रोखे खरेदी व्यवहारप्रकरणातून माजी मंत्री प्रकाश वेळीप आरोपमुक्त

फसवणूकप्रकरणी पुरावे नसल्याचे निरीक्षण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd February, 12:15 am
रोखे खरेदी व्यवहारप्रकरणातून माजी मंत्री प्रकाश वेळीप आरोपमुक्त

पणजी : २००४ - २००५ मधील रोखे खरेदी व्यवहार प्रकरणात गोवा राज्य सहकारी बँक लिमिटेडचे माजी अध्यक्ष तथा माजी मंत्री प्रकाश शंकर वेळीप यांच्या विरोधात फसवणूक प्रकरणी कोणतेही पुरावे नाहीत, असे निरीक्षण नोंदवून पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने वेळीप यांना आरोपातून मुक्त केले आहे. याबाबतचा निवाडा सत्र न्या. इर्शाद आगा यांनी दिला आहे.

गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) ने या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. बँकेचे माजी सरव्यवस्थापक (दक्षता विभाग) डी. व्ही. गावकर यांनी २७ ऑक्टोबर २००९ रोजी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश वेळीप, आर.आर. फळ आणि टी. व्ही. वेर्लेकर या गुंतवणूक समिती विरोधात तक्रार दाखल केली होती.

१२ एप्रिल २००४ ते ११ मार्च २००५ या कालावधीत, संशयितांनी त्यांच्या अधिकृत पदाचा वापर करून बँकेचे अंदाजे ३२ कोटी ७२ लाख ३४ हजार ९२५ रुपये नुकसान केल्याचा दावा केला.

या प्रकरणी ईओसीने गुन्हा दाखल करून तपास केला. त्यानंतर तपास पूर्ण केल्यानंतर १९ नोव्हेंबर २०१४ रोजी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात माजी अध्यक्ष प्रकाश वेळीप आणि टी. व्ही. वेर्लेकर याच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी न्यायालयाने २४ मे २०२२ रोजी वेळीप आणि वेर्लेकर यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश जारी केला. याला प्रकाश वेळीप यांनी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले. त्यात राज्य सरकार, आर्थिक गुन्हा विभाग (ईओसी) आणि टी. व्ही. वेर्लेकर यांना प्रतिवादी केले. या प्रकरणी वेळीप यांच्यातर्फे अॅड. यतिश नाईक यांनी बाजू मांडली. आपल्या अशीलाला जाणूनबुजून लक्ष्य करून या प्रकरणात गुतवले. गुंतवणूक समितीने मंजूर केलेला निर्णय होता. तसेच बँकेला नुकसान पोहोचवण्याचा हेतूने निर्णय नसल्याचा दावा केला. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू एेकून आणि प्रथमवर्ग न्यायालयाने दिलेल्या आदेशाची दखल घेऊन वरील निरीक्षण नोंदवून प्रकाश वेळीप यांना रोखे खरेदी व्यवहार प्रकरणी आरोपातून मुक्त केले.

बँकेचे ३२ कोटी ७२ लाखांचे नुकसान केल्याचा दावा

१२ एप्रिल २००४ ते ११ मार्च २००५ या कालावधीत, संशयितांनी त्यांच्या अधिकृत पदाचा वापर करून कोलकाता येथील इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट बँक ऑफ इंडिया (आयआयबीआय) चे १९,००६ रोखे आणि नोएडा टोल ब्रिज कंपनी लिमिटेड (एनटीबीसीएल) चे १८१२ बाँड जास्त किमतीत खरेदी केले आणि बँक निधीतून ७० कोटी २५ हजार ४७५ रुपये गुंतवणूक केली. त्यामुळे बँकेचे अंदाजे ३२ कोटी ७२ लाख ३४ हजार ९२५ रुपये नुकसान केल्याचा दावा केला. 

हेही वाचा