पीएसी बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांकडून जमिनींचा तपशील सादर
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा सरकारऐवजी खासगी व्यक्तीचे नाव मालक म्हणून नोंद झालेल्या १०४ पैकी ९८ जमिनींच्या उताऱ्यात दुरुस्ती होऊन पुन्हा सरकारचे नाव नोंद झाले आहे. उर्वरित ६ जमिनींच्या उताऱ्यांवर सरकारचे नाव घालण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयतील सूत्रांनी दिली.
विधानसभेच्या सार्वजनिक लेखा समितीची (पीएसी) बैठक अध्यक्ष आमदार एल्टन डिकॉस्टा यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी अल्वारा जमिनींचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केला.
महालेखापाल अहवालांत अल्वारा जमिनींच्या गैरव्यवहारांचा उल्लेख होता. त्यामुळे कारवाईविषयीची माहिती महसूल खात्याला पीएसीला सादर करावी लागली. ३०० पैकी १०४ अल्वारा जमिनींच्या उताऱ्यांवर खासगी व्यक्तीचे नाव मालक म्हणून लागले आहे. या जमिनींचा तपशील सर्वे नंंबरसह उपजिल्हाधिकारी तसेच मामलेदारांंकडे आहे. सत्तरी, सांंगे, धारबांंदोडा, पेडणे आणि सासष्टी तालुक्यांत या जमिनी आहेत.
महालेखापालांनी दाखवून दिलेल्या सत्तरी तालुक्यातील अल्वारा जमिनींच्या विक्रीची चौकशी मामलेदार आणि उपजिल्हाधिकारी करत आहेत. चौकशी पूर्ण होण्यासाठी वेळ लागू शकतो. अल्वारा जमिनींच्या रूपांतरणाच्या नोंदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
माहिती एकत्र करण्याची प्रक्रिया सुरू
सर्वे खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात अल्वारा जमिनींची ७,८७१ लीज आहेत. एकूण जमीन १६,६१६.८३७ हेक्टर होते. सत्तरी, तिसवाडी, पेडणे, डिचोली, फोंडा, सांंगे, सासष्टी, केपे, काणकोण, मुरगांव, बार्देश या तालुक्यांत अल्वारा जमिनी आहेत. अल्वारा जमिनींचे उतारे, नोंदी, रूपांतरण, विक्री यांची माहिती एकत्र करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महालेखापालांनी ताशेरे ओढल्यानंतर पीएसीने महसूल खात्याला गैरव्यवहारांबाबतची माहिती सादर करण्यास सांगितली होती, असे सूत्रांनी सांगितले.