पर्यावरणीय मंजुरी मिळालेल्या जागांची पाहणी सुरू
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : रेती काढण्याच्या जागांवर उपसा केलेली रेती साठवून ठेवण्याच्या जागांचे जिओ टॅगिंग केले जाणार आहे. रेती काढण्यात येणाऱ्या भागांची खाण खात्याने पाहणी सुरू केली आहे. रेती साठवण्याच्या जागांचे जिओ टॅगिंग झाल्यानंतर रेती काढण्यासाठीचे परवाने देण्याला प्रारंभ केला जाईल.
खाण खात्याचे संचालक नारायण गाड यांनी ही माहिती दिली. मांडवी आणि जुवारी नद्यांमध्ये एकूण १२ ठिकाणी रेती काढण्यासाठी पर्यावरणीय मान्यता मिळाली आहे. मांडवी नदीत बेतकी-फोंडा, खांडोळा, सावईवेरे, वळवई, एरकई कोकोण, गोवा शिपबिल्डिंग क्षेत्र खांडोळा, बेतकी या भागात रेती उत्खनन करता येणार आहे. बेतकी येथे दोन ठिकाणी रेती काढता येणार आहे. जुवारी नदीत बोरी, माकाझन, पंचवाडी, शिरोडा येथे रेती उत्खनन करता येणार आहे. पंचवाडी येथे दोन ठिकाणी रेती काढता येणार आहे.
एका ठिकाणी वर्षाला १ हजार क्युमीपर्यंत रेती काढता येऊ शकणार आहे. पर्यावरणीय दाखल्याची मुदत एक वर्ष असेल. एनआयओने रेती काढण्यासाठी योग्य असलेल्या जागांबाबतचा अहवाल सादर केल्यानंतर रेती काढण्यासाठी पर्यावरणीय दाखले देण्यात आले आहेत.
परवाना मागणीसाठी जादा अर्ज
रेती साठवून ठेवण्यासाठीची जागा निश्चित करणे आवश्यक आहे. या जागांची पाहणी करणे सुरू आहे. १२ ठिकाणांवर १०३ परवाने देता येणार आहेत. परवाना मागणीसाठी जादा अर्ज आले आहेत. त्यामुळे छाननी तसेच पात्रतेचे निकष ठरवून परवाने दिले जातील, असे संचालक नारायण गाड यांनी सांगितले.