गोमंतकीय तरुणांच्या हितासाठीच जीएसएससीत कोकणी सक्तीची !

मुख्यमंत्री : कोकणी अकादमीच्या पुरस्कारांचे वितरण


04th February, 11:51 pm
गोमंतकीय तरुणांच्या हितासाठीच जीएसएससीत कोकणी सक्तीची !

कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोमंतकीय तरुणांचे हित डोळ्यांसमोर ठेवूनच कर्मचारी भरती आयोगाच्या (जीएसएससी) परीक्षेत कोकणी सक्तीची केली आहे. मराठी येणाऱ्या गोमंतकीयालाही कोकणीत उत्तरे देणे शक्य होते. गोव्याबाहेरील लोकांना मात्र कोकणीत उत्तरे देणे कठीण होते, हे गुणांवरून लक्षात आले, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
राजभवन येथील दरबार हॉलमध्ये कोकणी अकादमीच्या कोकणी साहित्य आणि भाषा सेवा पुरस्कारांचे मंगळवारी वितरण झाले. या सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर साहित्य अकादमीच्या उपाध्यक्ष कुमुद शर्मा, सचिव प्रसाद लोलयेकर, राजभाषा खात्याचे संचालक प्रशांत शिरोडकर, कोकणी अकादमीचे अध्यक्ष वसंत सावंत आदी उपस्थित होते. २०२२, २०२३ आणि २०२४ या तीन वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसारमाध्यम कला कौशल्य पुरस्कार प्रुडंट मीडियाचे संपादक संचालक प्रमोद आचार्य, भांगरभूंयचे उपसंपादक अतुल पंडित आणि भिकू बोमी नायक यांना प्रदान करण्यात आला.
दै. ‘भांगरभूंय’ला पाठिंबा देण्याची गरज !
कोकणी तसेच आपली संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी ‘भांगरभूंय’ या कोकणीतील एकमेव दैनिकाला गोमंतकीयांनी पाठिंबा देण्याची गरज आहे. सरकार दै. ‘भांगरभूंय’ला सर्वाधिक प्राधान्य देते. हे दैनिक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जागृती केली पाहिजे, असे उद्गारही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.