आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची माहिती
पणजी : राज्यात डिसेंबर २०२६ पर्यंत कर्करोगावरील रुग्णालय उभारण्यात येणार असून त्यासाठी पुढील वर्षी १०० एमबीबीएस डॉक्टर्सच्या जागा वाढविण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. गोव्यात एम्स स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जर एम्स स्थापन झाले तर आणखी एक सरकारी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन केले जाऊ शकते, असे ते म्हणाले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५-२०२६ चा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेला पर्यटन मंत्री रोहन खंवटे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक उपस्थित होते.आरोग्यमंत्री राणे, पर्यटनमंत्री खंवटे आणि प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले. अर्थसंकल्पात गोव्यासाठी अनेक योजना आहेत, असे ते म्हणाले.अर्थसंकल्पात वैद्यकीय शिक्षणासाठी अतिरिक्त ७५,००० जागांची घोषणा करण्यात आली आहे. याचा फायदा गोव्याला होईल. गाेवा मेडिकल कॉलेजमध्ये आणखी १०० जागा वाढविण्यात येतील. देशात २०० कर्करोगावरील रुग्णालयांंची घोषणा केंद्रांकडून करण्यात आली आहे. याचाही फायदा गोव्याला होईल. राज्यात एम्स रुग्णालय नसले, तरी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अपग्रेडेशन करणे शक्य होईल. केंद्राला दुसऱ्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रस्ताव सादर करता येईल.केंद्राच्या योजनेत म्हापसा जिल्हा रुग्णालय, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, फोंडा रुग्णालय आणि तुये आरोग्य केंद्र यांचे अपग्रेडेशन करण्याचा प्रस्ताव आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. या रुग्णालयांच्या अपग्रेडेशनमुळे गोवा मेडिकल कॉलेज रुग्णालयावरील ताण कमी होईल.
पर्यटनासाठी मोफत व्हिसा आणि कनेक्टिव्हिटी
केंद्रीय अर्थसंकल्पात निधी तसेच पर्यटनासाठीच्या योजनांचा समावेश आहे. मोफत व्हिसा सवलतीमुळे गोव्यात परदेशी पर्यटकांची संख्या वाढेल. विशेष निधीसाठी अलायन्सच्या ५० पर्यटन स्थळांमध्ये गोवा समाविष्ट आहे. यामुळे पर्यटन स्थळांचा विकास होण्यास मदत होईल. गोव्यातील समुद्रकिनारे आणि वारसा स्थळांचे सुशोभीकरण केले जाईल. अर्थसंकल्पात वारसा स्थळांसाठी २,५०० कोटी रुपयांची तरतूद आहे. कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी निधी उपलब्ध आहे. याचा फायदा गोव्याला होईल, असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.