राजस्थानातील गोगुंडा पोलिसांच्या सहकार्यामुळे एक संशयित ताब्यात
मडगाव : गांजाप्रकरणी अटकेतील संशयितांच्या माहितीनुसार कोलवा पोलिसांनी दोन सप्लायर्सला अटक केली. २.४० लाखांचा गांजा सोनू कुमार चौहानला दिल्याप्रकरणी संशयित राकेश मेघवाल (१९, उदयपूर) याला राजस्थानमधून अटक केली, तर ३.०८ लाखांचा गांजा विनायक चौहानला पुरवल्याप्रकरणी ओडिशातील सागर पाणीज्राही (२७) यालाही अटक केली.
दक्षिण गोवा जिल्हा पोलीस पथकाकडून अमलीपदार्थविरोधी कारवाईला आणखी वेग देत गांजा विक्री करणार्यांसह गांजा पुरवठा करणार्यांना अटक करत गोव्यातील गांजा पुरवठ्याची चेन तोडण्याचा प्रयत्न होत आहे.
दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. २९ डिसेंबर २०२४ रोजी गांधावली कोलवा येथे कोलवा पोलिसांकडून संशयित सोनू कुमार चौहान (२४, रा. नावेली, मूळ जौनपूर, उत्तरप्रदेश ) याला २.४० लाख रुपये किमतीच्या २.४०१ किलो गांजासह अटक केली.
अटक करून पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान संशयित सोनू कुमार याने अमलीपदार्थ पुरवठा करणार्या राकेश मेघवाल याचे नाव उघड केले. यांनतर कोलवा पोलीस उपनिरीक्षक प्रथमेश महाले, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग चव्हाण व विजय राजपूत यांचे पथक राजस्थान येथे २९ जानेवारी रोजी गेले.
राजस्थानातील गोगुंडा पोलिसांच्या सहकार्यातून व तांत्रिक टेहळणीद्वारे राकेश मेघवाल (१९, उदयपूर, राजस्थान) याला अटक करण्यात आली. न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली व गोवा पोलिसांकडून संशयित राकेश याला ३ फेब्रुवारीला गोव्यात आणण्यात आले.
संशयिताला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा, पोलीस उपअधीक्षक सिध्दांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोलवा पोलीस निरीक्षक रितेश तारी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
संशयित सागर पाणीज्राही अटकः
कोलवा पोलिसांकडून १२ जानेवारी रोजी वानेली, कोलवा येथे छापा टाकत गांजा बाळगल्याप्रकरणी संशयित विनायक चौहान (२४, मंडोप, नावेली) याला अटक केली व संशयिताकडून ३.०८ लाखांचा ३.०८२ किलो गांजा जप्त केला होता. अटक करुन कोलवा पोलिसांकडून केलेल्या चौकशीदरम्यान संशयित विनायक याने गांजा पुरवठादार संशयित सागर पाणीज्राही (बरामपूर, ओडिशा) याचे नाव सांगितल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक मंजू वांतामुरी यांनी तपास केला होता.