रेडे, म्हशींच्या मांसाची निर्यात : २८.५ टन मांस घेऊन कंटेनर इराकमध्ये रवाना
उसगाव येथील गोवा मांस प्रकल्प.
फोंडा : म्हारवासडा-उसगाव येथील गोवा मांस प्रकल्पातून रेडे व म्हशीचे मांस निर्यात करण्यास सुरुवात झाली आहे. तब्बल वीस वर्षांनंतर बंद झालेली निर्यात पूर्वपदावर आल्याने प्रकल्पाला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. प्रकल्पातून २८.५ टन मांस घेऊन एक कंटेनर इराक देशात रवाना झाला आहे. इतर राज्यांतून प्रकल्पासाठी लागणारी गुरे वाहतूक करताना काहीजण अडचण निर्माण करत आहेत. त्यामुळे प्रकल्प पूर्ण पदावर येण्यासाठी गोवा सरकारने अडथळा दूर करण्याची आवश्यकता आहे.
गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असलेल्या गोवा मांस प्रकल्पाला सुगीचे दिवस येणार आहे. गोवा सरकारने सनफेस ऍग्रो फुड या खासगी कंपनीकडे करार केला असून त्यांच्यामार्फत रेडे व म्हशीची कत्तल करण्यास सुरुवात झाली आहे. सदर मांस गोव्यात पुरवठ्याबरोबर इतर देशात निर्यात करण्यात येणार आहे. दि. २९ जानेवारी रोजी प्रकल्पातून मांस घेऊन इराकला रवाना झालेला आहे. प्रकल्पात प्रतिदिन ३०० गुरांची कत्तल करण्याची क्षमता आहे. पण, कंपनीतर्फे सध्या १०० ते १२० रेड्याची कत्तल करण्यात येत आहेत. त्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतून रेडे व म्हशीची आयात केली जात आहे.
इराक देशात पाठवण्यात आलेला कंटेनर.
गोवा मांस प्रकल्पातून २००३ सालीपासून मांस निर्यात करण्याचे बंद झाले होते. राज्य सरकारच्या प्रयत्नामुळे इतर देशांत निर्यात करण्यासाठी गोवा मांस प्रकल्पाने केंद्र सरकारच्या एपिडा (एग्रीकल्चर प्रोसेस फूड प्रॉडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑफ इंडिया) ची खास परवानगी ऑगस्ट २०२४ साली घेतली आहे. तर दि. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी गोवा मांस प्रकल्पाने सनफेस ऍग्रो फुड या खासगी कंपनीकडे दहा वर्षाचा करार केला आहे. त्यानुसार प्रत्येकी कत्तल मागे राज्य सरकारला ५०० रुपयांचा महसूल मिळत आहे. कत्तलीसाठी लागणारी आधुनिक पद्धतीची यंत्रणा करार केलेल्या कंपनीतर्फे बसविण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत आणखी दोन कंटेनर इराक देशात पाठवण्यात येणार आहेत.
प्रकल्प पुन्हा बंदावस्थेत जाण्याची शक्यता
गोवा मांस प्रकल्पात सध्या फक्त ३३ कामगार काम करीत आहेत. इतर देशांत मांस निर्यात होत असल्याने कामगारांची उणीव दिसून येत आहे. अंदाजे नवीन ४० कामगारांची प्रकल्पात गरज आहे. प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश केणी व डॉ. रामदास नाईक या प्रकल्पासाठी महत्त्वाचे योगदान देत आहेत. पण, प्रकल्पात लागणारे रेडे व म्हशीची आयात करताना काही जणांकडून वाहने रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे प्रकल्प पुन्हा बंद अवस्थेत जाण्याची शक्यता आहे. सर्व कायदेशीर सोपस्कर पूर्ण करूनच रेडे व म्हशी कत्तलीसाठी गोव्यात आयात केल्या जातात.
ओमान, दुबई, जॉर्डनमध्येही होणार निर्यात
यासंबंधी अधिक माहिती देताना सनफेस ऍग्रो फुड या खासगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आसीम यांनी प्रकल्पासाठी सर्व कायदेशीर सोपस्कार करून रेडे व म्हशी इतर राज्यांतून आयात केल्या जात आहे. प्रकल्पातून मांस घेऊन एक कंटेनर यापूर्वीच इराकमध्ये पाठविण्यात आला आहे. भविष्यात ओमान, दुबई, जॉर्डन व इतर देशांत निर्यात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, आयात करण्यात येणारी जनावरे काही जण रोखून वाद करीत असल्याने त्याचा परिणाम प्रकल्पावर होण्याची शक्यता आहे. यासंबंधी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. प्रकल्पात प्रतिदिन ३०० जनावरांची कत्तल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.