील अवघड वळणावर संरक्षक भिंत उभारण्यास सुरुवात

पीडब्ल्यूकडून काम : तीन महिन्यांहून अधिक काळ एस.टी. वाहतूक होती बंद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12 hours ago
तिळारी घाटातील अवघड वळणावर संरक्षक भिंत उभारण्यास सुरुवात

बेळगाव : कोकण आणि घाटमाथ्याला जोडणाऱ्या तिळारी घाटाच्या दुरुस्तीला अखेर बांधकाम विभागाकडून मुहूर्त मिळाला आहे. घाटातील एका वळणावर अपघातप्रवण क्षेत्र अाहे. त्या ठिकाणी दुरुस्ती गरजेची असल्याच्या मुद्यावर एसटी महामंडळाचा वाहतूक विभाग ठाम राहिल्याने बांधकाम विभागाने मंगळवारपासून कामाला सुरुवात केली आहे. अपघातप्रवण जागेवर गॅबियन भिंत उभारण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. या कालावधीत घाटातील वाहतूक बंद राहणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिण भाग, बेळगाव परिसरातील वाहनधारकांना कोकण व गोव्याला जाण्यासाठी हा सर्वांत जवळचा मार्ग ठरतो. त्याशिवाय कर्नाटक, केरळ राज्यांतील अवजड वाहतूक याच मार्गाने मोठ्या प्रमाणात होते. गेल्या वर्षभरात घाटातील एका वळणावर सातत्याने अपघात झाले. त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंटची भिंत उभारली होती. मात्र, अपघातांमुळे ती कोलमडली आहे. शिवाय वळण आणि उतार असल्यामुळे हे क्षेत्र अपघात प्रवण बनले आहे. या मुद्यावर एसटी महामंडळाचे वाहतूक अधिकारी एसटी सेवेसाठी तयार नव्हते. सुमारे तीन महिन्यांहून अधिक काळ तिलारीनगरपासून पुढे घाटातील गावांना जोडणारी एसटी वाहतूक बंद होती. त्यामुळे चंदगड, गडहिंग्लज परिसरात शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी, नोकरदार यांची गैरसोय झाली होती. त्याचा रोष एसटी महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत होता. मात्र, अपघातप्रवण क्षेत्राची योग्य प्रकारे दुरुस्ती केल्याशिवाय वाहतूक सुरू करता येणार नाही, असा अहवाल वाहतूक विभागाकडून दिला जात असल्याने एसटीचे अधिकारी गाडी सुरू करण्यास धजावत नव्हते.

प्रवासी, नागरिकांच्या दबावामुळे काम

प्रवासी आणि नागरिकांचा वाढता दबाव विचारात घेऊन बांधकाम विभागाने या क्षेत्राच्या दुरुस्तीला सुरुवात केली आहे. या ठिकाणी गॅबीयन पद्धतीने भिंत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. या कालावधीत घाटातील वाहतूक बंद राहणार आहे. 

हेही वाचा