एसआयटीकडून म्हापसा, वाळपई प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र
पणजी : जमीन हडप प्रकरणातील मुख्य संशयित सिद्दिकी उर्फ सुलेमान खान याच्या विरोधात विशेष तपास पथकाने (एसआयटी) म्हापसा आणि वाळपई प्रथमवर्ग न्यायालयात दोन वेगवेगळी आरोपपत्र दाखल केली आहे. त्यानुसार, म्हापसा न्यायालयात ८५२ पानी, तर वाळपई न्यायालयात ६५६ पानीचे आरोपपत्र दाखल केले आहे.
गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) दिलेल्या माहितीनुसार, म्हापसा जमीन हडप प्रकरणात तत्कालीन उपनिबंधक अर्जुन शेटये यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, एकतानगर हाऊसिंग बोर्ड मधील म्हापसा शहर चलता क्र. २, पीटीशीट क्र. ६७ मधील २० हजार ८१९ चौरस मीटर जमीन उपनिबंधकांचा बनावट रबर स्टॅम्प आणि बनावट कागदपत्रे कायदेशीर असल्याचे भासविले व जमीन संशयित सिद्दिकी सुलेमान याने इतर संशयितांच्या साहाय्याने उपनिबंधक कार्यालयाकडून आपल्या नावावर केली होती.
याची दखल घेऊन म्हापसा पोलिसांनी १९ सप्टेंबर २०२० रोजी संशयितांविरुद्ध भादंसंच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, सरकारने जमीन हडप प्रकरणात एसआयटी स्थापन केल्यानंतर वरील प्रकरण तिथे वर्ग करण्यात आले. एसआयटीचे उपनिरीक्षक प्रितेश मडगावकर यांनी तपास सुरू केला. दरम्यान, या प्रकरणातील संशयित सिद्दिकी चार वर्षांपासून फरार होता. त्याला १२ नोव्हेंबर २०२४ रोजी एसआयटीने हुबळीमधून अटक केली होती. सिद्दिकीने १३ डिसेंबर २०२४ रोजी पहाटेच्या सुमारास आयआरबी कॉन्स्टेबल संशयित अमित नाईक याच्या मदतीने गुन्हा शाखेच्या कोठडीतून पलायन केले होते. गुन्हा पथकाने एर्नाकुलम-केरळ पोलिसांच्या मदतीने सिद्दिकीला २१ रोजी अटक केली. दरम्यान या प्रकरणी एसआयटीने तपासपूर्ण करून सिद्दिकीविरोधात म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात ८५२ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० रोजी होणार आहे.
सिद्दिकीविरोधात वाळपई पोलिसांत गुन्हा नोंद
वाळपई पोलीस स्थानकात संशयित सिद्दिकी विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यातही एसआयटीने वाळपई प्रथमवर्ग न्यायालयात ६५६ पानीचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानुसार, या प्रकरणी राफेल लुईस लोबो यांनी ६ ऑक्टोबर २०२० रोजी म्हापसा पोलिसांत, तर २७ डिसेंबर २०२१ रोजी वाळपई पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार, संशयितांनी त्याच्या पूर्वजांच्या तिसवाडी तालुक्यातील गवळी-मोवळा भाटी येथील ३६/० मधील १,०९,५०० चौ.मी, सर्वे क्र. ३७/० मधील ३८,३२५ चौ.मी. ३८/१ मधील ६८,२५० चौ.मी. जमिनीची बनावट विक्री पत्राची नोंद वाळपई येथील उपनिबंधक करून विक्री केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी वाळपई पोलिसांनी गुन्हा नोंद केला.