पणजी स्मार्ट सिटीच्या ३५ प्रकल्पांपैकी २६ प्रकल्प पूर्ण : संजित रॉड्रिग्स

मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत घेणार पूर्ण झालेल्या कामांचा आढावा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th February, 12:13 pm
पणजी स्मार्ट सिटीच्या ३५ प्रकल्पांपैकी २६ प्रकल्प पूर्ण : संजित रॉड्रिग्स

पणजीः मागील काही कालावधीपासून सुरू असलेल्या पणजी स्मार्ट सिटीच्या ३५ प्रकल्पांपैकी २६ प्रकल्प पूर्ण झाले असून ९ प्रकल्प आणि रस्त्यांची मुख्य कामे येत्य‍ा ३१ मार्चपर्यंत पूर्ण होतील अशी माहिती पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे (आयपीएससीडीएल) मुख्य कार्यकारी अधिकारी संजित रॉड्रिग्स यांनी दिली आहे. या व्यतिरिक्त लँडस्केपिंग, पेव्हमेंट, रंगकाम अशा कामांसाठी ३० जूनपर्यंतचा कालावधी लागू शकतो असे त्यांनी सांगितले. 

पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामांमुळे शहरातील वाहतुकीवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे शहरात वाहनधारकांना वारंवार वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांवर सुरू असलेल्या खोदकामामुळे त्यात भर पडली आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही कामे पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा नागरिक करत आहेत. 

स्मार्ट सिटीची कामे पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत या पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेणार आहेत. पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे हस्तांतरण आणि देखभाल याबाबत लवकरच धोरण ठरवण्यात येणार असून देखभालीबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने काही प्रकल्पाचे हस्तांतरण थांबवले असल्याचेही रॉड्रिग्ज, यांनी सांगितले.

हेही वाचा