भाजप प्रवेशाबाबत दिले सूचक संकेत
पणजी : मी दुसऱ्यांच्या घरात गेलो नाही. शिंगे आपटली म्हणून बाहेर राहिलो, असे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. परंतु, भाजपात पुन्हा प्रवेश करण्यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना ‘काळच काय ते ठरवेल’, असे म्हणत त्यांनी पुढे बोलणे टाळले.
मुख्यमंत्री असतानाही २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पराभवाचा झटका बसला. त्यानंतर २०२२ च्या निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी भाजपला रामराम करीत मांद्रेतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. पण, त्यातही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतरच्या काळात पार्सेकर पक्षापासून कायमच दूर राहिले. दामू नाईक यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी भाजप कार्यालयात जाऊन नाईक यांचे अभिनंदन केले. तेव्हापासून पार्सेकर पुन्हा भाजपात परतणार का, याबाबतच्या चर्चांनी जोर धरलेला आहे. मंगळवारी याच संदर्भात पत्रकारांनी त्यांना विचारले असता, ते काळच ठरवेल असे म्हणत त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले.
दामू नाईक माझे जीवाभावाचे मित्र आहेत. आम्ही दोघांनी एकत्रितपणे पक्षाचे काम केले आहे. त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मला आनंद झाला. त्यामुळेच आपण त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गेलो, असेही पार्सेकर यांनी नमूद केले.
नि:स्वार्थीपणे येणाऱ्यांचे पक्षात स्वागत
लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पुन्हा पक्षात घेण्याबाबत प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना विचारले असता, कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता पक्षात येऊन काम करणाऱ्यांचे नेहमीच स्वागत असेल, असे उत्तर त्यांनी दिले.