डीन डॉ. शिवानंद बांदेकर : दोघांना किडनी, एकाला यकृत दान
साहिल यांच्या कुटुंबियांना कृतज्ञता प्रमाणपत्र देताना डीन डॉ. शिवानंद बांदेकर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) ब्रेनडेड असलेल्या रुग्णाच्या कुटुंबियांनी रुग्णाचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याने तीन व्यक्तींना जीवदान मिळाले आहे. यानुसार राज्य अवयव व पेशी प्रत्यारोपण संस्थेने (सोटो) गोमेकॉतील दोन गरजू रुग्णांना प्रत्येकी एक मूत्रपिंड (किडनी), तर संभाजीनगर येथील इस्पितळात भरती असलेल्या रुग्णाला यकृत (लिव्हर) दान करण्याची परवानगी दिली. गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी ही माहिती दिली.
डॉ. बांदेकर यांनी सांगितले की, मोपा विमानतळावर काम करणाऱ्या साहील व्ही. एस. (२२, रा. केरळ) यांचा २८ जानेवारी रोजी अपघात झाला होता. त्यांच्यावर गोमेकॉमध्ये उपचार सुरू होते. ७ फेब्रुवारी रोजी त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्यावर ‘सोटो’ने त्यांना परवानगी दिली. यानुसार गोमेकॉमधील ३३ आणि २४ वर्षीय गरजूंना मूत्रपिंड दान करण्यात आले. क्षेत्रीय संस्थेने (रोटो) यकृत संभाजीनगर येथील रुग्णाला देण्यात आले.
ते म्हणाले, सोटो गोवा, गोमेकॉ, गोवा पोलीस, दाबोळी विमानतळावरील अधिकारी यांच्या सहकार्यामुळे हे अवयवदान शक्य झाले. संभाजीनगर येथील रुग्णाला अवयव देण्यासाठी गोमेकॉ ते दाबोळी विमानतळ ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. याआधी २९ जानेवारी रोजी गोमेकॉमध्ये भरती असलेल्या रुग्णाने अवयवदान केल्याने ५ व्यक्तींचे प्राण वाचवण्यात यश आले होते. राज्यात २०२५ मध्ये आतापर्यंत तिघा रुग्णांच्या कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेऊन ११ जणांना जीवदान दिले आहे.
अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अवयवदानाचा निर्णय घेण्यासाठी प्रचंड धैर्य आणि उदारता आवश्यक असते. स्वतः दुःखात असताना अवयवदानाला होकार दिल्याबद्दल आम्ही साहिल यांच्या कुटुंबियांचे आभार मानतो. साहिल यांचे पार्थिव केरळमध्ये पोहोचवण्यासाठी गोमेकॉकडून मदत केली जाणार आहे. या धाडसी निर्णयाबद्दल गोमेकॉकडून साहिल यांच्या कुटुंबियांना कृतज्ञता प्रमाणपत्र देण्यात आल्याचे डॉ. बांदेकर यांनी सांगितले.
आतापर्यंत २९ जणांना जीवदान
‘सोटो’ गोवाच्या देखरेखीखाली हे आठवे अवयवदान होते. ‘सोटो’ गोवाने २०१९ पासून आतापर्यंत अवयवदानाद्वारे २९ जणांना जीवदान दिले आहे. ‘सोटो’ने २०१९ मध्ये स्थापनेपासून रोटो वेस्ट आणि नोटोद्वारे १६ मूत्रपिंड, ४ हृदय, ७ यकृत आणि २ फुफ्फुसांचे वाटप सुलभ केले आहे.